थिंक टँक स्पेशल

शरद पवारांनी अध्यक्षपद का सोडले?

संजय आवटे यांचा खळबळजनक लेख

Spread the love

शरद पवारांनी स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. पवारांविषयीच्या प्रेमाची लाट पुन्हा उसळली. या पक्षावर हुकुमत माझीच आहे, यासाठीही खुंटी हलवून बघता आली. उद्या भलता-सलता निर्णय घेण्याची अपरिहार्यता आलीच (ती येऊ शकते!) तर त्या पापातून मुक्तीची वाट मिळाली. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना सुप्रियांचे मौन जेवढे बोलके होते, तेवढाच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा पुढाकार सूचक होता. त्यामुळे, हे वाटते तेवढे सहज नाही.

शरद पवारांनी १० जून १९९९ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा ‘शरद पवार’ या चेह-याशिवाय या नवजात पक्षाकडे काही नव्हते. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडणा-या पवारांचे तेव्हा आडाखे वेगळे होते. कॉंग्रेस तेव्हा सत्तेत नव्हती. आघाडी सरकारांचे पर्व सुरू होते. राजकारणात नवख्या असलेल्या सोनियांना फार काही जमेल, असे पवारांसह अनेकांना वाटत नव्हते. त्यामुळे प्रादेशिक पक्ष स्थापन करून स्वतःचे स्थान मजबूत करत न्यायचे, असा होरा पवारांचा होता. देशाने तोवर एच.डी. देवेगौडांसारखे पंतप्रधान पाहिले होते. पवारांचा दावा तर त्याहून नक्कीच मोठा होता. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेले शरद पवार बाहेर पडले, तेव्हा असे चित्र होते.

व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेशिवाय पवारांची तेव्हा काही भूमिका नव्हती. शरद पवारांनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर भलेभले त्यांना ‘जॉइन’ झाले. कॉंग्रेसने सत्ता गमावलेली होती. पुन्हा येण्याची शक्यता नव्हती. सोनियांच्या नेतृत्वाविषयी शंका होती. शिवाय, सोनियांशी ‘ॲक्सेस’ नव्हता. ‘शरद पवार’ या नावाचा दबदबा राज्यात तरी त्याहून मोठा होता. स्थानिक हितसंबंध आणि अस्तित्वाचे प्रश्न असल्याने ठिकठिकाणचे सरदार एकवटले. त्यातून हा पक्ष उभा राहिला.

अनेकांचे अंदाज खोटे ठरले आणि २००४मध्ये सोनियांनी कॉंग्रेसला जिंकून दिले. केंद्रात कॉंग्रेसची आघाडी सत्तेत आली. त्यामुळे सोनियांच्या नेतृत्वाखालीच पुढे पवारांना केंद्रात दहा वर्षे काम करावे लागले. अर्थात, त्यापूर्वी १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात एकत्र आले. जन्मापासून सत्तेत असणारा हा पक्ष वाढत गेला. राज्यातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष झाला. २००४च्या निवडणुकीत तर तो राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला.

हे कर्तृत्व शरद पवारांचे. आपल्या प्रतिमेच्या आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर त्यांनी राज्यभरात हा पक्ष पोहोचवला. शरद पवार नावाची जादू उत्तरोत्तर वाढत गेली. तरूणांसोबतच महिलाही मोठ्या संख्येने या पक्षासोबत आल्या. केडर तयार झाले.
२०१४पर्यंत असे सगळे ठीक चालले होते.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीने सगळे संदर्भच बदलून टाकले. जन्मापासून सत्तेचा चमचा तोंडात असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेतून बाहेर गेली. देशात कॉंग्रेसची वाताहत झाली. राज्यातही स्थिती बिकट झाली. तरीही नव्या राजकारणात ‘रिलिव्हंट’ राहण्याचा प्रयत्न पवार करत राहिले. त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दुर्दैवी कालखंडाने पवारांना बरेच काही शिकवले आहे. ज्या इंदिरा गांधींना यशवंतरावांनी विरोध केला, त्या इंदिरा पुन्हा सत्तेत आल्या आणि यशवंतरावांचे राजकीय करीअरच संपुष्टात आले. सोनियांना विरोध करणा-या पवारांचे असे झाले नाही, यात सोनियांकडे असलेले कमी राजकीय भांडवल आणि सोनियांचा चांगुलपणा ही कारणे आहेतच. पण, पवारांचे सावधपणही आहे. संदर्भ कितीही बदलोत, आपण ‘रिलिव्हंट’ राहायचे हे पवारांना नीट कळलेले आहे.

कॉंग्रेससारख्या बलाढ्य पक्षाला आव्हान देऊन स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजाराने गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन अजिबातच सामान्य नाही. तरीही, २०१९च्या लोकसभा निवडणुकीने चित्र बदलले. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आले. पवारांना सोडून लोक भाजपमध्ये जाऊ लागले.

त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. ‘इडी’वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते पवारांनी करून दाखवले. भाजपला दूर सारून सरकार बनवले. शरद पवार हे महाराष्ट्राचेच काय, देशातले शक्तिमान नेते ठरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा बळ मिळाले. तरूण मोठ्या संख्येने पक्षात आले. देशातले वातावरण तोवर पार बदलले होते. राजकारणाची परिभाषा बदलली होती. नामोहरम झालेल्या कॉंग्रेसकडे नेता नव्हता. संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, अशी सर्वांची खात्री होती. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शरद पवारांचे तेज विलक्षण वाढलेले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी शरद पवारच सरकारचे पालक झाले.

भारतीय राजकारणाच्या पटलावरचा हा ‘लास्ट मुघल’ आहे! आणि, कोणी कितीही प्रयत्न करू द्या, हा मुघल अद्यापही ‘अभ्यासक्रमा’त आहे. तो अभ्यासक्रमात आहे, तोवर पेपर एवढा सोपा नाही, याचे भान हुकुमशहांनाही आहे!

हळूहळू चित्र बदलत गेले. उद्धव ठाकरे यांची आपली अशी प्रतिमा तयार होत गेली. ते स्वतःच सरकार चालवत राहिले. महाविकास आघाडी सरकार पुढे अपेक्षेप्रमाणे कोसळले. पवारांनी सरकार बनवले, पण ठाक-यांना वाचवता आले नाही, अशी प्रतिमा व्हायला हवी होती. झाले उलटेच. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या सहानुभूतीची प्रचंड लाट तयार झाली. उद्धव ठाकरे यांना असा सर्वस्तरीय जनाधार मिळू लागला, जो बाळासाहेबांनाही कधी मिळाला नव्हता. वज्रमूठ सभांचाही चेहरा उद्धव हाच झाला. बाकी सगळे नेते मागे पडले आणि उद्धव ठाकरे नायक झाले. एकटे उद्धवच नाही, आदित्यसुद्धा. त्या तुलनेचा कोणीही नेता आज राज्यात विरोधकांकडे नाही. महाविकास आघाडी सरकार पडले खरे, पण नवे सरकार लोकांनी ना स्वीकारले, ना ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती ओसरली!

तिकडे, ‘पप्पू’ ठरवले गेलेले राहुल गांधी चालत राहिले आणि ‘चालू लागले’! खासदारकी गेल्यावर तर राहुल आणखी मोठे झाले. त्याचा परिणाम राज्यात झाला आणि देशातही. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. त्यांचा पक्ष गेला, चिन्ह गेले. राहुल यांनी खासदारकी सोडली. त्यांचा बंगला गेला. महाविकास आघाडीतील या दोन्ही पक्षांचे तेज वाढले.

उलट शरद पवारांविषयी संशयाचे धुके तयार झाले. ‘एनडीटीव्ही’ला दिलेली मुलाखत, तिकडे नागालॅंडात भाजपला पाठिंबा, गौतम अदानींसोबत भेटीगाठी, विरोधकांच्या बैठकीला गैरहजेरी, अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी वावडी. त्याहीपूर्वी क्रिकेटच्या राजकारणासाठी विरोधकांसोबत फुगडी. उद्धव आणि राहुल सगळ्यांना अंगावर घेत असताना, पवार मात्र फक्त ‘राजकारण’ करताहेत, अशी चर्चा मोठ्या आवाजात होऊ लागली.

याला प्रतिवाद करणे भाग होते. आपल्या प्रतिमेचे वलय वाढवायचे कसे, हे शरद पवारांना समजते. उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. राहुल यांनी खासदारकी सोडली. शरद पवारांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले.

शरद पवारांनी स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले. पवारांविषयीच्या प्रेमाची लाट पुन्हा उसळली. या पक्षावर हुकुमत माझीच आहे, यासाठीही खुंटी हलवून बघता आली. उद्या भलता-सलता निर्णय घेण्याची अपरिहार्यता आलीच (ती येऊ शकते!) तर त्या पापातून मुक्तीची वाट मिळाली. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना सुप्रियांचे मौन जेवढे बोलके होते, तेवढाच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा पुढाकार सूचक होता. त्यामुळे, हे वाटते तेवढे सहज नाही.

नक्की कारणं काय आहेत, ते पुढे येईलच.
पण, हे ‘शरद पवार’ आहेत.
अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा कधी सुरू झाल्या, ते आठवा! शरद पवारांनी संजय राऊतांच्या मार्फत तो प्लान ‘लीक’ केला. चर्चाच एवढी झाली की पुढे करणार तरी काय? एकदम शांतता पसरली. कित्येक डाव उधळले गेले. (काही अद्यापही बाकी आहेत!) महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाही पवारांनी अनेकांना कात्रजचे घाट दाखवले. जे जे शक्य ते पवार प्राणपणाने करत राहिले.

पवार मूल्यांशी तडजोड करतात, असे वाटत असले आणि त्यांच्या राजकारणाचा बाज ‘करीअर’चा असला, तरीही निर्णायक क्षणी शरद पवार विरोधकांच्या नाकात पाणी घालतात. म्हणून शरद पवार हे ‘शरद पवार’ आहेत. थेटपणे ते बाह्या सरसावून हुतात्मा होत नाहीत. अनेकदा काठावर असतात. अधिक सावध असतात. पण, ‘रिलिव्हंट’ राहून शांतपणे अखेर तेच करतात, जे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

म्हणूनच, ८२ वर्षांचा हा नेता पक्षाचे अध्यक्षपद सोडतो म्हटल्यावर महाराष्ट्रभर असा हलकल्लोळ होतो. पक्ष आता ‘राष्ट्रीय’ नसला, तरी देशभर बातमी होते.

भारतीय राजकारणाच्या पटलावरचा हा ‘लास्ट मुघल’ आहे!
आणि, कोणी कितीही प्रयत्न करू द्या, हा मुघल अद्यापही ‘अभ्यासक्रमा’त आहे. तो अभ्यासक्रमात आहे, तोवर पेपर एवढा सोपा नाही, याचे भान हुकुमशहांनाही आहे!

पवारांकडून अद्यापही खूप अपेक्षा आहेत.

(नोंद- ‘लास्ट मुघल’ हा शब्दप्रयोग इथे वाक्प्रचाराप्रमाणे घ्यावा. ‘अखेरचा राजकारणी’ अशा अर्थाने. तो शब्दशः घ्यायचा नसतो.)

– संजय आवटे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका