थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक खास घोषणा केली आहे… ते लवकरच एक मराठी चित्रपट काढणार आहेत. हा चित्रपट राजकीय भाष्य करणारा असेल… (MLA Shahajibapu Patil Sangola)
काय सांगता?… हो हे खरं आहे…
त्याचं झालं असं… उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खा. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. आम्ही लवकरच एक खास सिनेमा काढणार असल्याची घोषणा केली. त्या सिनेमाचे नाव ‘द महाराष्ट्रा डायरी ऑफ खोका’ असे या सिनेमाचे नाव ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सिनेमात कलाकार कमी असतील मात्र, खोक्यांची संख्या जास्त असेल असे जाहीर केले. (MP Sanjay Raut Letest Bite)
खा. राऊत यांच्या या खळबळजनक घोषणेनंतर राजकीय घमासान सुरू झाले.
बापूंचा हाबडा
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी खा. संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. राऊत यांचा समाचार घेतानाच त्यांनी “माकडाच्या हातात कोलीत” या नावाचा बिग बजेट चित्रपट काढू असे घोषित केले.
… नको सैराट बनवा
खा. संजय राऊत यांच्यावर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांना एक चांगला सल्ला दिला.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यातील लफडे आणि शेवटी राजकीय आत्महत्या या विषयावर सैराट स्टाईल एखादा चित्रपट काढावा असा सल्ला दिला.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी पाटील यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे. हे सर्व सुरू असताना खा. संजय राऊत यांनी खोक्यांचा विषय पुन्हा उकरून काढला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी “काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी मी खोके घेऊन घरात बसणारा आमदार नाही. खोके उधळणारा आमदार आहे. दोनशेहून अधिक खोकी पत्रावळ्या सारखी उधळली असल्याचा पलटवार केला होता.
खा. संजय राऊत यांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देणारा आमदार म्हणून आ. शहाजी पाटील यांचा नावलौकिक वाढत आहे. अलीकडे ते जास्तच आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
संजय राऊत हे खरोखरच सिनेमा काढणार का हे पाहावे लागेल. आ. शहाजी पाटील हे मात्र “माकडाच्या हातात कोलीत” या नावाचा खणखणीत सिनेमा काढतील असे दिसत आहे.
हेही वाचा