गुन्हेगारी
Trending

आधी मैत्री करायचा, मग चुना लावायचा

विश्वासघाताने २५ गाड्या नेऊन विकल्या

Spread the love

फिरायचा बहाणा करून नेलेल्या वाहनांना तो बाजारचा रस्ता दाखवायचा. वाहनांची परस्पर विक्री करून मौज करत होता. हे प्रकरण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कामती पोलीस ठाण्यात दाखल होताच संशयित आरोपीचा छडा लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. १ कोटी २० लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी वाहने जप्त करून पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
हे जग विश्वासावर चालते असे नेहमी म्हटले जाते. मात्र, याच विश्वासाला पद्धतशीरपणे चुना लावणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात. सोलापूर जिल्ह्यातील अशाच एका विश्र्वासघातकी तरुणाने “फिरून येतो, जरा तुमची कार गाडी द्या” असे सांगून तब्बल २५ वाहनांना बाजाराचा रस्ता दाखविला. ही बातमी वाचल्यावर तुमचीही मती गुंग झाल्याशिवाय राहणार नाही. काय आहे भानगड सविस्तर वाचा…

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एक भयानक प्रकरण उघडकीस आणले आहे. लोकांना लाखो रुपयांना गंडविणाऱ्या एका अट्टल सराईताच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त करण्यात आलेली वाहने.

गणेश हिंदूराव माडकर (हराळवाडी, ता. मोहोळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गणेश माडकर हा या भागात मैत्री करून विश्वास संपादन करत होता. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, त्याला हेरायचा. त्यांच्या सोबतच मैत्री करायचा. लोकही आपल्याच गावाचा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचे. फिरायला जायचं आहे, असं सांगत चारचाकी वाहन तो घेऊन जात होता.

फिरायचा बहाणा करून नेलेल्या वाहनांना तो बाजारचा रस्ता दाखवायचा. वाहनांची परस्पर विक्री करून मौज करत होता. हे प्रकरण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कामती पोलीस ठाण्यात दाखल होताच संशयित आरोपीचा छडा लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. १ कोटी २० लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी वाहने जप्त करून पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे.

चैनीसाठी लोकांना गंडवायचा
गणेश माडकर हा सोलापूर येथे कामाला होता. ज्या ठिकाणी नोकरी करत होता, तेथे त्याला पुरेसा पगार मिळत नव्हता. गणेशला सुखाचीन जीवन जगण्याचा नाद होता. मात्र, त्यामधून त्याची चैन भागत नव्हती. तो गावी आल्यानंतर गावातील तसेच जवळपासच्या गावातील ज्या नागरिकांकडे चारचाकी वाहन आहे, अशा लोकांना विश्वासात घेवून त्यांच्याशी मैत्री करायचा. मला फिरायला जाण्यासाठी गाडी पाहिजे, असं सांगून तो वाहन घेवून जायचा. आणि परत न करता वाहने परस्पर विकायचा.

हे प्रकरण आले अंगलट
काही दिवसांपूर्वी गणेशने मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील एका नागरिकास विश्वासात घेवून त्याच्याकडून स्विफ्ट डीझायर कार ( एम.एच.-13/डीटी-2402) ही गेल्या महिन्यात २२ फेब्रुवारी घेवून फिरून आल्यानंतर परत करतो, असं सांगून घेवून गेला होता. पण तो वाहन परत देतच नव्हता. चारचाकी वाहनधारकाने गणेशकडे वेळोवेळी कारची मागणी केली होती.

पण तो टाळाटाळ करत होता. “आज देतो, उद्या देतो” असं सांगून वेळ मारून नेत होता. तसेच गणेश अनेक दिवसांपासून गावातूनही गायब झाला होता. अखेर वाहन मालकाने कामती पोलीस ठाण्यात गणेश माडकर विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याचा तपास करत, मोबाइल लोकेशन काढले आणि त्याला ताब्यात घेतले.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, कामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश माने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन माने व पथक हे करत होतं.

कारच नव्हे ट्रॅक्टरही विकला
संशयित आरोपी गणेश माडकर याला विश्वासात घेवून तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. कामती व त्याभागातील ट्रॅक्टर, बलेनो, बोलेरो, स्कॉर्पिओ, इर्टीगा, क्रुझर, इनोव्हा, स्वीप्ट कार व मोटारसायकल अशी एकूण २५ वाहनं त्यानं विश्वासानं ताब्यात घेतली आणि ती परत केली नसल्याची माहिती दिली. कामती पोलीसांनी केलल्या तपासामध्ये ८ ट्रॅक्टर, १४ जीप/कार, व ४ मोटार सायकल अशी एकूण २५ वाहने जप्त केली आहेत. याची एकूण किंमत १ कोटी २० लाख ५० हजार रुपये इतकी आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी गणेशला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी कामती पोलीस ठाणेमधील पोलीस अंमलदार बबन माने, यशवंत कोटमळे, अमोल नायकोडे, भरत चौधरी, जगन इंगळे यांनी पार पाडली आहे.

विश्वासाला काळीमा फासला
गावातील तसेच जवळपासच्या गावातील ज्या नागरिकांकडे चार चाकी वाहने आहेत अशा लोकांना विश्वासात घेवून मला फिरायला जाण्यासाठी गाडी पाहिजे असे सांगून वाहन घेवून ते परत न करता त्याचा परस्पर अपहार करत होता. लोकांनी दाखविलेल्या विश्वासाला त्याने काळीमा फासला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका