थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. बाळासाहेब मागाडे
मातब्बर नेत्यांचा तालुका अशी राजकीय ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीत “राजकीय खिचडी” पहावयास मिळणार आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्याच्या राजकारणात होत असलेली प्रचंड उलथापालथ. त्यातच माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश केल्याने तालुक्याचा राजकीय गुंता वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्याचा आमदार कोण बनणार? पुन्हा शहाजीबापू? की बापूंच्या मदतीने दीपकआबा? की सहानुभूतीच्या लाटेवर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख होणार स्वार? वाचा सविस्तर..
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी बुधवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटास समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या स्टेजवर ते उपस्थित होते. अजित पवारांसोबत गेल्याने पर्यायाने ते सत्ताधारी पक्षासोबत आहेत असे मानायला हरकत नाही. सत्तेत भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena Eknath Shinde) आणि आता सोबतीला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ सुटणार याची सर्वांना उत्कंठा आहे. (Maharashtra Political Crisis)
जयमालाताई जुन्या राष्ट्रवादीसोबतच
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबत गेले असले तरी त्यांच्या भगिनी तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीत दुफळी असली तरी सांगोला तालुक्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकाच घरात राहणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या पक्षांची सूत्रे अप्रत्यक्षरीत्या माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्याच ताब्यात राहणार हे स्पष्ट आहे. (NCP Leader Sharad Pawar)
सांगोल्यात काय होणार?
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे दीर्घकाळ नेतृत्व भाई गणपतराव देशमुख (SKP Leader Ganpatrav Deshmukh Sangola) यांनी केले आहे. तब्बल 55 वर्षांहून अधिक काळ भाई गणपतराव देशमुख यांच्या रूपाने शेतकरी कामगार पक्षाने सांगोल्यावर झेंडा रोवला आहे. 2019 च्या निवडणुकीत आ. शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil Sangola) यांनी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मदतीने शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला.
आजवर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी भक्कम साथ दिल्याने शेकापचा विजय सुकर होत होता. 2019 च्या निवडणुकीत दीपकआबा यांनी शेकापच्या विरोधात भूमिका घेऊन आपले मित्र शहाजीबापू पाटील यांना मदत केल्याने बापू निवडून आले. याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की जिकडे दीपकआबा तिकडे विजय निश्चित! असे असले तरीही इतरांच्या विजयाचे किंगमेकर बनण्याऐवजी स्वतः विजयी होण्याची संधी दीपकआबांना केव्हा मिळणार? हा कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न आहे.
राजकीय खिचडीत कोण मारणार बाजी?
राज्यात सुरु असलेले खिचडीचे गरमागरम राजकारण पाहता भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची युती आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील अशी शक्यता दिसत आहे. जर ही युती अभेद्य राहिली तर सांगोला मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला सुटणार? हा मोठा औत्सुक्याचा विषय आहे. विनिंग सीट असल्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आ. शहाजीबापूंसाठी या मतदारसंघावर दावा करू शकते. असे झाले तर माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मदतीशिवाय बापूंना विजय मिळवता येईल असे वाटत नाही.
याउलट दीर्घकाळ या मतदारसंघात तिकीट मिळेल आणि आपण लोकांतून निवडून आलेले आमदार बनू असे स्वप्न पाहणाऱ्या माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी टोकाचा आग्रह केल्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा जावू शकते. शहाजीबापू यांच्या मदतीने दीपकआबा यांना निवडणूकीत यश मिळू शकते. 2019 निवडणुकीतील मदतीची परतफेड म्हणून शहाजीबापू ते करूही शकतात.
वरील दोन्ही अंदाजापैकी काहीच नाही घडले तर दीपकआबा आणि शहाजीबापू हे वेगवेगळे लढल्यास दोघांनाही ही निवडणूक हाती लागणे अशक्यप्राय असेल.
शरद पवार काय भूमिका घेऊ शकतात?
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शेकापचे नेते भाई गणपतराव देशमुख यांचे घनिष्ठ संबंध होते. अनेक निवडणुकांत शरद पवार यांनी शेकापला पाठिंबा देवून भाई गणपतराव देशमुख यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. येत्या निवडणुकीतही शरद पवार यांनी शेकापलाच पाठिंबा दिला तर इकडे दीपकआबा अजित पवार यांच्या गटात गेल्याने शरद पवार यांची शेकापला मिळणारी ताकद जादू दाखवू शकणार नाही. कारण सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी ही दीपकआबा यांच्याविना निष्प्रभ आहे. भलेही जयमालाताई गायकवाड यांच्या रूपाने शरद पवार यांनी ताकद लावली तरी माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्याशिवाय येथे इतरांचे काही चालणे मुश्किल आहे. दीपकआबा यांच्या तोडीचा दुसरा नेता तालुका राष्ट्रवादीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शरद पवार यांच्या पक्षाने येथे उमेदवार दिला तरीही अप्रत्यक्षरीत्या दीपकआबा हेच किंगमेकर बनू शकतात.
शेकापचे कसे असेल भविष्य?
तालुक्याच्या आजवरच्या राजकारणात शेकापने सातत्याने विजय संपादन केला आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीतच शहाजीबापू पाटील यांनी दीपकआबा यांच्या मदतीने शेकापला पराभवाची धूळ चारली होती. शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांना पदार्पणातच पराभवाची चव चाखावी लागली होती. या पराभवाचे शल्य अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे दिसते. निवडणुकीतील परभवानंतर डॉ. अनिकेत देशमुख हे मतदारसंघात फारसे सक्रिय दिसले नाहीत.
भाई गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे सध्या सक्रियपणे काम करत आहेत. भाई गणपतराव देशमुख यांच्यासारखी देहबोली, विनम्र स्वभाव आणि जनसंपर्काची आवड असलेल्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांना तालुक्यात शेकापमध्ये सहानुभूती मिळताना दिसत आहे. ते सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन विजयाला गवसणी घालू शकतात. राष्ट्रवादीची (पर्यायाने दीपकआबा यांची) ताकद मिळाली तरच हे गणित अधिक सोपे होऊ शकते.मात्र असे असले तरी पक्षांतर्गत खदखद, कुरघोड्या, पक्षविरोधी कारवाया रोखण्याचे मोठे आव्हान शेकापपुढे असेल.
इतर पक्षांचीही असणार डोकेदुखी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बीआरएस, अपक्ष अशी टक्कर देणाऱ्यांचीही संख्या मोठी असेल. आधीच राजकीय खिचडी त्यात या पक्षांनीही उमेदवार दिल्यास आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख यापैकी कोणालाही ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नसेल हे नक्की.