कॅन्सर टाळण्यासाठी नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब करा
प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांचे कॅन्सर जनजागृती विषयक व्याख्यान

प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई, यांच्या सहकार्याने महिलांमधील कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या सुरक्षित व प्रभावी औषधांचा शोध याविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांनी कॅन्सर विषयक जनजागृती व्याख्याने दिली आहेत.
सांगोला : विशेष प्रतिनिधी
अजिंठा प्रतिष्ठान चोपडी, ता. सांगोला व प्रथम युवा भवन, चोपडी यांचे संयुक्त विद्यमाने “महिलांमधील कर्करोग: कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय” याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगोला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व कॅन्सर संशोधक डॉ. प्रकाश अरुण बनसोडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
हे व्याख्यान नालंदा वसाहत, चोपडी येथील नालंदा बुद्ध विहारामध्ये सायंकाळी 6.00 वाजता संपन्न झाले. सदर कार्यक्रमास प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या कोल्हापूर येथील सौ नंदाताई रोकडे, बहुजन नेते माननीय बापूसाहेब ठोकळे, माजी नगरसेवक किशोर बनसोडे, आबासाहेब शेजाळ सर, कोळे येथील डॉ. मोरे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई, यांच्या सहकार्याने महिलांमधील कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या सुरक्षित व प्रभावी औषधांचा शोध याविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यांनी कॅन्सर विषयक जनजागृती व्याख्याने दिली आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख बापूसाहेब ठोकळे यांनी करून दिली. सदर व्याख्याना मध्ये डॉ. बनसोडे यांनी महिलांमधील स्तनांचा, गर्भाशयाचा व बीजाशयाचा कर्करोग तसेच तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत संभाव्य कारणे, प्रथमदर्शी लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सदर व्याख्यानात त्यांनी कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब, निरोगी राहण्यासाठी व्यायाम व संतुलित आहार, तंबाखू, दारू, गुटखा, खेनी, पान मसाला, मशेरी यासारख्या व्यसनांना प्रतिबंध, रजो निवृत्तीनंतर होणारे संप्रेरक बदल व घ्यावयाची काळजी याबाबत दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत महत्त्व स्पष्ट केले. नंदा रोकडे यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना साठी उपलब्ध केलेल्या विविध संधी बाबत मार्गदर्शन केले.
माननीय आबासाहेब शेजाळ सर यांनी आपले मनोगत व आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री धनाजी तोरणे यांनी केले. सदर कार्यक्रमास चोपडी पंचक्रोशीतील महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.