सांगोल्याचा नादखुळा, शेतकऱ्यास थेट दिल्लीत स्वातंत्र्यदिनाचे निमंत्रण
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका अशी असणारी सांगोला तालुक्याची ओळख आता पुसू लागली आहे. शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून समृद्धी साधू लागले आहेत. शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. दरम्यान, सांगोला तालुक्यातील एका शेतकरी दांपत्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त आमंत्रित करण्यात आले आहे.
सांगोला तालुक्यातील अनारकिंग फार्मर प्रोड्युसर कंपनीचे बाळासाहेब लवटे यांना सपत्नीक निमंत्रण मिळाले आहे. (Anarking Farmer Producer Company Sangola)
दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त (Indian Independence Day) समाजातील विविध घटकातील प्रभावशाली आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. या व्यक्तींना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील वारणा रिव्हर्स फार्मर कंपनीचे अध्यक्ष प्रदीप साळुंखे (Pradip Salunkhe Warananagar) आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अनारकिंग फार्मर प्रोड्युसर कंपनीचे बाळासाहेब लवटे (Balasaheb Lavate Sangola) या दोन शेतकऱ्यांची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे.
अनारकिंग फार्मर कंपनी ही डाळिंब आणि द्राक्ष पिकांवर काम करते. ही कंपनी नाफेडच्या (NAFED) माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. तालुक्यात उत्पादित होणाऱ्या डाळिंबाला चांगला भाव मिळावा यासाठी ही कंपनी प्रयत्न करते. त्याशिवाय अधिकाधिक दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन व्हावे यासाठी ही काम केले जाते. या कंपनीचे पाचशे सभासद आहेत.
सांगोला तालुक्यात मागील पंधरा ते वीस वर्षात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. सांगोला तालुका हा डाळिंब उत्पादकांचा तालुका ही नवी ओळख सांगोला तालुक्याची झाली होती. मात्र मागील पाच ते सहा वर्षापासून तेल्या आणि मर या रोगाचा प्रादुर्भाव तालुक्यातील बागांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. या रोगाच्या कचाट्यात हजारो एकरावरील डाळिंब बागा नष्ट झाल्या आहेत. (Pomegranate Farming in Sangola)
या रोगामुळे अर्धवट उरलेल्या बागांना आता काढून टाकण्यात आले आहे. यापूर्वी जिकडे पाहावे तिकडे माळरानावर फुललेल्या डाळिंब बागा आता इतिहास जमा झाल्या आहेत. डाळिंब बागानी फुललेली माळराने आता ओसाड झाली आहेत. तिथे आता इतर पर्यायी पिके घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत अनारकिंग या कंपनीने ज्या डाळिंब बागा शिल्लक आहेत त्यांचे उत्पादन दर्जेदार आणि अधिकाधिक जास्तीचे कसे होईल तसेच त्यांच्या निर्यातक्षम डाळिंबांना चांगला दर कसा मिळेल यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत.
त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारतीय स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे लवटे कुटुंबास आमंत्रित करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांची झालेली निवड ही तालुकावासियांसाठी अभिमानास्पद आहे.