थिंक टँक स्पेशल

शरद पवारांनी आयुष्यात दुसरे केले काय?

संजय आवटे यांचा खळबळजनक लेख

Spread the love

पक्षाचा विरोध, प्रथापितांचा विरोध, कुटुंबाचा विरोध असं सगळं आव्हान परतवत पुढे जाणं हे शरद पवारांना काही नवं नाही. आपल्याला पवार अलीकडचे माहीत आहेत. पण मला कायम गंमत अशी वाटते की, शरद पवारांना प्रभावित करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? म्हणजे, शरद पवारांना शरदचंद्र पवार असं म्हटलं जातं. त्यामध्ये एक योगायोग आहे. शरद पवारांना ज्या लोकांनी प्रभावित केलं, त्यातला एक माणूस होता शरदचंद्र सिन्हा. शरदचंद्र सिन्हा हे आसामचे माजी मुख्यमंत्री.

“शरद पवार यांच्यासाठी आजचा काळ किती कठीण आहे?”, असं मला माझ्या तरुण मित्रानं विचारलं, तेव्हा मी नेमका ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती पुन्हा चाळत होतो.

शरद पवार यांच्यासाठी आजचा कालखंड आव्हानात्मक आहे, हे खरंय. पण शरद पवारांनी अनेक चढ-उतार आजवर पाहिलेले आहेत. त्यामुळे आपल्या आदर्शवादासाठीचा अशा प्रकारचा संघर्ष त्यांना नवा नाही.

तुम्ही गंमत बघा. शरद पवार पुणे शहर युवक काँग्रेसचे सचिव झाले तो साधारणपणे १९६० चा काळ होता. तेव्हा ते अवघ्या वीस वर्षांचे होते. तेव्हाचा घटनाक्रम फार महत्त्वाचा. म्हणजे, बारामती मतदारसंघातून १९५७ ला दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली, तेव्हा केशवराव जेधे निवडून आले होते. केशवराव जेधे हे फार मोठं प्रस्थ होतं. त्यांच्या पश्चात पोटनिवडणूक झाली, कारण त्यांचं निधन झालं. काँग्रेसने केशवरावांचे चिरंजीव गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने शरद पवारांचे थोरले बंधू ॲडव्होकेट वसंतराव पवार यांची उमेदवारी होती. मजा अशी होती की, शरद पवार हे पुणे शहर युवक काँग्रेसचे सचिव होते. काँग्रेसने केशवराव जेधेंच्या मुलाला उमेदवारी दिली होती. आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने उमेदवारी दिली होती वसंतराव पवार यांना. शरद पवारांच्या कुटुंबातले सगळेच जण संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम बघत होते. अशा वेळी शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते. यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व त्यांनी मनोमन स्वीकारलेले होते. यशवंतराव चव्हाणांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. एस. एम. जोशी, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील यांनी पुन्हा तेथे संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने निवडणुकीचं रान पेटवलेलं होतं. आता कुटुंबात चर्चा सुरू झाली की शरद पवारांची भूमिका काय असणार आहे? कारण शरद पवारांचे सख्खे बंधू निवडणुकीला उभे होते. शरद पवारांची जडणघडण ज्यांनी केली, त्यामध्ये त्यांच्या आईंचा, ज्यांना ते ‘बाई’ असं म्हणतात, शारदाबाई यांचा वाटा सगळ्यात मोठा होता.

वसंतराव यांच्याविषयी शरद पवारांना आणि त्यांच्या कुटुंबालाच प्रेम होतं. आता ते काय करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. पण तेव्हा स्वतः वसंतराव शरद पवारांना म्हणाले, ‘तू काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली आहेस; तर काम त्याच पक्षाचं आणि त्यांच्याच उमेदवाराचं केलं पाहिजेस.’ खरं म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राच्या नंतरची ही पहिली पोटनिवडणूक होती. १९५७ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला होता. त्यामुळे दिल्लीतल्या सगळ्या काँग्रेस नेतृत्वाचं या निवडणुकीकडे लक्ष होतं. पुढे काय होणार, अशी प्रचंड धाकधूक होती. या वेळी आई शारदाबाई यांची भूमिका खूप वेगळी होती. त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. एका अर्थाने नेत्यापण होत्या. पण त्यांनी शरद पवारांना सांगितलं की, तुझ्या विचारांत स्पष्टता आहे, याचा मला आनंद आहे. त्यामुळे तू प्रामाणिकपणे काँग्रेसचंच काम केलं पाहिजेस. कुटुंब की पक्ष या प्रकारचा निर्णय घेताना कुठलीही घालमेल न होता शरद पवारांना त्या वेळी निर्णय घेता आला.

निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये शरद पवारांचे बंधू वसंतराव पवार पराभूत झाले. काँग्रेस विजयी झाली आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांना शरद पवारांविषयी आणखी प्रेम वाटू लागले. मुद्दा असा की, या प्रकारचा निर्णय शरद पवारांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता जो कुटुंबातला वाद सुरू आहे, त्याच्या पलीकडे शरद पवार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.

एवढेच नाही. शरद पवार जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, तोही प्रसंग फार भारी आहे. तो अनेकांना माहिती नसेल. तो प्रसंग लक्षात घेतला तर एकूणच आजचे आव्हान शरद पवार किती सहजपणे पेलू शकतात, याचा अंदाज येईल. शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले तो घटनाक्रम भन्नाट आहे. साधारणपणे १९६६ मध्ये काँग्रेसचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी शरद पवारांना विचारले की, बारामतीमधून विधानसभेची संधी मिळाली तर निवडणूक लढशील का?

शरद पवारांचा बारामतीमध्ये संपर्क दांडगा होता. ते खूप तयारी करत होते. तरुण होते, पण खूप काम करत होते. माणसांना भेटत होते. त्यामुळे शरद पवारांनी तयारी आहे, असं सांगितलं. तेव्हा काँग्रेस पक्षात स्थानिक संघटनेला फार महत्त्व होतं. स्थानिक लोक काय म्हणतात, हा सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा होता. त्यामुळे शरद पवारांचं नाव पुढे आलं असलं तरी स्थानिक लोकांचा निर्णय अधिक महत्त्वाचा होता.

स्थानिक लोक मात्र शरद पवारांच्या विरोधात होते. बहुतेक एकदा का हा वर गेला की आपण संपू, अशी त्यांना ‘सार्थ’ भीती होती. त्यामुळे त्यांनी ‘नाही’ अशी भूमिका घेतली. आणि, तालुक्यांतून प्रदेशाकडे एक विरुद्ध अकरा अशी शिफारस गेली. जवळपास सगळ्या तालुक्यांनी त्यांना विरोध केला. शरदला उमेदवारी दिली तर कॉंग्रेस पराभूत होईल, अशा प्रकारचा निर्णय जिल्हा शाखेकडून प्रदेशकडे गेला. त्या वेळी यशवंतराव चव्हाणांचा शरद पवार यांच्यावर विश्वास होता. पण पवार अवघ्या २६-२७ वर्षांचे होते. अशा नवख्या उमेदवाराला विरोध स्वाभाविक होता.

यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) मात्र ठाम होते. पवारांना विरोध करणाऱ्या एका नेत्याला यशवंतरावांनी विचारलं, ‘महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण २७० जागा आहेत. त्यापैकी किती जागांवर काँग्रेस विजयी होईल?’ त्या वेळी त्याने म्हटलं, “दोनशे जागांवर विजय नक्की आहे.” यशवंतराव म्हणाले, “याचा अर्थ आपले सत्तरेक उमेदवार पराभूत होतील.” तो म्हटला, “हो. होऊ शकतील!” मग यशवंतराव चव्हाण म्हणाले, “ठीक आहे. मग ७१ पराभूत होतील. बारामतीमध्ये शरद पराभूत होईल, असे गृहीत धरा. पण त्याला उमेदवारी द्या.”

उमेदवारी दिली गेली. पण त्याच्यानंतर प्रचंड त्रास झाला. अनेकांनी राजीनामे दिले. सगळ्या अंतर्गत विरोधकांनी एकवटून बाबालाल काकडेंसारखा तगडा उमेदवार उभा केला. तेव्हा शरद पवारांच्या पाठीशी जे लोक होते ते सगळे तरुण होते. ‘प्रस्थापितांच्या विरोधातला लढा’ असे त्याला स्वरूप होते. कल्पना करा, हा लढा किती कठीण होता! प्रस्थापितांच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे, असे म्हणून शरद पवारांनी ती निवडणूक लढवली.

सगळे प्रस्थापित एकवटलेले होते. तेव्हाची काँग्रेस अत्यंत तुल्यबळ होती. तेव्हाच्या काँग्रेसमधल्या सगळ्या स्थानिकांचा विरोध असतानासुद्धा बारामतीमध्ये नवखे लोक पवारांसोबत उभे राहिले. अर्थातच तेव्हा यशवंतराव चव्हाण सोबत होते. पण शरद पवारांच्या सोबत मुख्यत्वे तरुण उभे राहिले, नवी फळी उभी ठाकली. डॉक्टर उभे राहिले, व्यापारी उभे राहिले, शिक्षक उभे राहिले, विचारी माणसे उभी राहिली आणि शरद पवार आमदार झाले. एवढ्या कमी वयात, अवघ्या २७व्या वर्षी आमदार होणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण, शरद पवार आमदार झाले. पहिल्याच निवडणुकीमध्ये जिंकून आले. त्यानंतर आतापर्यंत एकही निवडणूक नाही की, ज्यामध्ये शरद पवार पराभूत झाले.

अशा प्रकारे पक्षाचा विरोध, प्रथापितांचा विरोध, कुटुंबाचा विरोध असं सगळं आव्हान परतवत पुढे जाणं हे शरद पवारांना काही नवं नाही. आपल्याला पवार अलीकडचे माहीत आहेत. पण मला कायम गंमत अशी वाटते की, शरद पवारांना प्रभावित करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? म्हणजे, शरद पवारांना शरदचंद्र पवार असं म्हटलं जातं. त्यामध्ये एक योगायोग आहे. शरद पवारांना ज्या लोकांनी प्रभावित केलं, त्यातला एक माणूस होता शरदचंद्र सिन्हा. शरदचंद्र सिन्हा हे आसामचे माजी मुख्यमंत्री.

शरद पवारांनी एक प्रसंग सांगितला आहे की, काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबईमध्ये होते. तेव्हा सगळ्यांची व्यवस्था बाकी सहकारी आणि तरूण शरद पवार करत होते. तेव्हा सीएसटी म्हणजे पूर्वीचे व्हीटी स्टेशन तिथे होते. सगळ्या मान्यवर लोकांना घ्यायला कार्यकर्ते आलेले होते. तेव्हा एक उंच आणि सडपातळ व्यक्ती एका हातामध्ये बॅग आणि डोक्यावर वळकटी अशा अवतारामध्ये चालत येत होती. सगळ्यांना तो साधा माणूस वाटला. मात्र नंतर पवारांच्या लक्षात आले की, हा साधा माणूस नाही. हे आहेत शरदचंद्र सिन्हा. आसामचा मुख्यमंत्री असलेला हा माणूस. डोक्यावर वळकटी घेऊन, हातात बॅग घेऊन चालत सुटतो आणि ७२ तास प्रवास करतो, तेही कुठून? गुवाहाटीमधून. आता गुवाहाटी म्हटले की तुम्हाला भलतंच काही आठवेल! कामाख्यादेवीच्या गुवाहाटीतून ७२ तास रेल्वेने प्रवास करत हा माणूस मुंबईत येतो. डोक्यावर वळकटी घेऊन अधिवेशनाला जातो. तो आसामचा मुख्यमंत्री असतो. तेव्हा शरद पवार म्हणतात – ‘माझ्या असं लक्षात आलं की खरी श्रीमंती ही आहे. त्यांचं साधेपणच अत्यंत श्रीमंत आहे. या साधेपणानं मी आकर्षित झालो.’

शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असे अनेक पैलू आहेत. दुसरी गोष्ट अशी की, कुटुंबात पेचप्रसंग कसा असतो, त्यावर कसा मार्ग काढायचा असतो, याचं त्यांना नेमकं भान आहे. यापूर्वी त्यांनी अनुभवलंय की, कुटुंबातले पेचप्रसंग आदर्शवादापेक्षा महत्त्वाचे नसतात. हा संस्कार त्यांच्या कुटुंबानेच केलेला आहे. आणि, प्रस्थापितांना विरोध करून नव्या फळीला सोबत घेऊन निवडणूक कशी जिंकायची, हे तर त्यांनी सिद्धच केले आहे!

‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात शरद पवारांनी जे सांगितले आहे, कदाचित त्या सगळ्याचा पुरावा पुन्हा मिळावा, असा आजचा कालखंड आहे. आणि, शरद पवारांचा प्रवास लक्षात घेता, त्यांचं ‘बेसिक’ पुन्हा त्यांना खुणावतं आहे! काय घडेल, ते यथावकाश समजेलच; पण हा इतिहास संदर्भासाठी महत्त्वाचा!

– संजय आवटे (लेखक नामवंत संपादक आहेत.)


संजय आवटे यांचे गाजलेले लेख

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका