राजकारण
Trending

सांगोल्यात लोकसभेसाठी नेते ॲक्टिव मोडवर

शेतीच्या पाण्याचा श्रेयवाद टोकाला

Spread the love

राजकीय वार्तापत्र/ नाना हालंगडे
या चालू डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होतील. सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता व ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल लोकसभेबरोबर वाजतील अशी चर्चा भाजप गोटात असल्याने सध्या सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून बैठका, भेटीगाठी व प्रीतीभोजनवर भर देऊन राजकीय वातावरण निर्मिती व संघटन बांधणी चालू आहे. सांगोल्यात लोकसभेसाठी नेते ॲक्टिव मोडवर असल्याचे दिसून येत आहेत.

सध्या तरी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी असून भाजपामध्येच खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरुद्ध त्यांच्याच पक्षातील धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दंड थोपटले आहेत. दोघांनीही सांगोला विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. तर विरोधी पक्षात मात्र सामसूम दिसून येत आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येत आहे. या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर हे प्रतिनिधित्व करतात. आजपर्यंत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले या दिग्गजानी प्रतिनिधित्व केलेला मतदार संघ आहे.

हे तिघेही नेते विकास कामाबाबत सातत्याने तालुक्यात भेटीगाठी घेत होते. तर विशेषता शरद पवार हे तर सर्व अधिकाऱ्यांची बैठक सांगोला येथे बोलावून जनतेचे प्रश्न सोडवीत होते. पाच वर्षाचा खासदार फंड व विकासकामाचा आढावा घेत होते. परंतु विद्यमान खासदारांनी अलीकडेच या वर्षात भेटीगाठीवर भर दिल्याची चर्चा होत आहे.

खासदार नाईक-निंबाळकर यांनी पाच वर्षात काय केले असा लेखाजोगा मतदारसंघात चर्चिला जात आहे. त्यांनी गेल्या वर्षापासून सांगोला मतदार संघात भेटीवर जोर दिलेला दिसत आहे.

त्यांच्या सध्याच्या भाषणात शेतीच्या पाण्याच्या योजना मीच आणल्या असे जाहीर सभेत सांगत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी हे सातारच्या जाहीर सभेत टेंभू म्हैसाळ आधी योजनेचे शिल्पकार व श्रेय ते गणपतराव देशमुख यांना देतात. उजनी योजनेची पाणी आमदार शहाजी पाटील यांनी आणले असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. निरा देवधरचे पाणी आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे दोघेही मीच आणले असल्याचा दावा करीत आहे. तर खासदार नाईक निंबाळकर जाहीर सभेत हे पाणी माझ्यामुळेच आले असल्याचा दावा करतात.

पाण्याच्या योजना राज्य सूचीतील असल्याने दोघे आजी-माजी आमदार जो दावा करतात ते खरे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. या दावा प्रतिदाव्यावरून मतदार म्हणतात की”यह पब्लिक है,”सब कुछ जानती है”.

खासदार नाईक-निंबाळकर यांनी पाच वर्षात फंड किती आणला व किती कामे केली याबाबत त्यांच्या संबंधित सेक्रेटरीकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न गेली सहा महिन्यापासून करीत आहे. परंतु प्रतिसाद मिळत नाही. तसे पाहता दिवाळीत हरभरा डाळ बाजारात 80 रुपये दराने वाटप केल्याचे तसेच शासनाच्या योजनांचे प्रदर्शन भरून विद्यार्थी व जनतेला माहिती देण्याचे काम झाले.

कडलास येथे 25 लाख रुपये खासदार फंडातून व्यायाम शाळेला साहित्यासाठी दिले गेले. एवढेच आम्हाला माहीत असल्याचे भाजपाचे नेते खाजगीत सांगत आहेत. त्याच्यापेक्षाही जास्त आम्हाला माहित नाही इतर निधी आमदार शहाजी पाटील व जिल्हा भाजपाचे अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्यामार्फत देण्यात आला असल्याचे सांगितले जाते.

शहीद कामटे सामाजिक संघटनेने गेली दोन वर्षापासून कलबुर्गी-मिरज या सुपरफास्ट गाडीला सांगोला थांबा द्यावा, तसेच मिरज सांगोला मुंबई अशी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची, बंद असलेली किसान रेल्वे सुरू करावी अशी मागणी करूनही अद्याप मान्य झाली नाही भाजपाची सत्ता महाराष्ट्रात व देशात आहे. विद्यमान खासदार रेल्वे बोर्डाचे सदस्य आहे. तरी त्यांना साधे थांब्याचे काम झाले नाही. यावरून इतर कामाबाबतचा दावा हा मतदारांना जुमला वाटतो.

जी कामे आमदार व माजी आमदार यांनी केली असल्याचा दावा करतात त्याच कामाबाबत खासदारही ती कामे मीच केली असा दावा करतात.
खासदार नाईक निंबाळकर व भाजपाचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांचे दौरे सांगोला तालुक्यात गेली दोन महिन्यापासून सातत्याने वाढले आहे.

म्हणजे सध्या तरी भाजप नेत्यांमध्येच जुंपली आहे. तर शेकाप, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस या पक्षात मात्र सामसूम आहे. तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते म्हणतात”देखो, आगे क्या, क्या होता है”.

आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे खासदार नाईक-निंबाळकर यांचा किल्ला लढवत आहे. विधानसभा निवडणूक वर्षात होईल अथवा लोकसभेबरोबर होईल त्या दृष्टीने साळुंखे-पाटील यांनी शड्डू ठोकून आमदारकी लढवण्यासाठी दंड थोपटले आहे. तर आमदार पाटील यांनी अद्याप दंड थोपटले नसले तरी मीच आमदार असल्याचा दावा करीत आहेत त्यातूनच आमदार पाटील यांना अधून मधून मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. आता झाले तर मंत्री होतील नाहीतर पुन्हा कधी नाही असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असल्याने पाटील यांना एकदा संधी द्यावी व बापूचे स्वप्न पूर्ण करावे असे मत त्यांचे कार्यकर्ते खासदार निंबाळकर यांच्याजवळ व्यक्त करीत आहे.

आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे तिन्ही नेते तालुक्यात सातत्याने मतदारांशी संपर्क ठेवत असून सार्वजनिक कार्यात एकत्र सहभागी असल्याचे दिसून येत आहेत. जरी एकत्र असले तरी तिघांचे विचार वेगवेगळे आहेत.

या तिघांनी उद्याची 2024 ची विधानसभा निवडणूक लढवून मतदारांचा कौल खरा कुणाकडे आहे हे एकदा पहावेच. नाहीतर दोन दगडीवर हात ठेवत राजकारण किती दिवस चालणार असे मतं कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.

डॉ.अनिकेत देशमुख भाजपाच्या संपर्कात?
शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तसेच गतवेळी अल्पशा मताने पराभूत झालेले डॉ.अनिकेत देशमुख हे सध्या आपल्या वैद्यकीय शिक्षणाबरोबर राजकारणातही सक्रिय झाले आहेत. त्यांनी तालुक्यात संपर्कही वाढविला आहे. हेच डॉ.अनिकेत देशमुख सध्या भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत,अशी चर्चाही एकावयास मिळत आहे. मात्र त्यात कितपत तथ्य आहे हे माहीत नाही.

पाण्याचे श्रेय गणपत आबांचे
सध्या सांगोला तालुक्यात जे पाण्याचे राजकारण रंगत आहे. ते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सातारा येथील सभेत काही दिवसापूर्वी सांगितले आहे. टेंभू,म्हैसाळसह अन्य पाणी योजनांचे खरे जनक गणपत आबाच आहेत. आपली पन्नास वर्षांची आमदारकी यांनी सांगोला तालुक्यातील शेतीला पाणी मिळण्यासाठीच घालविली. पण सध्या जो श्रेटवाद रंगत आहेत. हे तालुक्यातील जनता पाहत आहे. यांनाही पाणी कोणी आणले हेही चांगले माहीत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका