शहाजीबापूंनी अनिकेत देशमुखांचा हात धरला अन् समर्थकांनी केला जल्लोष
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेकापचे पराभूत उमेदवार अनिकेत देशमुखांचा हात धरून उंचावला आणि शेकाप समर्थकांनी एकच जल्लोष केला. भर स्टेजवर हे राजकीय नाट्य घडल्याने त्याची दिवसभर चर्चा होत राहिली. आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मल्ल निवडणुकीच्या मैदानात असतील का? की शेकाप दुसरा मल्ल निवडणूक रिंगणात उतरवणार याची चर्चा होताना दिसत आहे. (Bhai Ganpatrao Deshmukh Sangola)
त्याचे झाले असे की, भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी स्टेजवर दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेते स्टेजवर होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार सुरू झाले. शिवसेनेचे आमदार “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांचे सत्कारासाठी नाव पुकारण्यात आले. बापू पुढे आले आणि त्यांनी सत्कार स्वीकारला. ते सत्कार घेऊन आपल्या जागेवर जाऊन बसण्याच्या बेतात असतानाच खा. शरद पवार यांनी त्यांना हाक मारली. मात्र बापूंना आवाज ऐकू गेला नाही. (NCP chief Sharad Pawar)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात करून बापूंना शरद पवार साहेब बोलवत असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी बोलवत बापू शरद पवार यांच्याकडे गेले. सुरुवातीला त्यांनी शरद पवार यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील यांच्याही ते पाया पडले. नमस्कार वगैरे करून तेथून जात असताना शेकापचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी शहाजीबापू यांच्याशी हस्तांदोलन केले. बापूंनीही त्यांना साद दिली. हे सर्व उपस्थित मंडळी पाहत असताना बापूंनी डॉ. अनिकेत देशमुख यांचा हात हातात घेवून उंचावला. हे पाहून शेकापच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. (Shahajibapu Patil Sangola)
बापूंना दिली खुर्ची
या कार्यक्रमात स्टेजवर नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. बापू थोडे उशिरा आल्याने त्यांना बसण्यास खुर्ची नव्हती. ही बाब खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी बापूंना बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, महादेव जानकर आदी नेते स्टेजवर मागील रांगेत बसले होते. बापू मात्र खुर्ची अगदी समोर मिळाल्याने पुढील रांगेत बसले होते.
राजकीय प्रगल्भतेचे दर्शन
आमदार शहाजी पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव केला होता. मात्र या कार्यक्रमात कोणतीही राजकीय कटुता न ठेवता बापूंना निमंत्रित करण्यात आले होते.
अनिकेत देशमुख यांचे खणखणीत भाषण
शेकापचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी या कार्यक्रमात स्वागतपर भाषण केले. त्या भाषणात त्यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या राजकीय कारकीर्दीचा सविस्तरपणे आढावा घेतला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनीच निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा होती. मात्र त्यांनी वयाचे कारण देत ही निवडणूक लढवण्याचे टाळले. त्यामुळे लोकांच्या आग्रहामुळे मला शेकापकडून उमेदवारी देण्यात आली.
भाई गणपतराव देशमुख यांनी सुरू केलेली सूतगिरणी, शैक्षणिक संस्था त्याच ताकदीने पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. सांगोला सूतगिरणी सध्या आर्थिक अडचणीत आहे. शासनाने त्याला मदत करावी अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे भाषण खणखणीत होते. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात त्यांनी आपले भाषण केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांमधून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. मात्र या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे भाषण झाले नाही. त्यांच्या भाषणाची समर्थकांना उत्सुकता होती.
कार्यक्रमानिमित्ताने खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेकापचे आ. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील, मा. खा. रणजितसिंह मोहिते पाटील, खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, आम.बबनदादा शिंदे, आम.अनिल बाबर, आम. समाधान आवताडे, आम.सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार पंडितशेठ पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे नेते वैभवकाका नायकवडी, पाणी संघर्ष चळवळीचे नेते शिवाजीराव काळुंगे, पाणी संघर्ष चळवळीचे नेते बाबुराव गुरव, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा
59 वर्षे एकच झेंडा आणि पक्ष : निष्ठेचं दुसरं नाव ‘भाई गणपतराव देशमुख’
सांगोलेकरांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही