हरी नरकेंच्या “त्या” ईमेलमुळे हेरंब कुलकर्णी भावविवश

थिंक टँक न्यूज नेटवर्क
प्रख्यात लेखक, विचारवंत हरी नरके यांच्या निधनामुळे परिवर्तनवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशीच एक आठवण शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी शेअर केली आहे.
हरी नरके यांनी हेरंब कुलकर्णी यांना केलेला ईमेल नवऊर्जा देणारा आहे.
हेरंब कुलकर्णी लिहितात की,
“या शब्दांनी डोळ्यात पाणी आले…
फेसबुकवर माझी जात काढली गेली.तेव्हा मी व्यथित झालो. तेव्हा हरी नरके यांनी मला जो मेल केला तो आज सापडला..तेव्हा माझ्याविषयी च्या त्यांच्या सद्भावनेने माझ्या डोळ्यात पाणी आले…
“प्रिय हेरंब,
सप्रेम नमस्कार.
मला आपली पहिली भेट नेहमी प्रेरणादायी वाटते. इतकी वर्षे झाली तरी त्यावेळी तुम्ही बोललेले प्रत्येक वाक्य मला आजही जसेच्या तसे आठवते. मी अ.भा.मराठी नाट्य संमेलनाला नगरला आलो होतो. एका परिसंवादात मी वक्ता होतो. परिसंवाद संपल्यावर तुम्ही मला मंडपात भेटलात. आपण बोलतबोलत समोरच्या चहाच्या टपरीवर गेलो. एकत्र चहा घेतला. बराच वेळ आपल्या गप्पा झाल्या. प्रामुख्याने तुम्ही बहुजन समाजाच्या प्रबोधनासाठी यापुढच्या काळात भुमिका काय असायला हवी, स्ट्रॅटेजी काय हवी यावर मला तळमळीने तुमचे विचार सांगत होतात. आपण मिळून परस्परपुरक काम कसे करू शकतो, त्याद्वारेच इथल्या सनातनी, संघीय शक्तीचा पाडाव कसा शक्य आहे हे तुम्ही मला सांगत होतात. मी खूप प्रभावित झालो होतो.
आजही जेव्हाकधी मी नाउमेद होतो, निराश होतो, तेव्हा तुमचे ते बोलणे मला उर्जा देते. त्यानंतर आपण अनेकदा भेटलो, बोललो, आम्ही पतीपत्नी तुमच्या घरी आलो होतो, तुम्ही खूप आत्मियतेने आदरातिथ्य केलेत. आमच्यासोबत फिरून आम्हाला रतनवाडी, भंडारदरा आणि परिसर दाखवला होता, भाऊसाहेब मंडलिकही सोबत होते, त्यावेळी धबधबा बघतानाही तुम्ही भटकेविमुक्त, दलित समाज यांच्या दु:खावर बोलत होतात, तुमच्यासारखा आरपार भला, कळकळीचा माणूस मला खूप मोलाचा वाटतो. माणसं जपण्याच्य बाबतीत पुरोगामी कुचकामी ठरलेत. ऎशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रितीचे तुम्ही अस्सल प्रतिक आहात. अशा तुम्हाला कुणी संघीय म्हणावे हा नीचपणा आहे. तुमची जत काढणे तर श्वापदीय काम आहे.
आज पहाटे जाग आल्यावर तुमच्याबद्दल जे प्रथम मनात आले ते तुमच्यापर्यंत पोचवावे म्हणून लिहिले.
तुमचा स्नेहांकित,
हरी
काय बोलावे यावर…?”
फेसबुक लिंक