“माझ्यामुळे काहीजणांनी आमदारकीचा विश्वविक्रम केला, काहीजण आबदत आमदार झाले”
दीपकआबांनी काढला शेकापला चिमटा, शहाजीबापूंचे वाढविले टेन्शन
सांगोला : विशेष प्रतिनिधी
“राजकीय स्थित्यंतरात मला सांगोला विधानसभेची निवडणूक लढविता आली नाही. मात्र माझ्या सहकार्यामुळेच काहीजणांनी आमदारकीचा विश्वविक्रम केला, काहीजण आबदत बिबदत का होईना आमदार झाले” असा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला चिमटा काढला, तर दीपकआबा यांच्याच मदतीने २०१९ च्या निवडणुकीत आमदार बनलेल्या शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचे टेन्शन वाढविले आहे. (Former NCP MLA Deepakaba Salunkhe-Patil has revealed a big political secret)
उपरी (ता. पंढरपूर) येथे गुणवंत विद्यार्थी व गुणवंत पालक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना दीपकआबा साळुंखे पाटील यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली. अनेकांना आमदार करण्यामध्ये मी माहीर आहे. मात्र आता माघार नाही, असे सांगत त्यांनी आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून विजय खेचून आणण्याचा निश्चय बोलून दाखविला.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की, “पंढरपूर तालुक्याची अवस्था वाईट झाली आहे. तालुक्याचे उभे तुकडे पडले आहेत. मतदारसंघ रचनेत तालुक्याचा भाग माढा, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ मतदारसंघात समाविष्ट आहे. या तालुक्याची विकासाच्या बाबतीत पिछेहाट झाली आहे. तालुका फुटायच्या आधी इथे जे चालले होते ते बरे होते. आता या तालुक्याला पाच तुकडे आणि पाच मालके झाली आहेत. मी जेव्हा विधान परिषदेत आमदार होतो त्यावेळेस तालुक्याची आमसभा घ्यायला लावली. या तालुक्याची आमसभा कधी होतच नाही. ते चार आणि मी पाचवा आमदार त्या आमसभेला उपस्थित होतो. कोणी काही विचारायच्या आत ते चार आमदार अर्ध्या तासात जिकडे तिकडे पसार झाले. तुमचा भाग सांगोला तालुक्याला जोडलेला आहे. मी या भागात फारसे येत नव्हतो. मी आज शब्द देतो की, इथून पुढच्या काळात दीपकआबा वारंवार भाळवणी गटात आल्याचे दिसेल. तुमचे विकासाचे प्रश्न मार्गी लावले जातील.”
दीपकआबा पुढे म्हणाले की, “याठिकाणी साळुंखे सर आहेत. या साळुंखे सरांना गावाने मुख्याध्यापक केले. एका साळुंख्याला मुख्याध्यापक केल्यावर गाव कसं चांगलं होतं ते तुम्ही अनुभवलं आहे. आता दुसऱ्या साळुंख्याच्या नादाला आजपासून लागा. तालुक्याचा विकास कसा होतोय हे तुम्हाला पाहायला मिळेल. माझे वडील कै. काकासाहेब साळुंखे-पाटील हे सांगोला तालुक्याचे आमदार होते. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांना पाऊणे दोन वर्षांचा आमदारकीचा काळ मिळाला. त्यावेळेस आम्ही लहान होतो. नंतरच्या राजकीय स्थित्यंतरात मला आमदारकीची निवडणूक लढविता आली नाही. अनेकांना आमदार करण्यामध्ये मी माहीर आहे हे आपल्याला माहीत आहे. कुणी जागतिक विक्रम केले असतील ते सुद्धा दीपकआबांच्या सहकार्यानेच. आणि ज्यांना आबदत बिबदत का होईना आमदारकी मिळाली ती सुद्धा माझ्यामुळेच. मी मतदारसंघातील ज्या ज्या गावात जातो तिथे लोक आता म्हणतात की, आबा इतके दिवस दुसऱ्यांसाठी केले. आता बास करा. आता येणाऱ्या निवडणुकीत उतरले पाहिजे.”
“राजकारणात चढउतार अनेक असतात. आपण स्वतःपेक्षा समाजासाठी काय केले ते महत्त्वाचे असते. मी कधी कोणाला नावं ठेवणारा माणूस नाही. दुसऱ्याला नावे ठेवून आपण मोठे होत नसतो. ज्याचे त्याचे काम ज्याच्या त्याच्या पद्धतीने चाललेलं असतं. तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत मी आणि शहाजीबापू मिळून काम करीत आहोत. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते.”
निवडणूक लढविण्याचा एल्गार
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी या कार्यक्रमात आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून विजय खेचून आणण्याचा निश्चय बोलून दाखविला. हे सांगत असताना त्यांनी माझ्यामुळेच काहीजणांनी आमदारकीचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला असल्याचे सांगत शेतकरी कामगार पक्षाला चांगलाच चिमटा काढला. तर काहीजण आबदत बिबदत का होईना आमदार झाल्याचे सांगत विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचे टेन्शन वाढविले आहे.
दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या या भाषणाचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या भाषणाचा आधार घेत दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीत ताकदीने उतरावे अशी भूमिका मांडत आहेत.
वाचा गाजलेल्या बातम्या