बापूसाहेबांचा रविवारी वाढदिवस; अनोख्या पद्धतीने होणार साजरा
थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील झुंजार बहुजन नेते, प्रखर आंदोलक, सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, युवक नेते बापूसाहेब ठोकळे यांचा रविवार, 25 जून रोजी वाढदिवस आहे. मा. बापूसाहेब ठोकळे यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त शाल, बुके, हार न स्वीकारता गोरगरीब वंचित घटकातील मुलांना वाटप करण्यासाठी वह्या, पेन आदी शालेय साहित्य आणावे. ते तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थीदशेपासूनच समाजकार्याची ओढ
बापूसाहेब ठोकळे हे विद्यार्थीदशेपासून समाजकारणात काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विद्यार्थीदशेपासून त्यांनी सामाजिक अन्याय, विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप प्रश्नावर त्यांनी केलेली आक्रमक आंदोलने आजही लोकांच्या आठवणीत आहेत. विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज बनलेल्या बापूसाहेबांनी हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे. आजही ते या विषयावर काम करत आहेत.
लोकसंघटक बापूसाहेब
बापूसाहेब ठोकळे हे उत्तम संघटक आहेत. त्यांचा स्वभाव हा माणसे जोडण्याचा असल्याने उत्तम संघटक म्हणून ते सर्वांना ज्ञात आहेत. यामुळेच सांगोला तालुक्यासह राज्यात त्यांचा हजारोंचा चाहता वर्ग आहे. राज्यभरात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला धीर देऊन मदत करण्याचे काम बापूसाहेब अव्याहतपणे करत असतात.
रिपब्लिकन नेते बापूसाहेब
बापूसाहेब ठोकळे यांनी रिपब्लिकन चळवळीतही दमदार काम केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे विविध पदांवर काम केले आहे. मात्र कोणत्याही पदाचा हव्यास न बाळगता त्यांनी सतत पुरोगामी, आंबेडकरी विचारधारा जोपासत पुढे जाण्याचा मार्ग पत्करला आहे. आंबेडकरी विचार जोपासला, टिकला पाहिजे या भावनेतून त्यांनी राजकारण केले आणि करत आहेत.
पुरोगामी कार्यकर्त्यांचे आधारवड
बापूसाहेब ठोकळे यांनी आंबेडकरी चळवळीत काम करीत असतानाच समविचारी संघटनांना सोबत घेऊन विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविला. दलित, मुस्लिम, भटका समाज तसेच विविध वंचित घटकांना एकत्र करून एक संवाद सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. विविध मराठा संघटना, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भटका समाज, धनगर समाज, मसणजोगी समाज, डवरी गोसावी, नाभिक आदी समाजातील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्या सर्व समजघटकांचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी मांडून वाचा फोडली आहे. सर्व समाजात सौहार्दाचे, परस्पर संवादाचे वातावरण निर्माण व्हावे असे प्रयत्न ते सतत करत असतात.
बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक
बापूसाहेब ठोकळे यांनी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक म्हणून खूप मोठी जबाबदारी निभावली आहे. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. ते सध्याही बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुढाकाराने मा. श्रीकांत होवाळ यांच्या उपस्थितीत सांगोला तालुक्यात भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती. हजारोंच्या सभा झाल्या. संविधान सन्मान रॅली ऐतिहासिक ठरली होती.
वंचित, असहाय गोरगरिबांना आधार
सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वंचित, पीडित लोकांना संकटाच्या, अडचणीच्या काळात धीर देवून त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यामुळेच ते गोरगरिबांचे आधारवड बनले आहेत. विविध जाती धर्मातील गोरगरिबांवर अन्याय अत्याचार झाल्यास ते धावून जातात. सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.
उत्तम वक्ते आणि अभ्यासक
बापूसाहेब ठोकळे हे उत्तम वक्ते आहेत. भारतीय संविधान, आंबेडकरी चळवळ, बहुजनवादी महापुरुष, स्त्रियांचे, भटक्यांचे प्रश्न यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. परखड आणि अभ्यासू वक्ते म्हणून ते या भागात परिचित आहेत.
एकनिष्ठ भीमसैनिक
तडजोडीच्या राजकारणात एकनिष्ठा हरवत चालली आहे. बापूसाहेब ठोकळे हे आंबेडकरी विचारधारेशी एकनिष्ठ आहेत. कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता त्यांनी आपली आंबेडकरी विचारधारेशी निष्ठा जोपासली आहे. त्यामुळेच त्यांना समाजात मान आहे.
कोरोना काळात दिला हजारोंना आधार
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी कोरोना काळात तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जात आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, पिरॅमल स्वास्थ्य, डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजन मशिनी भेट दिल्या. कोरोना काळात अनेक रुग्णांना बेड मिळवून दिले. अनेकांचे प्राण वाचवले.
राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार
बापूसाहेब ठोकळे यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची योग्य दखल घेत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसकडून राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.
राजकारणात सक्रिय सहभाग
बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी, मित्रांनी केलेल्या आग्रहाखातर त्यांनी ताकदीने निवडणूक लढविली. खिशात दमडी नसताना कार्यकर्त्यांच्या बळावर हे धाडस केले. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून प्रचार केला. प्रस्थापित उमेदवारांना जोरात लढत दिली. असंख्य मते मिळाली. ही मते स्वाभिमानाची आणि आत्मियतेची होती. अगदी काही मतांच्या फरकाने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला त्यापेक्षा अधिक मते बापूसाहेब ठोकळे यांना मिळाली होती. येत्या निवडणुकीतही बापूसाहेब ठोकळे यांनी उतरावे अशा आग्रह कार्यकर्ते करत आहेत.
वाढदिवसाचा अनोखा संकल्प
बापूसाहेब ठोकळे यांचा रविवार, 25 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त थिंक टँक न्यूज नेटवर्क प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, “मुळात वाढदिवस साजरा करण्यात मला रस नाही. वाढदिवसानिमित्त डामडौल करणे, पैशांची उधळपट्टी करणे चुकीचे आहे. मात्र हजारो कार्यकर्ते, मित्र, हितचिंतक हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. बुके, हार, शाल आणत असतात. त्यांना नाराज करणे शक्य नाही. त्यामुळे बुके, हार, शाल यावर खर्च न करता सर्वांनी वह्या, पेन आदी शालेय साहित्य आणावे. आज समाजातील एक मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यांच्या मुलांना हे शालेय साहित्य वाटप केल्यास थोडासा हातभार लागेल. वाढदिवसानिमित्त संकलित केलेले शालेय साहित्य सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणच्या शाळांमध्ये जाऊन वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येताना बुके, हार, शाल यावर खर्च न करता सर्वांनी वह्या, पेन आदी शालेय साहित्य आणावे. जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांच्या हास्य फुलविता येईल. हे हास्य पैशात मोजता येणार नाही.”