टेंभू योजनेच्या पाण्यावर डल्ला, वैभव देशमुख यांचा आंदोलनाचा इशारा
सांगोला– सध्या सांगोला तालुक्यामध्ये टेंभू योजनेचे पाणी कॅनल द्वारे व बंदिस्त पाईपलाईन द्वारे सुरू असून शासनाचे टेल टू हेड पाणीपुरवठा करण्याचे आदेश असताना कोण ही उठतो आणि कुठेही पाणी सोडतो अशी अवस्था सध्या तरी दिसून येत आहे. संबंधित यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांना याबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची न पटणारी उत्तरे दिली जात आहेत. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून सदर तलावांमध्ये पाणी त्वरित सोडून किमान 50 टक्के तरी तलावं भरून द्यावा अन्यथा वरील वस्तीवरील व लाभ क्षेत्रातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत, अशी माहिती वैभव देशमुख यांनी दिली.
त्याचे झाले असे जवळा पाझर तलाव क्रमांक दोन (गुरव तलाव) या तलावातील शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी करूनही तलावात पाणी पोहोचते तोच बंद केले जाते. सदर बंदिस्त पाईपलाईन चे काम झाल्यापासून आत्तापर्यंत हीच अवस्था पाहावयास मिळते.
आत्तापर्यंत असे का होत आहे याच्या मुळाशी गेले असता सदर तलावात पाणी सोडल्यानंतर या तलावापर्यंत येणाऱ्या पाईपलांच्या सब लाईन मधून काही शेतकरी पाणीवाटप कर्मचारी अधिकारी यांच्या सहमतीने संगणमत करून परस्पर पाणी चोरून नेत आहेत. पाणी चोरून नेणाऱ्या ठिकाणाच्या कॉक जवळ पाहणी करणारी यंत्रणा नाही. पाणी वाटप कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणले तर कसलीही कारवाई नाही. सदर पाणी चोरांवर अद्याप पर्यंत कसलेही गुन्हे दाखल झाले नाहीत म्हणजेच या पाणी चोरांना सदर अधिकारी व कर्मचारी यांचा छुपा पाठिंबा दिसून येत आहे.
सदर अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांनी सोडलेल्या पाण्याच्या अंदाजावरून तलाव पस्तीस टक्के भरला आहे आमच्याकडे पुरावे आहेत असे सांगून प्रकरण रेटून नेतात. प्रत्यक्षात पाच टक्के देखील पाणी तळ्यामध्ये उपलब्ध नाही.हेच अधिकारी कर्मचारी जानेवारीमध्ये लोणार ओढ्यावरील बंधारे कोळेकर महाराज मठ बंधारा देशमुख बंधारा देशमुख वस्ती बंधारा, मोगले बंधारा या बंधाऱ्यात गेल्यावर्षीपासून पाणी सोडलेलं नसताना अधिकारी सांगतात की 2024 च्या जानेवारी महिन्यात हे सगळे बंधारे भरून वाहिलेले आहेत.
बंधारे भरले म्हणून शासनाला रिपोर्ट करतात प्रत्यक्षात एकाही बंधाऱ्यात पाणी सोडले नव्हते या उलट मानेगाव राजुरी या भागातील बंधारे तलाव यांचे निरीक्षण केले असता हे तलाव 80 ते 90% भरून दिलेले आहेत हे पाण्याचे असमान वाटप अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे कोण तुपाशी तर कोण उपाशी अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. सदर तलावावर साळे गंगणे वस्ती कोळी साळुंखे वस्ती सुरवसे वस्ती गावडे कोळेकर वस्ती बागवान वस्ती पाणीपुरवठा अवलंबून असून त्यासाठी ग्रामपंचायत जवळे यांनी देखील पाण्याची मागणी केलेली आहे.
त्यामुळे वरील वाडी वस्तीवरील ग्रामस्थ व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून सदर तलावांमध्ये पाणी त्वरित सोडून किमान 50 टक्के तरी तलावं भरून द्यावा अन्यथा वरील वस्तीवरील व लाभ क्षेत्रातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.