ध्येयासक्त व कार्यमग्न कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

कुलगुरु पदाच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त डॉ. शिवाजी शिंदे यांचा विशेष लेख

Spread the love

“आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका व प्रेरणास्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस मॅडम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा कार्यभार घेऊन आज ५ मे २०२१ रोजी ३ वर्षे पूर्ण होत आहेत. हा ३ वर्षांचा कार्यकाळ कुलगुरू मॅडमनी अतिशय उत्कृष्ट व प्रभावीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्वप्रथम आदरणीय मॅडमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन! डॉ. फडणवीस मॅडम यांच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळाच्या तृतीय वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याविषयी लिहिण्याची संधी घेतोय, त्यांच्या कार्यकाळाविषयी लिहिण्यासारखे अनेक प्रसंग आहेत; पण त्यातील काही प्रसंगावर भाष्य करण्याचा प्रयत्न मी या लेखात करीत आहे.”

मला आजही आठवतोय डॉ. फडणवीस मॅडम यांनी दिनांक ६ मे २०१८ रोजी विद्यापीठाच्या प्रथम महिला कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. त्या पदभार स्विकारण्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी केले होते. त्याचवेळी असे वाटले होते की, मॅडमचा कार्यकाळ विद्यापीठाच्या विकासात नक्कीच उत्पादक भर पाडणारा असेल, आपल्या कार्यकाळास ३ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यावेळी वाटलेले आज सत्त्यात उतरताना दिसत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

कुलगुरू या एक महिला असूनही खूप धाडसी आहेत, कणखर आहेत, निर्भीड आहेत, तेवढ्याच मायाळू आणि मातृहृदयी आहेत. प्रत्येक प्रसंगाला त्या धीरोदात्तपणे तोंड देतात, कोणत्याही प्रसंगी त्या त्यांचा संयम अथवा तोल तसूभरही जाऊ देत नाहीत किंवा ढळू देत नाहीत हे त्यांचे स्वभावविशेष! कुलगुरू डॉ. फडणवीस मॅडम ह्या विशिष्ट ध्येय निश्चित करून याठिकाणी आल्या आहेत ते म्हणजे विद्यापीठाचा नावलौकिक वाढावा, विद्यापीठाचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना उत्तम व कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासारख्या अनेक बाबी सांगता येतील. या सर्वांतून त्यांची कामाप्रती, आपल्या जबाबदाऱ्याप्रती असलेली प्रचंड निष्ठा व धेयासक्ती दिसून येते. त्यासाठी त्या अहोरात्र प्रयत्न करत आहेत, मेहनत घेत आहेत ही विद्यापीठाच्या प्रगतीला चालना देणारी बाब आहे.

सन्माननिय कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस मॅडम

आदरणीय मॅडम ह्या “भान ठेवून योजना आखतात आणि त्या योजना बेभान होऊन प्रत्यक्षात आणतात” हे त्यांच्या कार्यकुशलतेचे गमक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! कुलगुरू मॅडम ह्या प्रत्येकावर विश्वास टाकतात, त्यांना त्यांचे काम करण्यासाठी तसेच प्रत्येकास आपली कला व गुण जपण्यासाठी वाव देतात, स्वातंत्र्य देतात. त्यामुळे आपोआपच सर्वांच्या कार्यास गतिमानता प्राप्त होते, त्यामुळे प्रत्येकजण अधिक कार्यक्षमतेने आपले काम पूर्ण करतात.

सन्माननिय कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस मॅडम

मॅडमना माणसांची उत्तम पारख आहे, कोणत्या माणसाकडून कोणते काम करून घ्यायचे, कोणत्या माणसाला कोणते काम सोपवले म्हणजे ते पूर्ण होऊ शकेल याची जाण आहे. त्यामुळे त्यांनी हाती घेतलेले कोणतेही काम त्या तडीस घेऊन जातात. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करताना कधीच दडपण,भिती वाटत नाही. मॅडम ह्या ‘आपल्या’ कुलगुरू आहेत असंच नेहमी वाटत राहतं. एवढी त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता आणि विशालता आहे.

कुलगुरू मॅडम ह्या आपल्या कामात सतत कार्यमग्न असतात (अगदी लॉककडाऊनच्या काळातही) हे विशेष. कोणत्याही कामाचा कोणताही ताण अथवा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर कधीही, केव्हाही यत्किंचितही जाणवत नाही. त्या सतत कार्यमग्न राहतात. त्यामुळे आम्हालाही त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळते.

◆ कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस मॅडम यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील आत्तापर्यंतची ठळक व भरीव कामगिरी

१) विविध शैक्षणिक संस्था व विद्यापीठांशी सामंजस्य करार
कुलगुरू मॅडमनी पदभार घेताच महत्त्वाचे काम हाती घेतले, ते म्हणजे सोलापूर विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील गुणवत्तापूर्ण कामगिरी करणारी विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यांच्याशी जोडले जावे. आपापसांत ज्ञानाची व विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि विद्यापीठाचा गुणात्मक विकास व्हावा हा निर्भेळ हेतू अनेकांशी सामंजस्य करार यापाठीमागे त्यांचा आहे. फिनलँड, माल्टा, चीन या देशांसह भारतातील जवळपास ३७ शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार त्यांच्या या ३ वर्षांच्या कार्यकाळात करण्यात आले आहेत.

२) कौशल्याधिष्ठित अभासक्रमांची सुरुवात
विद्यापीठातील जास्तीत विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहावेत. शिक्षणातून केवळ नोकरी मिळवणारे विद्यार्थी तयार न होता नोकरी देणारे विद्यार्थी अर्थात उद्योजक निर्माण व्हावेत या उद्देशाने विद्यापीठात अनेक कौशल्याधारित विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम कुलगुरू मॅडमनी सुरू केले आहेत.

३) अनेकविध विषयांच्या संकुलांची निर्मिती व नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात
कुलगुरू मॅडमचे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे मॅडमनी सोलापूर हे बहुभाषिक शहर आहे हे जाणले आणि विद्यापीठ परिसरात भाषेचे अभ्यासक्रम सुरू व्हावेत यासाठी पुढाकार घेऊन हे सर्व अभ्यासक्रम सुरू केले. भाषा व वाड्मय संकुलांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, पाली इत्यादी भाषा अभ्यासाचे विषय सुरू केले. याबरोबरच स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ अलाईड हेल्थ सायन्सेस, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट या संकुलांची व अभ्यासक्रमांची उभारणी केली.

४) विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय व परीक्षाभवन इमारतीची पायाभरणी व बांधकामास सुरुवात
विद्यापीठाची स्थापना होऊन १५ वर्षे उलटूनही विद्यापीठास स्वतंत्र प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन उभे करता आले नाही याविषयी त्यांच्या मनात खंत होती. यासाठी त्यांनी विद्यापीठाच्या ४८२ एकर जागेत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते नूतन प्रशासकीय इमारतीचा भव्य असा पायाभरणी समारंभ आयोजित केला होता. आज या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ही सारी किमया कुलगुरू मॅडमच्या कुशल व दूरदृष्टीने निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाची आहे.

५) पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील
विद्यापीठास प्रथमच महिला कुलगुरू म्हणून डॉ. मृणालिनी फडणवीस लाभलेल्या आहेत. योगायोगाने त्यांच्याच काळात म्हणजेच ६ मार्च २०१९ रोजी शासनाकडून थोर राज्यकर्त्या, मुत्सद्दी राजकारणी, शूरवीर, कर्तबगार व उत्तम प्रशासक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठास देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नामकरण सोहळ्याचे आयोजन त्यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात व देखण्या पद्धतीने विद्यापीठात केले होते याचे साक्षीदार आम्ही सर्वजण आहोत. यानिमित्ताने विद्यापीठाच्या ४८२ एकरात उभारण्यात येणाऱ्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्यदिव्य असा अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मा.कुलगुरूंचा आहे. यासाठी त्या सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा करीत आहेत.

६) मल्टीपर्पज इनडोअर हॉलसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर
विद्यापीठासाठी भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टीपर्पज इनडोअर हॉल निर्माण करण्याकरिता साडेचार कोटी रुपये निधी मा.कुलगुरू मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मंजूर झाला आहे.
विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात विद्यार्थी खेळाडूंसाठी हा मल्टीपर्पज हॉल उभारण्यात येत आहे. या मल्टीपर्पज हॉलमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, जुदो, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस यासह विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार आहेत. जागतिक दर्जाचा अगदी सुसज्ज असा मल्टीपर्पज हॉल उभारण्यात येणार आहे. सोलापूरच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी खूप चांगले हॉल उपलब्ध होणार आहे. याचा फायदा निश्चितच येथील विद्यार्थी खेळाडूंच्या उज्ज्वल करिअरसाठी होणार आहे.

७) ऑक्सिजन पार्कची निर्मिती
विद्यापीठ आणि डॉ.मेतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या ४८२ एकर जमिनीमध्ये ऑक्सिजन पार्क साकारत आहे. या पार्कचे उदघाटन मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यासाठीही मा.कुलगुरू मॅडम यांचा पुढाकार आहे.

८) देखण्या व दिमाखदार राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन
मा.कुलगुरूंच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयाकडून दरवर्षी घेण्यात येणारा राज्यस्तरीय २३ वा क्रीडामहोत्सव आयोजित करण्याचा बहुमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास प्राप्त झाला. कुलगुरू मॅडमच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली विद्यापीठाने दिनांक २६ डिसेंबर २०१९ ते ३० डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात व निर्विघ्नपणे पार पडला. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगत सिंग कोश्यारीजी यांच्या शुभहस्ते अतिशय थाटात व दिमाखदारपणे पार पडले.
याचे सर्व श्रेय मा. कुलगुरू मॅडमच्या सक्षम नेतृत्वाला द्यावे लागेल. याचे कारण त्यांनी या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी घेतलेली अपार मेहनत, प्रत्येक गोष्टीचे केलेले सूक्ष्म नियोजन, विविध समित्यांची स्थापना करून केलेली कार्यविभागणी, वेळोवेळी उपसमित्यांच्या बैठका घेऊन केलेले मार्गदर्शन, तयार करण्यात आलेली उत्तम प्रतीची मैदाने इत्यादी.
जवळपास ३३०० खेळाडू व संघ व्यवस्थापक, संघप्रशिक्षक मिळून इतर १००० अशा सर्व मान्यवरांच्या निवासाची व जेवणाची उत्तम व्यवस्था यामुळे विद्यापीठाचा क्रीडामहोत्सव इतरांपेक्षा वेगळा व उत्कृष्टरित्या आयोजित केल्याच्या प्रतिक्रिया सहभागी खेळाडू व संघव्यवस्थापकांनी व्यक्त केल्या होत्या. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

९) अद्ययावत सुविधा आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने युक्त टी.व्ही. स्टुडिओ व मीडिया लॅबची उभारणी
विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न बनविण्यासाठी मा. कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस मॅडम या परिश्रम घेत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ज्ञानाचा प्रसार व संवर्धन करणे आवश्यक असल्याने अद्ययावत अशा टीव्ही स्टुडिओ व मीडिया लॅबची मोठी मदत होणार आहे. यासाठी १ कोटी २० लाख रूपये खर्च आला आहे.
यामध्ये टी.व्ही. व रेडिओ असे दोन स्वतंत्र स्टुडिओ आहेत. टी.व्ही. स्टुडिओत अत्याधुनिक शूटिंग कॅमेरे, टेलिप्रॉम्प्टर, दर्जेदार ध्वनी व प्रकाशयंत्रणा, पीसीआर (प्रॉडक्शन कंट्रोल रूम) विभागात व्हिडीओ व साऊंड मिक्सर, व्हिडीओ व ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर, लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा, वेब व्हिडिओमध्ये साऊंड एडिटिंग व ब्रॉडकास्टिंग सिस्टीम, विद्यावाहिनी हा वेब रेडिओ व विद्यावाहिनी नावाचे रेडिओ ऍप विकसित केले आहे.

१०) इकॉनॉमिक्स लॅब व पुरातत्व संग्रहालयामुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात भर
भारताला समृद्ध असा वारसा व संस्कृती लाभली आहे. हा वारसा व संस्कृती पुढील पिढीकडे संक्रमित करून त्याचे जतन व संवर्धन करणे गरजेचे असते. हाच विचार करून कुलगुरू मॅडम यांनी डॉ. माया पाटील मॅडम यांच्यावर पुरातत्व संग्रहालयाची जबाबदारी सोपविली होती. त्याचाच परिपाक म्हणजे आज विद्यापीठात सदरचे संग्रहालय उभारले आहे. ही विद्यापीठासाठी मोठी उपलब्धी आहे. प्राचीन उत्खननाचा अमूल्य ठेवा या संग्रहालयाच्या माध्यमातून जपला जाणार आहे.

• इकॉनॉमिक्स लॅब
विद्यापीठाच्या इकॉनॉमिक्स लॅबमध्ये एकूण ४० मॉडेल्स उभारले आहेत. या लॅबचा उपयोग विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राची गोडी लावण्यासाठी होणार आहे. या इकॉनॉमिक्स लॅब व पुरातत्व संग्रहालयाच्या उदघाटन प्रसंगी युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चरल अँड टेक्नॉलॉजी, उत्तराखंड येथील कुलगुरू डॉ.तेजप्रताप म्हणाले होते की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासारखी इकॉनॉमिक्स लॅब भारतात कुठेही नाही. त्यामुळे मी भारतातल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना असे सांगेन की, तुम्हाला जर इकॉनॉमिक्स लॅब बघायची असेल तर सोलापूरला जा! त्यांनी काढलेले गौरवोद्गार हे नक्कीच विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणारे आहेत.

११) कृषी पर्यटन केंद्राची स्थापना
सोलापूर हा कृषिप्रधान जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्याला मुबलक पाणी साठा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला कृषी पर्यटनाचे क्षेत्र कसे बनविता येईल याचा विचार करून कुलगुरू मॅडमनी विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्राची स्थापना केली आहे. कृषी पर्यटनाचा स्वतंत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे. सदरचा अभ्यासक्रम पूर्ण करून अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शेतीमध्ये कृषी पर्यटनस्थळे उभारता येतील म्हणजेच विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश या कृषी पर्यटन केंद्राची स्थापना करण्यापाठीमागे मा.कुलगुरूंचा आहे.

१२) हॅन्डलूम युनिटची निर्मिती
सोलापूरला चादरी, टॉवेल्स आणि हातमागाची उज्जवल परंपरा आहे. हातमाग व्यवसायासाठी सोलापूर हे ब्रँड म्हणून ओळखले जावे यासाठी विद्यापीठात हॅन्डलूम युनिटची निर्मिती करण्यात आली आहे. हातमाग व्यवसायास चालना मिळावी, हातमाग व्यवसायासाठीलागणारी कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त करून घेता यावीत यासाठी कुलगुरू मॅडमच्याच कार्यकाळात हॅन्डलूम प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे तसेच विद्यार्थांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या अभ्यासक्रमाची मदत होत आहे.

१३) पेट – ७ मधील प्रलंबित जवळपास ६५० संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न आस्थेवाईकपणे सोडविला
कुलगुरू मॅडमच्या नेतृत्वात कोव्हिड -१९ या महामारीच्या काळातही पेट – ७ अंतर्गत पीएच.डी.च्या प्रलंबित जवळपास ६५० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न कौशल्याने सोडविला. यासाठी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांच्या जवळपास १९० बैठका ऑनलाइन प्रणालीद्वारे घेण्यात आल्या. त्यामुळे लॉककडाऊनच्या काळातही विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्यास चालना मिळाली. तसेच विविध विषयांच्या पीएच.डी.च्या एकूण ३५ अंतिम मौखिक परीक्षा (Viva Voce) ऑनलाइन प्रणालीद्वारे यशस्वीरीत्या घेण्यात आल्या. याबरोबरच मॅडमच्या नेतृत्वात पीएच.डी. प्रवेशाकरिता पेट – ८ ची प्रक्रिया सूरू करण्यात आली आहे. लवकरच याबाबतची जाहिरात देण्यात येणार आहे.

१४) लॉककडाऊनच्या काळात विविध विषयांवरील अनेकविध वेबिनारचे आयोजन
कुलगुरू मॅडमच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनच्या काळात विविध विषयावरील अनेकविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय एकूण ५० च्या वर वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमुळे विविध महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले. याचा फायदा शिक्षक व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना झाला.

१५) प्रशासनाला उत्तम दिशा देण्याचे कार्य
कुलगुरू मॅडमनी नागपूर येथे प्राचार्य पदावर प्रदीर्घ काळ कार्य केल्यामुळे त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. विद्यापीठातही त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. प्रशासन कार्यात व निर्णय प्रक्रियेत त्या सर्वांना सहभागी करून घेतात. त्यामुळे आपोआपच प्रशासकीय कार्याला गती मिळत आहे.

१६) विद्यापीठाचा २०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींनी समृद्ध परिसर
कुलगुरू मॅडमनी विद्यापीठाचा कॅम्पस हा ग्रीन कॅम्पस असावा यावर भर दिला आहे. त्यामुळेच विद्यापीठ परिसरात आजमितीला २०० पेक्षा जास्त विविध वनौषधी, आयुर्वेदिक वृक्षसंपदा यांची रेलचेल आहे. या वृक्षांचे संपूर्ण गुगल टॅगिंग करण्यात आले असून प्रत्येक वृक्षांवर त्यांची नावे नोंदविली आहेत. या वृक्षांच्या शास्त्रीय अभ्यासावर आधारित एक स्वतंत्र फोटो बुक तयार करण्यात आले आहे.
यामुळे कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ कॅम्पसमधील विस्तृत वृक्षसंपदेचे जणू ऑडीटच करण्यात आले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

१७) विद्यापीठास “प्रभावी शाश्वत विद्यापीठ” हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार
कुलगुरू मॅडमची ठळक कामगिरी म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठास मिळालेला जागतिक पातळीवरचा “प्रभावी शाश्वत विद्यापीठ” हा पुरस्कार होय. या पुरस्काराने विद्यापीठास सन्मानित करण्यात आल्यामुळे जागतिक स्तरावर विद्यापीठाचे नाव पोहचले आहे. त्यामुळे ही फार मोलाची कामगिरी कुलगुरू डॉ.कुलगुरू मॅडम यांची आहे.

१८) माझ्या परिसराची ओळख/माहिती (Know My Campus) हा नाविन्यपूर्ण उपक्रम
कुलगुरू मॅडमच्या काळात राबविला गेलेला हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. विद्यापीठ परिसरात सर्व संकुलांतर्गत उपविभागामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या संकुल व उपविभागाबरोबर विद्यापीठातील इतर संकुले, उपविभाग, प्रशासकीय विभाग यांची माहिती होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे कोणत्या विभागात कोणते नवीन अभ्यासक्रम,उपक्रम राबविले जातात, कोणकोणती साधनसमुग्री उपलब्ध आहे याची माहिती होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. विचारविनिमयातून त्यांच्या व्यक्तिमत्वात चांगला बदल घडून येतो. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसराबद्दल प्रेमाची व अभिमानाची भावना निर्माण होते.

१९) विद्यापीठाच्या पेटंट व कॉपीराईटला मान्यता
कुलगुरू मॅडमचे अत्यंत महत्त्वाचे योगदान म्हणजे आजपर्यंत ज्या क्षेत्रात विद्यापीठ मागे होते ते क्षेत्र म्हणजे विद्यापीठाकडे नसलेले पेटंट व कॉपीराईट्स होय. परंतु, मॅडमच्या कार्यकाळात एकूण ४ पेटंट व ३ कॉपीराट्सला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या गौरवात मोलाची भर पडली आहे.

२०) ‘लॅब ऑन व्हील’ : एक अभिनव उपक्रम
कुलगुरू मॅडमच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इन्क्यूबेशन सेंटर अंतर्गत राबविण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम ‘लॅब ऑन व्हील’ हा आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्था, महाविद्यालय व शाळा यामध्ये जाऊन विविध प्रयोग व प्रात्यक्षिकातून विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी याबद्दल मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. यासाठी विद्यापीठाकडून अनुभवी व प्रशिक्षित प्रशिक्षकही नेमण्यात आले आहेत. या लॅब ऑन व्हील उपक्रमाचा अनेक संस्था, महाविद्यालय व शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

२१) ‘रूसा’कडून पुरातत्वीय संग्रहालयासाठी १ कोटी ५ लाखांचा प्रकल्प मंजूर
कुलगुरू मॅडमच्या काळात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व डेक्कन कॉलेज पुणे यांना संयुक्तरित्या प्रकल्पासासाठी रूसाकडून १ कोटी ५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी जुन्नर येथे पुरातत्वीय संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून डॉ. माया पाटील या काम पाहत आहेत.

कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सत्कार करताना डॉ. शिवाजी शिंदे.

या आणि अशा अनेक नाविन्यपूर्ण बाबी कुलगुरू मॅडम विद्यापीठात राबवित आहेत. यापाठीमागे त्यांचा कोणताही स्वार्थ नाही, निस्वार्थपणे त्या हे सर्व करीत आहेत.याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. निश्चितच त्यांच्या उर्वरित कार्यकाळातही विद्यापीठाच्या प्रगतीची चढती कमान त्या कायम ठेवतील व विद्यापीठाचा विविध क्षेत्रात नावलौकिक वाढवतील यात तिळमात्र शंका नाही ! त्यांना उत्तम आरोग्य लाभो यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो..

– डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे
सहायक कुलसचिव (वर्ग १ अधिकारी) तथा
मराठी भाषा दक्षता अधिकारी,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
चलभाष क्रमांक – ९३७०६२१४७५
ई-मेल:-snshinde@sus.ac.in
shindesn2329@rediffmail.com

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका