गेली दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पावसाने द्राक्षांचे घडकुज, घड गळणे होत असल्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. नुकसानीचे पंचनामे लवकर करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यात बुधवार (ता. 29) व गुरुवार (ता. 30) रोजी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यात काढण्या केलेल्या मका व विशेषत: द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वेळेच्या अवकाळीने शेतकरी कसाबसा बागा जोपासतच असतानाच पुन्हा एकदा अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या तालुक्यात दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला असताना सततच्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा जास्तच अडचणीत सापडला आहे. अगोदरच्या अवकाळी पावसाचे अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसताना पुन्हा एकदा अवकाळीने द्राक्ष उत्पादनांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या पावसामुळे काढणी केलेल्या मका पिकाचेही नुकसान झाली आहे.
पर्जन्य अहवाल
मंडळाचे नाव – आजचा पाऊस – एकूण पाऊस ( मिलिमीटरमध्ये)
सांगोला – ७.३ – ३६३.७
शिवणे – १०.३ – ३४२.१
जवळा – १४.८ – ३६७.७
हातीद – ७.५ – ४३१.१
सोनंद – ११.८ – ४१६.८
महूद – ६.३ – २११.८
कोळा – ११.३ – २६३.४
नाझरा – ७.८ – ३९७.८
संगेवाडी – १४.३ – ३४१.७