राजकीय वार्तापत्र/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत इच्छुक नेत्यांनी आतापर्यंत तालुक्यात केलेल्या न केलेल्या कामाच्या जोरावर विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसण्यास सुरूवात केली असून राजकीय फडात डावपेच करून विरोधी उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी धडपड सुरू आहे.
निवडणूक हा आकड्यांचा खेळ असतो. जो जिता वही सिकंदर अल्पमत असो की बहुमत निवडून येणे महत्त्वाचे आहे असे म्हणून विद्यमान आ. शहाजीबापू पाटील कामाला लागले आहेत तर शेकापकडे माजी आमदार गणपतराव देशमुख नावाचा ब्रँड आहे तर आता पक्षाचे नेटवर्क डॉक्टर बंधू सांभाळत असून तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्व राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे.
सांगोला तालुक्यात स्वबळावर एकहाती वर्चस्व निर्माण करता येईल अशी ताकद सध्या तरी एकाही राजकीय नेत्याकडे नाही ठरलेले काहीच घडत नाही असे म्हटल्यावर मा.आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आपल्या राजकीय नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याचे दिसून येते त्यांनी आपली महत्त्वकांक्षा जाहीर केली आहे व ती पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी एकला चलो रे म्हणण्याची धमक त्यांना बाळगावी लागेल.तत्त्व, धोरण व विचाराच्या पातळीवर विधानसभा निवडणुकीत आता कोणाशीही संगत नको आतापर्यंत आपण दुसऱ्यासाठी खूप झटलो आता निवडणुकीतून माघार नाही असे म्हणून ब्रम्हदेवाच्या साक्षीने दिपकआबांनी रणशिंग फुंकले आहे.
आ.शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यातील विकास कामाच्या जोरावर निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्याचा पक्ष कोणताही असो तुम्ही माझ्याकडे या मी कामे मार्गी लावतो असे म्हणून सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यात साखर पेरणी सुरू केली आहे तालुक्यात आ.बापूंना मानणारा मोठा मतदार आहे ऐनवेळी पारडे आपल्याकडे फिरविण्याची कला त्यांना चांगलीच अवगत असल्याने ते सध्या निर्धास्त आहेत.
शेकापला आत्मप्रौढी, खुषमस्करे यापासून सावध पावले टाकावी लागणार आहेत मान ,हात थरथरेपर्यंत पदाला चिकटून राहणाऱ्यानी नव्या उमेदीच्या लायक कार्यकर्त्याना संधी द्यावी लागेल.एकसंघ शेकापचा कोणीही पराभूत करू शकत नसला तरी अंतर्गत गटबाजी व आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एकजुटीने निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात सत्ताधारी असलेल्या व सांगोला मतदारसंघातील महायुती मधील घटक पक्षांच्या आजी माजी आमदारानी विधानसभा निवडणुकीसाठी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे तर शेकापकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे राजकारणात काहीही घडू शकते तसेच राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो हे राजकारणात अनेकवेळा सिद्ध झाले आहे असे असले तरी निवडणुकीत नेत्यांतील संघर्ष कोणत्या पातळीवर जातो हे येणाऱ्या काळात ठरणार आहे.