जवळा जि.प. गटात अतुल पवार करणार भूकंप?

‘अतुल-आनंद’ जोडगोळीची राजकीय व्यूहरचना कोणाच्या पथ्थ्यावर?

Spread the love

 

  • फॅक्ट फाईल
  • जवळा गटातील गावांत निवडणुकी अगोदर केली १० कोटींची विकासकामे
  • एखतपूर गटात केली ५० कोटींची विकासकामे
  • मागच्या निवडणुकीत राज्यभरात झाली होती चर्चा
    केला होता मात्तबर नेत्याचा पराभव
  • जिवलग मित्र तथा गटनेते आनंदा माने यांचे मिळणार हत्तीचे बळ
  • शासकीय निधीसोबतच स्वखर्चातून उभारला विकासकामांचा डोंगर

सांगोला : डॉ. नाना हालंगडे
विकासकामांचा डोंगर उभा करणारे कणखर, विकासशील, विश्वासू नेतृत्व म्हणून उद्योगपती तथा एखतपूर जि.प. गटाचे विद्यमान सदस्य अतुल (मालक) पवार यांची राज्यभरात ख्याती आहे. मागील जि.प. निवडणुकीत एखतपूर गटात शेकापच्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करून विक्रमी मताने निवडून आलेले अतुल पवार हे आगामी जि.प. निवडणुकीत जवळा गटातून निवडणूक लढणार आहेत. याबाबतची घोषणा त्यांनी ‘थिंक टँक’शी बोलताना केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

राज्यात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या ‘थिंक टँक’ या न्यूज पोर्टलकडून आगामी जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “आखाडा जिल्हा परिषदेचा’’ हे सोलापूर जिल्ह्यातील स्पेशल पॉलिटिकल कव्हरेज प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अतुल पवार यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

कोण आहेत अतुल पवार?
अतुल पवार हे मेथवडे गावचे सुपूत्र आहेत. ते उच्चशिक्षित आहेत. आटपाडी तालुक्यातील दिघंचीमध्ये मामांकडे त्यांचे शिक्षण झाले. त्यांना सुरुवातीपासून समाजसेवा, राजकारणाची आवड होती. ते उद्योगपती आहेत. शिक्षण संस्थेबरोबर त्यांची बँकही आहे. विकासकामांना प्राधान्य देणे व ती कामे करून घेणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. उद्योगपती, शिक्षण संस्थाचालक, बँकिंग क्षेत्रातील मात्तबर व्यक्तिमत्व म्हणून अतुल पवार यांची ओळख आहे. सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड असलेल्या अतुल पवार यांनी लोकांचे प्रश्न अधिक ताकदीने सोडविण्यासाठी मागच्या जि.प. निवडणुकीत एखतपूर गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. वस्तुस्थिती अशी होती की, अतुल पवार यांनी यापूर्वी कोणतीच निवडणूक लढवली नव्हती. राजकारणात त्यांचा दबदबा असला तरी त्यांना निवडणुकीचा अनुभव नसल्याने त्यांची राजकीय पाटी कोरी होती. विशेष म्हणजे त्या गटातील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे शेकाप-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीचे मात्तबर नेते होते. अतुल पवार यांना शिवसेनेचे तत्कालीन माजी आमदार तथा विद्यमान आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांची साथ मिळाली. असे असले तरी त्यावेळी निवडणुकीपूर्वीच अतुल पवार यांनी केलेल्या मुबलक विकासकामांमुळे, मिळालेल्या जनतेच्या पाठबळावर त्यांनी ही निवडणूक एकहाती जिंकली. विक्रमी मतांनी ते विजयी झाले. राज्यभरात त्यांची चर्चा झाली. विशेष म्हणजे त्यांनी त्या निवडणुकीवेळी पंचायत समितीच्या दोन गणातील जागाही निवडून आणल्या.

विकासकामांचा उभारला डोंगर
गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत अतुल पवारांनी एखतपूर गटातून निवडून येवून विक्रम प्रस्थापित केला होता. या गटामध्ये त्यांनी ५० कोटींची विकासकामे केली आहेत. एखतपूर गटातील ४० हून अधिक रस्ते त्यांनी बांधले. गावोगावी व्यायामशाळा, सभामंडप, ओढा खोलीकरण आदी असंख्य विकासकामे केली. यातील बऱ्याच कामांसाठी त्यांनी पदरमोड करून स्वखर्चातून कामे केली आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जवळा जि.प. गटातून निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. येथेही निवडणुकीला सामोरे जाण्याअगोदरच त्यांनी १० कोटीहून अधिक रकमेची विकासकामे केली आहेत. आता आगामी निवडणुकीत ते ‘शेकाप’चे बलाढ्य असे उमेदवार असणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत जवळा जिल्हा परिषद गट ताब्यात घेणार असल्याचे अतुल पवार यांनी ‘थिंक टँक’शी बोलताना सांगितले.

पहिली निवडणूक चर्चेत
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी गतवेळी पहिल्यांदा निवडणूक लढविली त्यावेळी ते चांगलेच चर्चेत राहिले होते, प्रथमच ही निवडणूक लढविली अन् विजय मिळविला, गेली साडे चार वर्षात त्यांनी एखतपूर गटात कोट्यवधी रुपयांची कामे केली. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. त्यामुळे तर त्यांनी आत्ता दुसऱ्या टर्मला जवळा गटातून निवडणूक लढविण्याच्या चंग बांधला आहेे.

रांगडे नेतृत्व
कुस्ती आखाड्यातील वस्तादाबरोबर ते राजकीय आखाड्यातील वस्ताददेखील आहेत, पैलवानांचा लवाजमा नेहमी त्यांच्यासोबत असतो. आयुष्यातील पहिल्याच निवडणुकीत त्यांनी प्रस्थपिताना ‘जोर का धक्का’ दिला होता. तेथेही विकासकामांचा डोंगर उभा केला होता. एखतपूर गटातील गावांमध्येही मोठी विकासकामे त्यांनी केली आहेत. ना पक्ष, ना पार्टी, सर्वसामान्य व्यक्ती हाच त्यांचा पक्ष अशीच त्यांची ओळख आहे. सध्या त्यांनी विद्यमान आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांची साथ सोडली आहे. विकासपुरुष भाई कै. गणपतराव देशमुख यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून ते ‘शेकाप’चे मित्र बनले आहेत. भाई कै. गणपतराव देशमुख यांच्या पश्चात ‘शेकाप’ची ताकद माणदेशी भागात अबाधित राहावी, विकासकामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, चांगला व्यक्ती जि.प. गटाचा लोकप्रतिनिधी असावा, या हेतूने ते जवळा जि.प. गटात ‘शेकाप’कडून इच्छुक आहेत.

अफाट युवक संघटन
अतुल पवार यांचा जनसंपर्क अफाट आहे. हजारो युवक त्यांना फॉलो करतात. ते युवकांचे आयडॉल आहेत. सुख-दुखाच्या प्रसंगी धावून जाणारा, पदरमोड करून मदत करणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. केवळ एखतपूर व जवळा गावातच नव्हे तर तालुक्यासह जिल्हाभरात त्यांचे युवक संघटन आहे. या युवक संघटनाच्या बळावरच त्यांनी राज्यातील मात्तबर नेत्याचा बालेकिल्ला असलेल्या जवळा गटात निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

‘अतुल-आनंद’ जोडगोळी सुसाट
तालुक्याच्या राजकारणात अतुल पवार व आनंदा माने यांची जोडगोळी सुसाट आहे. हे दोघेही ‘शेकाप’चे नेतृत्व मानतात. आनंदा माने यांनी आगामी सांगोला नगरपरिषदेची निवडणूक ‘शेकाप’सोबत युती करून लढविण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. सध्या आनंदा माने यांच्या सुविद्य पत्नी राणीताई माने ह्या सांगोल्याच्या नगराध्यक्षा आहेत. आनंदा माने यांना मानणारा मोठा वर्ग सांगोला तालुक्यात आहे. आनंदा माने यांच्यामागे सर्व जाती-जमातींच्या लोकांसोबतच धनगर समाजाचे मोठे बळ आहे. विशेष म्हणजे जवळा गटातील संगेवाडी, मेथवडे, देवळे, सावे, बामणी, राजापूर, वाढेगाव, मेडशिंगी, आलेगाव, वाकी-घेरडी, वाणीचिंचाळे व जवळा या गावांत धनगर समाजबांधवांची संख्या मोठी आहे. हे मोठे बळ आनंदा माने हे आपले मित्र अतुल पवार यांच्या पाठीशी उभे करू शकतात. शिवाय तालुक्यातील इतर जि.प. गटातही आनंदा माने यांचा मोठा फायदा ‘शेकाप’च्या उमेदवारांना होऊ शकतो. अतुल पवार व आनंदा माने हे तालुक्यातील तरुण, तडफदार नेते ‘शेकाप’सोबत गेल्यामुळे ‘शेकाप’ला हत्तीचे बळ मिळाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

अतुल-आनंदने रान तापविले
मागील काही दिवसापूर्वी अतुल पवार व आनंद माने यांनी जवळा गटातील गावांमध्ये डौरा केला,त्यावेळी सर्वच गावांमध्ये यांचे जंगी स्वागत करण्यात आले,यावेळी ही सर्वांचा जोश न्याराच होता,अनेक ठिकाणी पदयात्रा,मिरवणूक ही पार पडली, हीच जोडगोळी सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका