राष्ट्रवादीतील बंडानंतर दीपकआबा आणि शरद पवार प्रथमच येणार एकाच स्टेजवर
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) हे पक्षात बंड करून भाजप – शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील आणि खा. शरद पवार हे सांगोला येथे प्रथमच एकाच स्टेजवर येणार आहेत. रविवार, १३ रोजी सांगोला येथे भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. शरद पवार, आ. जयंत पवार, खा. रामदास आठवले, आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील आदी नेतेमंडळी प्रथमच एकाच स्टेजवर येणार आहेत. राज्यात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर प्रथमच बडे नेते एकत्र येणार असल्याने त्यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता आहे. (NCP Leader Sharad Pawar)
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कृषी पणन व रोहयो मंत्री स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे स्मारक (पुतळा) अनावरण व महाविद्यालयाचा नामांतरण सोहळा रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि. कॉलेज व डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय,सांगोला या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. (Bhai Ganpatrav Deshmukh Statue Inauguration Program)
स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतरण सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार हे असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadanvis) यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (RPI Leader Ramdas Athawale), माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Congress Leader Sushilkumar Shinde), पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Solapur Gaurdian Minister Radhakrishnan Vikhe Patil), शेकापचे सरचिटणीस आ.जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील (MLA Jayant Patil), विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शेकापचे आम.बाळाराम पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या नेत्यांबरोबरच खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आम.शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil Sangola), माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, आम.बबनदादा शिंदे, आम.सुभाषबापू देशमुख, आम.विजयकुमार देशमुख,आम.प्रणिती शिंदे, आम.अनिल बाबर, आम.संजयमामा शिंदे, आम. समाधान आवताडे, आम.यशवंत माने, आम. रणजितसिंह मोहिते-पाटील, आम.गोपीचंद पडळकर, आम.सचिन कल्याणशेट्टी, आम.राम सातपुते, आम. राजेंद्र राऊत, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार आडम मास्तर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, माजी आमदार राजन पाटील,माजी आमदार दिलीप सोपल, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार पंडितशेठ पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे नेते वैभवकाका नायकवडी, पाणी संघर्ष चळवळीचे नेते शिवाजीराव काळुंगे, पाणी संघर्ष चळवळीचे नेते बाबुराव गुरव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, युवा नेते रोहित पाटील, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, युवा नेते भगीरथ भालके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
आबा आणि पवार साहेब प्रथमच एकत्र
मागील दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट अजित पवार यांच्या सोबत भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंद केले. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा दिपकआबांच्या भगिनी जयमालाताई गायकवाड यांनी शरद पवारांच्या पक्षात राहणे पसंत केले.
दीपकआबा हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी शरद पवारांना आजतागायत दैवत मानून राज्यात काम केले आहे. अशा स्थितीत शरद पवार यांच्याऐवजी त्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. या बंडानंतर हे दोन्ही नेते प्रथमच जाहीर कार्यक्रमात एकाच स्टेजवर येत असल्याने त्याची सर्वांना उत्सुकता आहे.
शेकापचे पॉलिटिकल मॅनेजमेंट
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानिमित्त पक्षाकडून प्रथमच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील तसेच जिल्ह्यातील बड्या नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वपक्षीय आहे असे शेकापकडून सांगितले जात असले तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकापने आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्याचे ठरवले असल्याचे दिसून येते. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून तालुक्यातून शेकापचे हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित राहतील असे नियोजन केले आहे.