राजकारण
Trending

सांगोल्यात नेत्यांचे डिजिटल वॉर

सांगोला अन् जवळ्यात बॅनरच बॅनर

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात डिजिटल वॉर मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. 2024 या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून नूतन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच तीन व सात जानेवारी रोजी अनुक्रमे शेकापचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा वाढदिवस असल्याने या दोन नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बोर्ड शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लावण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. डिजिटल लावण्यासाठी जागा देखील उपलब्ध नसताना रेटारेटी करून डिजिटल लावले जात असल्याचे दिसून येत आहे.

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल असून त्यातून विधानसभेच्या निवडणुकीची मतदारात साखर पेरणीला सुरू झाली आहे. सध्या तरी विविध स्पर्धा व डिजिटल बोर्ड वॉरने तालुका ढवळून निघत असलेला दिसून येत आहे.

विधानसभेची निवडणूक एप्रिल अथवा डिसेंबर 24 ला नक्की होणार असल्याने त्या दृष्टीने दोघेही इच्छुक व निश्चित उमेदवार असल्याची चर्चा वाढदिवस व विविध कार्यक्रमाच्या रेलचेल वरून चर्चिले जात आहे. तीन जानेवारीला शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी , फॉर्च्यूनर चार चाकी गाडी भेट विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा बैलगाडी स्पर्धा, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आबासाहेब केसरीच्या नावाने तसेच शेतकरी मेळावा आधी कार्यक्रमातून विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांना मतदारापर्यंत पोहोचणे व संघटन करणे व कार्यकर्त्यात प्रेरणा निर्माण करणे हाच उद्देश असल्याचा दृष्टिकोन दिसून येत आहे.

तसे पाहता स्वर्गीय गणपतराव देशमुख हे वाढदिवस साजरा करण्याच्या विरोधात होते. ते त्या दिवशी सांगोला शहरात न थांबता काही दिवसांसाठी ते बाहेरगावी दूरवर सहकुटुंब जात असत व कार्यकर्ते त्या दिवशी वाढदिवस कार्यक्रम करीत होते. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या कटआउटवर जनसेवक, लोकनेता, लोकप्रिय कार्यक्षम आमदार असे लिहिले गेले आहे.

विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दीपकआबा साळुंखे पाटील यांचा वाढदिवस सात जानेवारी रोजी होत आहे. त्यांचे डिजिटल कटआउट सांगोला शहरासह मतदार संघातील गावोगावी मोठ्या प्रमाणात लावले गेले आहेत. निवडणुक पूर्वीची रंगीत तालीम दिसत आहे. तसेच तालुका क्रिकेट स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी 200 मोफत शिलाई मशीन वाटप, दोनशे सायकली मोफत वाटप, मोफत रोग निदान शिबिर तसेच महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने दहावी व बारावी विद्यार्थ्यांना आयटीआयचे प्रशिक्षण देऊन नोकरी लावणे तसेच सर्व शाखांच्या पदवीधरांना पात्रतेप्रमाणे नोकरी देण्यासाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आधी विविध कार्यक्रमाने तालुका राजकीय दृष्टीने ढवळून निघाला असल्याचे दिसत आहे. सांगोला शहरात बस स्थानकाजवळील वासूद चौकात चाळीस फूट उंचीचे, तर जय भवानी चौकात तीस फुटाचे कटआउट लावले आहेत. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चालू आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्याने पाटील सध्या त्यांच्या मूळ गावी चिकमहुद येते विश्रांती घेत आहेत. परंतु त्यानिमित्ताने भेटण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना निवडणुका जवळ आल्या आहेत. कामाला लागावं लागतंय आतापासूनच नॉन स्टॉप संपर्क मतदाराची ठेवा असा सल्ला देऊन प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न आजारी असतानाही चालूच आहे.

मकर संक्रांतीनंतर गाव भेट दौरा सुरू करून नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सोडवण्याचा त्याच ठिकाणी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे राज्य व केंद्र शासनाकडून प्रत्येक गावाला विकास योजनेच्या माध्यमातून निधी आणले असल्याचे जाहीर करत आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे हा भाजपाचा कार्यक्रम दिसून येत आहे. चेतनसिंह केदार सावंत मित्र परिवारातर्फे क्रिकेटच्या स्पर्धा घेऊन तरुण युवक संघटन चालू असल्याचे दिसत आहे.

महागाई, बेरोजगारी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यावर काँग्रेस पक्षाचे आंदोलन इतरत्र चालू आहेत. परंतु सांगोला तालुक्यात मात्र सामसूम असल्याचे दिसत आहे. तालुक्यात काँग्रेस पक्षाचे मतदार, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु संघटन करण्यासाठी पूर्ण वेळ नेता नाही. त्यामुळे या पक्षाची अवस्था बिकट आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची अवस्था याच्या उलट आहे. शरद पवार दौऱ्यावर आले की आर्थिक दृष्ट्या व व्यावसायिक दृष्ट्या मातब्बर नेते गराडा घालतात. शरद पवार यांचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे ते सांगतात.

शरद पवार गेले की हे नेते इतर नेत्यांच्या कार्यालयात असतात. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष वाढविणारा नेताच तालुक्यात दिसून येत नाही. त्यामुळे या पक्षाची अवस्था काँग्रेस पक्षापेक्षा बिकट आहे. पूर्वीचे निष्ठावंत म्हणणाऱ्यांना बाजूला काढून शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे नवीन तरुण कार्यकर्त्यांच्या ताब्यात पक्षाची सूत्रे दिली तरच तालुक्यात पक्ष संघटन होईल. कारण शरद पवार यांच्यावर व्यक्तिशः प्रेम करणारे त्यांच्या कार्यपद्धतीवर तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात खुश आहेत. परंतु खमक्या नेता नाही म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला कार्यकर्ते आहेत मात्र खमके नेते नाहीत अशी अवस्था तालुक्यात आहे.

डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेट घेवून सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याची अन् सहकारी संस्थांच्या कामाबाबत भेट घेतली. पवार यांच्या भेटीमुळे तालुक्यात वेगळीच चर्चा एकवयास मिळत आहे. बंधू डॉ.अनिकेत देशमुख यांनी मागील काही दिवसापूर्वी देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन सख्या बंधूंनी काका-पुतण्याची भेट घेतल्याने तालुक्यात वेगळीच चर्चा एकावयास मिळत आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका