थिंक टँक स्पेशल

59 वर्षे एकच झेंडा आणि पक्ष : निष्ठेचं दुसरं नाव ‘भाई गणपतराव देशमुख’

Spread the love

भाई गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकावर बसले. राजकीय महत्त्वाकांक्षेतून ना त्यांना कधी शेकापसारखा छोटा पक्ष सोडावा वाटला ना कुणा सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जावे वाटले. भाई गणपतराव देशमुख हे या राजकीय पटावर तब्बल 59 वर्षे तसेच साधे सामान्यांमधले राहिले. मोटारी, बंगले, पुण्या-मुंबईत सदनिका, नातेवाईकांचे सत्तेचे जाळे असा कुठलाही मोह त्यांना स्पर्श करू शकला नाही. 

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
राजकारण हा चांगल्या माणसांचा धंदा नाही असे म्हटले जात असलेल्या युगात निष्ठा, चरित्र संपन्नता, समर्पण भावना ह्या गोष्टी केव्हाच नष्ट झाल्या आहेत. “आज तुम्ही नेमकं कुण्या पक्षात आहात” असे नेत्याला दररोज विचारण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. अशा तत्वहिन, स्वार्थी, सत्तांध, नेभळट, माकड उड्या सदृश्य राजकीय वातावरणात स्व. भाई गणपतराव देशमुख यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल 59 वर्षे एकाच पक्षाचा झेंडा खांद्यावर वाहिला. एकाच पक्षाकडून 11वेळा निवडणुका जिंकल्या. म्हणूनच निष्ठेचं दुसरं नाव म्हणजे ‘भाई गणपतराव देशमुख’ हा जणू सिद्धांत बनला आहे. (SKP Leader Bhai Ganpatrao Deshmukh Sangola)


आज सांगोल्यात भाई गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि न्यू इंग्लिश स्कूलचे “भाई गणपतराव देशमुख महाविद्यालय” नामकरण हे दोन्ही कार्यक्रम पार पडत आहेत. खा. शरद पवार, ना. देवेंद्र फडणवीस, ना. रामदास आठवले, ना. राधाकृष्ण विखे-पाटील, आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील तसेच राज्यातील दिग्गज नेते, जिल्ह्यातील आजी- माजी आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. त्यानिमित्त हा खास लेख..


वकीलसाहेब ते आबासाहेब
भाई गणपतराव देशमुख हे मूळचे पेनुर (ता. मोहोळ) येथील रहिवाशी. कायद्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सांगोला न्यायालयात वकिली करू लागले. वकिलीनिमित्त ते सांगोला येथेच स्थायिक झाले. 1962 पूर्वी जल प्रकल्पात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या. त्यांचे अनेक प्रश्न होते. अशा बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने भाई गणपतराव देशमुख यांनी कायदेशीर लढा देवून न्याय मिळवून दिला. 1962 साली ते शेतकरी कामगार पक्षाकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने “आबासाहेब” म्हणत असत.

11 वेळा एकाच पक्षाचे तिकीट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११व्यांदा त्यांनी विक्रमी विजय मिळविला. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil Sangola) यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला. एकाच पक्षाच्या तिकिटावर सलग अकरावेळा निवडून येणारे भाई गणपतराव देशमुख हे एकमेव आमदार ठरले.

1962 साली मंत्रालयात येण्यासाठी एसटीची पायरी चढणाऱ्या या लोकनेत्याने शेवटपर्यंत याच सरकारी वाहनाने प्रवास केला. प्रदीर्घ काळ लोकप्रतिनिधी राहिल्याने त्यांना सर्वाधिक निवृत्ती वेतन मिळत होते. परंतु ही सारी रक्कम त्यांनी पुन्हा समाजासाठी वापरली. आमदार म्हणून मिळणाऱ्या वर्तमानपत्रांची रद्दी विकून ती रक्कम पुन्हा सरकारदरबारी भरणारा हा नेता होता. राजकारणातून कधीच हरवलेली सचोटी, सभ्यता, साधेपणा हीच त्यांची आभूषणे होती.

राष्ट्रवादीने कधीही उमेदवार दिला नाही
राष्ट्रवादी काँग्रेसने गणपतराव देशमुख यांच्याविरोधात कधीही उमेदवार उभा केला नाही. भाई गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ (कै. आम. काकासाहेब साळुंखे – पाटील) आणि १९९५चा (ॲड. शहाजीबापू पाटील) अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच निवडून दिले. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

बहुतांश काळ विरोधी बाकांवर
भाई गणपतराव देशमुख यांना सत्तेची कधीही लालसा नव्हती. ते बहुतांश काळ विरोधी बाकांवर होते. १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केल्यावर आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. रोजगार हमी योजना मंत्री म्हणून भाई गणपतराव देशमुख यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. रोजगार हमी योजनेच्या कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले. स्त्रियांना पुरुषांएवढे वेतन देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. भाई गणपतराव देशमुख यांना इतर अनेक पक्षांच्या ऑफर असायच्या. मात्र त्यांनी पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. त्यांना सत्तेची कधीही लालसा नव्हती. शेतकरी, कामगार, मजूर, दलीत, वंचित यांच्या कल्याणाचे त्यांनी व्रत घेतले होते.

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी केलं होतं कौतुक
शेतकरी कामगार पक्षाकडून भाई गणपतराव देशमुख १५ मार्च १९६२ साली पहिल्यांदा आमदार झाले. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण (Former Chief Minister Yashwantrao Chavan) यांनीही देशमुख यांचं कौतुक केलं होतं. भाई गणपतराव देशमुख हे प्रत्येक शब्द अभ्यास करून बोलत असत. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता होती.

विद्यार्थी दशेतच शेकापचा प्रभाव
पुण्यात विद्यार्थी दशेत असतानाच गणपतराव देशमुख यांच्यावर शेकापचे मोरे, जेधे, नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. या अभ्यासवर्गाला भाई गणपतराव देशमुख उपस्थित राहत असत. निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले. ५० वर्षाहून अधिक काळ त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिलं.

पाण्यासाठी आयुष्य खर्ची घातले
कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाला मिळावे म्हणून नागनाथ अण्णा नाईकवाडी यांनी पाणी परिषदेच्या रूपाने एक लढा उभारला होता. त्यातही भाई गणपतरावांचा सक्रिय सहभाग होता. टेंभू योजनेचे पाणी आपल्या दुष्काळी सांगोला भागात आणण्यासाठी त्यांनी लढा दिला. नागनाथ अण्णा नाईकवाडी, क्रांतिसिंह नाना पाटील, तुळशीदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी लढा दिला.

भाई गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकावर बसले. राजकीय महत्त्वाकांक्षेतून ना त्यांना कधी शेकापसारखा छोटा पक्ष सोडावा वाटला ना कुणा सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जावे वाटले. कधीतरी एकदा आमदार बनलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ता, संपत्ती, डामडौल, पेहराव, भाषा यात पडत जाणारा बदल हा जनतेच्या नित्य अनुभवाचा असताना गणपतराव या राजकीय पटावर तब्बल 59 वर्षे तसेच साधे सामान्यांमधले राहिले. मोटारी, बंगले, पुण्या-मुंबईत सदनिका, नातेवाईकांचे सत्तेचे जाळे असा कुठलाही मोह त्यांना स्पर्श करू शकला नाही. 

मंत्रिपद गेल्याक्षणी सरकारी गाडीचा त्याग
गणपतआबा दोनवेळा मंत्री झाले होते. मंत्रिपद गेल्या क्षणी त्यांनी सरकारी गाडीचा त्याग केला. आपली बहुतांश कारकीर्द गणपतरावांनी विरोधी बाकांवरच काढली. मात्र, 1978 आणि 1999 सालची सरकारं त्याला अपवाद राहिली. कारण 1978 साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजशिष्टाचार, वन, खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती. तर 1999 साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता.

आमदार म्हणून ते नेहमी एसटीने प्रवास करत होते. एसटीने प्रवास करणारे आमदार म्हणून आजही त्यांना ओळखले जाते. विरोधी पक्षात राहूनदेखील कामे होऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून विकास साधला. त्यासोबतच पाण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. मुंबईत असताना सरकारी पातळीवर काम करून घेणं आणि लोकांसोबत आंदोलनात उभं राहणं या दोन्ही ठिकाणी लोकांनी गणपत आबांना कायमच पाहिलेलं आहे.

राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष
शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा राज्यातला मातब्बर पक्ष. राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असणारा शेकाप कधीही सत्तेत येऊ शकत होता. शंकरराव मोरे, नाना पाटील, सी. डी. देशमुख, केशवराव जेधे, माधवराव बागल, तुळशीदास जाधव अशा दिग्गजांनी उभा केलेला शेकाप हा पक्ष. कधीकाळी नगरसारखा संपूर्ण जिल्हा शेकापच्या लाल रंगाने व्यापला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसनंतर सर्वात महत्वाचा शेकाप हा पक्ष होता. पण त्यानंतरच्या काळात पक्षाची उतरण सुरु झाली. हळूहळू पक्षाचं अस्तित्व मर्यादित झालं. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यामुळे रायगड आणि गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोल्यात शेकापचे अस्तित्व राहिले. त्यातही १९६२ नंतर महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीमध्ये गणपतराव देशमुख पक्षासोबत प्रामाणिकपणे व निष्ठेने राहिले.

हयातीतच पराभवाचे शल्य
विधानसभेतले सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या गणपतराव देशमुख यांनी 2019 मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. पण शिवसेनेच्या अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा 768 मतांनी पराभव केला. आपल्या हयातीतच भाई गणपतराव देशमुख यांना नातूच्या रूपाने पराभव पत्करावा लागला. याचे शल्य अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे दिसून येते.

भाई गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकावर बसले. राजकीय महत्त्वाकांक्षेतून ना त्यांना कधी शेकापसारखा छोटा पक्ष सोडावा वाटला ना कुणा सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जावे वाटले. कधीतरी एकदा आमदार बनलेल्या पुढाऱ्यांच्या सत्ता, संपत्ती, डामडौल, पेहराव, भाषा यात पडत जाणारा बदल हा जनतेच्या नित्य अनुभवाचा असताना गणपतराव या राजकीय पटावर तब्बल 59 वर्षे तसेच साधे सामान्यांमधले राहिले. मोटारी, बंगले, पुण्या-मुंबईत सदनिका, नातेवाईकांचे सत्तेचे जाळे असा कुठलाही मोह त्यांना स्पर्श करू शकला नाही.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका