प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांना महात्मा गांधी पुरस्कार प्रदान
मुंबई : महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंती दिनानिमित्त मुंबई विद्यापिठातील संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांना येथील ‘पिपल्स आर्ट सेंटर (रजि.)’तर्फे सोमवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार सेंटरतर्फे आयोजित समारंभात आ. संजय पोतनिस यांच्या हस्ते उच्च शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातील कामगीरीसाठी डॉ. राजदीप यांना देण्यात आला. याप्रसंगी ‘पिपल्स आर्ट सेंटर’चे सचिव गोपकुमार पिल्लई व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रामाणिकपणाने केलेल्या कार्याचा हा विजय असल्याची भावना यावेळी डॉ. राजदीप व्यक्त केली.
प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांचा अल्प परिचय
डॉ. सुंदर राजदीप हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून संवाद आणि पत्रकारिता या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. “चंद्रपूर आकाशवाणी एफएम केंद्राचा त्यांच्या लाभार्थ्यांवर होणारा परिणाम” असे शीर्षक असलेल्या डॉक्टरेट प्रबंधासाठी त्यांनी अभ्यास केला आहे. नागपुरात पत्रकारितेत काही काळ काम केल्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रात रुजू झाले.
13 मार्च 2015 रोजी नवी दिल्ली येथील पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे 2015 चा राष्ट्रीय स्तरावरील बिझनेस कम्युनिकेशन ट्रेनर पुरस्कार केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री जुआओराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अशा प्रकारचे अनेक नामांकित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये संशोधनपर मांडणी केली आहे. अनेक नामांकित जर्नल्समध्ये त्यांचे रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे असंख्य विद्यार्थी विविध माध्यमांत महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत आहेत.
प्रा. डॉ. सुंदर राजदीप यांना हा महत्त्वपूर्ण पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकारिता तसेच शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.