कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सांगोला येथील सत्कार कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील, शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह आमदार शहाजीबापू पाटील स्टेजवर हजर होते. या कार्यक्रमात खा. शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा हात बराच वेळ हातात धरला होता. जणू यातून आगामी राजकीय वाटचालीचा इशारा होता. शेकापचे नेते स्व. भाई गणपतराव देशमुख आणि शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्यासाठी शरद पवार ताकद देवू शकतात. कारण यापूर्वीच्या बहुतांशी निवडणुकात राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेकापला पाठींबा देवून बळ दिले आहे. या निवडणुकीतही शरद पवार हा नवा डाव टाकू शकतात याची जाणीव आमदार शहाजीबापू पाटील यांना आहे. या सर्व राजकीय डावपेचाच्या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांना बळ देण्यासाठी शिंदे गटाकडून आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद दिले जावू शकते असे राजकीय जाणकारांना वाटते.
थिंक टँक स्पेशल : नाना हालंगडे
सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जाते. या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यात आपली ताकद वाढवू शकतात, असे राजकीय जाणकारांना वाटते. (Can Sangola MLA Shahajibapu Patil get a ministerial position?)
सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाने (Supreme Court verdict on political power struggle) शिंदे – फडणवीस सरकार अबाधित राहिले आहे. हा ठाकरे गटाला धक्का समजला जात आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मविश्वास व्यक्त करत आमचे सरकार कार्यकाल पूर्ण करेल अशी ग्वाही दिली आहे.
अजून २३ जणांना मंत्रिपदाची संधी
नव्या मंत्रिमंडळ विस्तारत अजून २३ जणांना मंत्रिपदाची संधी दिली जावू शकते. त्यात शिंदे गटाला सहा ते सात मंत्रिपदे तर भाजपला १६ ते १७ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. विस्ताराची जास्त डोकेदुखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. कारण, त्यांच्याकडे ४० आमदार मंत्री बनण्यासाठी इच्छुक आहेत. त्यातून सहा ते सात जणांना संधी देण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याने आता मंत्रिमंडळ विस्तार होणार का असे सह्याद्रीवरील पत्रकार परिषदेत विचारले असता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. (23 more MLAs can be given chance of ministerial post in the cabinet expansion.)
दिवंगत भाई गणपतराव देशमुख हे 55 वर्षे सांगोल्याचे आमदार होते. त्यांनी त्यांच्या काळात एक पक्ष एक झेंडा घेऊन जनतेशी एकनिष्ठ राहून 2019 पर्यंत तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला. ते सातत्याने म्हणत असत की दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार नाही. हे त्यांनी टेंभू म्हैसाळ निरा उजवा कालवा सांगोला शाखा चे पाणी आणून तालुका सुजलाम सुफलाम करून खरे करून दाखवले आहे. ते रोजगार हमी योजनेचे मंत्री होते. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.
1962 पासून शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख, विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरत आहे. सध्याच्या स्थितीला शहाजीबापू आणि दीपकआबा यांनी एकत्र येत राजकीय कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही आबा – बापू गटाने चमत्कार दाखविला आहे. या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या एकत्रित येण्याने तालुक्याच्या आगामी राजकारणाचे कंगोरे पुढे येत आहेत.
आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद मिळेल?
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..”फेम सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी होत असते. आमदार शहाजीबापू पाटील हे जनतेला तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे होता कामा नये गावातच प्रश्न सुटावेत म्हणून अधिकाऱ्यांना दौऱ्याप्रसंगी घेऊन जाऊन तेथे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेची व एक वर्षांवर विधानसभेची निवडणूक आल्याने त्यांचे दौरे वाढलेले दिसत आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी स्वतः निवडणूक लढवता नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. हा डाव साधत शहाजी पाटील यांनी ताकतीने ही निवडणूक लढवली आणि विजय खेचून आणला. तेव्हापासून सांगोला तालुक्यात शहाजीबापू पाटील यांचा करिष्मा दिसत आहे.
तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये झालेल्या अनेक लग्न सोहळ्यात आ. शहाजीबापू नववधू-वरांना आशीर्वाद देताना दिसून आले. गावोगावच्या लग्न सोहळ्यांमध्ये शहाजीबापू पाटील यांना आमंत्रित केले जात आहे. आ. शहाजीबापू पाटील हे आपल्या गावात येतात म्हटल्यावर या लग्न सोहळ्याची चर्चा होताना दिसते. विवाह सोहळे, भूमिपूजन, दुकानांचे उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांमध्ये शहाजीबापू पाटील यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले जात आहे. राज्यभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या सभांत आ. शहाजीबापू पाटील यांनी सभा दणाणून सोडल्या आहेत.
बापूंचा जलवा
आमदार शहाजीबापू पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी आंदोलनात काम केले आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे ते कार्यरत होते. दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधात त्यांनी अनेक पंचवार्षिक निवडणुका लढवल्या. एकीकडे शेकापचे भाई गणपतराव देशमुख हे विजय होऊन विक्रम करीत असताना दुसरीकडे शहाजीबापू पाटील हे पराभूत होण्याचा विक्रम करीत होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी स्वतः निवडणूक लढवता नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. हा डाव साधत शहाजी पाटील यांनी ताकतीने ही निवडणूक लढवली आणि विजय खेचून आणला. तेव्हापासून सांगोला तालुक्यात शहाजीबापू पाटील यांचा करिष्मा दिसत आहे.
सांगोला तालुक्यातील कोणत्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमात आमदार शहाजी बापू पाटील हजेरी लावतात. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या त्यांच्या डायलॉगमुळे तर त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे. या सर्व प्रसिद्धीच्या वलयाचा फायदा शहाजी बापूंची सकारात्मक इमेज बनवण्यामध्ये होताना दिसून येत आहे. सांगोला येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनातील शहाजी बापूंच्या या डायलॉगवरही चांगलेच भाष्य झाल्याचे दिसून आले.
मंत्रिपद मिळाल्यास काय फायदा?
आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या आक्रमक आणि अभ्यासू भाषणामुळे प्रसिद्ध आहेत. ते स्वत: वकील असल्याने त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. ते आमदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी तालुक्यातील प्रशासनावर वचक ठेवला आहे. सांगोला तालुक्यातील अनेक प्रलंबित रस्त्यांना त्यांनी निधी खेचून आणला आहे. सांगोला तालुक्याच्या विकासाला कलाटणी देवू शकणा-या सिंचन योजनांचे काम अजूनही रखडलेले आहे. सांगोला तालुक्याची देशात ओळख निर्माण करणारी डाळींब बागायती सध्या धोक्यात आहे. त्यालाही संजीवनी देण्याची गरज आहे. शिवाय सांगोला तालुका हा जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असल्याने सांगोला तालुक्याला मंत्रिपद मिळावे असे जाणकारांना वाटते. आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यास हे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात असे इथल्या लोकांना वाटते.
आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद शक्य?
सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचे एकमेव आमदार म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार समजले जातात. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाला बळ देण्यात आमदार शहाजीबापू पाटील हे महत्त्वाची जबाबदारी निभावू शकतात. त्यामुळे जिल्ह्यात एकमेव आमदार असललेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांना शिंदे गटाकडून मंत्रिपद मिळू शकते, असे राजकीय जाणकारांना वाटते.
मात्र शरद पवार बदलवू शकतात गणित
कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सांगोला येथील सत्कार कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील, शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह आमदार शहाजीबापू पाटील स्टेजवर हजर होते. या कार्यक्रमात खा. शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा हात बराच वेळ हातात धरला होता. जणू यातून आगामी राजकीय वाटचालीचा इशारा होता. शेकापचे नेते स्व. भाई गणपतराव देशमुख आणि शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदार करण्यासाठी शरद पवार ताकद देवू शकतात. कारण यापूर्वीच्या बहुतांशी निवडणुकात राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेकापला पाठींबा देवून बळ दिले आहे. या निवडणुकीतही शरद पवार हा नवा डाव टाकू शकतात याची जाणीव आमदार शहाजीबापू पाटील यांना आहे. या सर्व राजकीय डावपेचाच्या पार्श्वभूमीवर आमदार शहाजीबापू पाटील यांना बळ देण्यासाठी शिंदे गटाकडून आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रिपद दिले जावू शकते असे राजकीय जाणकारांना वाटते.