आरोग्य

प्राथमिक आरोग्य केंद्रात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर

सार्वजनिक आरोग्य सेवांबाबत सोलापुरातील कार्यशाळेत मंथन

Spread the love

सोलापूर : प्रतिनिधी
कोविड महामारीनंतर आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात आजही पुरेशा प्रमाणात औषधे नाहीत. रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नियुक्त करावेत व त्यांना पुरेशा सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छ बाथरूम, शौचालये, पिण्याचे पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. पुरेसा औषध साठा द्यावा, अशी एकमुखी मागणी जिल्हास्तरीय कार्यकर्ता कार्यशाळेत करण्यात आली.

अस्तित्व संस्था, सांगोला व अनुसंधान ट्रस्ट साथी पुणे या संस्थांच्या वतीने गुरुवार, 22 जून रोजी सोलापुरातील हॉटेल ध्रुव येथे सार्वजनिक आरोग्य सेवा व सुविधा यावर विचार मंथनासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस मोठ्या संख्येने महिला व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन सोलापुरातील जैष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेस हसिब नदाफ, यशवंत फडतरे, खलिक मन्सूर, डॉ.बाळासाहेब मागाडे तसेच अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे, अनुसंधान ट्रस्ट साथी पुणेचे प्रकल्प अधिकारी हेमराज पाटील, शकुंतला भालेराव, विनोद शेंडे, पत्रकार दिपक जाधव यांच्यासह अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, बार्शी व सोलापुरातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

कोवीड काळात सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव ओतून काम केले, लोकांना चांगली सेवा देऊन अनेकांचे जीव वाचवले, कोविड काळात अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. या पार्श्वभूमीवर कोविड पश्चात सरकारी आरोग्य सेवा या लोकाभिमुख, लोककेंद्र व दर्जेदार व्हाव्यात यांसाठी विविध स्तरांवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्रात अनुसंधान ट्रस्ट साथी पुणे या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात “आरोग्य सेवांवर सामाजिक कृती”हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत अस्तित्व संस्थेच्या वतीने अक्कलकोट व सांगोला या तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत.

सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र हे नाव बदलून आरोग्य वर्धिनी केंद्र म्हणून कार्यरत आहेत. परंतू सरकारी आरोग्य सेवांचा दर्जा आजही सुधारलेला नाही, असे चित्र आहे, असा सूर कार्यकर्त्यांच्या मांडणीतून येत होता. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा, कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या सुविधा हे प्रश्न आजही तसेच असल्याने आरोग्य वर्धीनी केंद्रे ओस पडली आहेत. बहुतांशी आरोग्य वर्धीनी केंद्रात रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आवश्यक पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालये, पुरेसा औषध साठा हे प्रश्न आजही तसेच आहेत असे अनुभव अनेकांनी कार्यशाळेत मांडले.

पूर्वी रूग्ण कल्याण समित्या कार्यरत होत्या. आता रुग्ण कल्याण समित्या ऐवजी जन आरोग्य समित्या स्थापन करावयाच्या आहेत. या पार्श्भूमीवर साथी संस्थेच्या शकुंतला भालेराव, हेमराज पाटील, विनोद शेंडे व दिपक जाधव यांनी जन आरोग्य समित्याची गरज त्यांचे स्वरूप, जन आरोग्य समिती सदस्यांच्या भूमिका जबाबदाऱ्या यांची मांडणी केली. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग होम रेग्युलेशन कायद्याबाबतची मांडणी झाली. या कायद्या अंतर्गत खाजगी दवाखान्यात रूग्ण हक्कांची सनद लावणे बंधनकारक आहे. उपचाराचे दरपत्रक दवाखान्याच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. जिल्हा तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापण करणे आवश्यक आहे या बाबतही सविस्तर चर्चा कार्यशाळेत झाली.

शेवटी जैष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मोकाशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले साथी संस्था व अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून आरोग्याच्या मुद्द्यांवर जे काम सुरू आहे ते कौतुकास्पद असुन सध्या गरिबांच्या व सामान्य माणसांच्या गरजेचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. आरोग्याचा प्रश्न हा अतिशय संवेदनशील असुन खाजगी दवाखान्याचा खर्च न पेलणाऱ्या रुग्णांना सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. परंतू सरकारी दवाखान्यात तज्ञ डॉक्टर्स,कर्मचारी पुरेसे नाहीत, औषध साठा पुरेसा नाही, स्वच्छतेचा अभाव आहे. हे ऐकल्यानंतर आपण कोणत्या विकासाकडे चाललोय हा प्रश्र्न पडतो. सार्वजानिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी राज्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे व सामान्य माणसांनी व रुग्णांनी जाब विचारला पाहिजे. तरच सरकारी आरोग्य सेवा सुधारतील असे सांगितले.

यावेळी हसीब नदाफ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेतील खुल्या चर्चेत डॉक्टरांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नियुक्त करावेत व त्यांना पुरेशा सेवा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे ते पूर्णवेळ महिला रुग्णांना चांगली सेवा देतील.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छ बाथरूम, शौचालये, पिण्याचे पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.
पुरेसा औषध साठा, साप कुत्रा चावल्याच्या लसी चोवीस तास उपलब्ध असाव्यात, आशा कार्यकर्तीना नियमित किट उपलब्ध व्हावे. आशा कार्यकर्तीना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते तर त्यांना पुरेसे व वेळेवर मानधन देण्यात यावे. शहरी आरोग्याच्या दृष्टीने सोलापुरात तक्रार नोंदी साठी टोल फ्री नंबर सूरू करावा अशीही मागणी करण्यात आली.

कार्यशाळेचे प्रास्तविक शहाजी गडहिरे यांनी केले व शेवटी आभार विशाल काटे व कल्पना चव्हाण यांनी मानले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका