थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
शेतजमिनीतील विहिरीच्या पाळीवरून भावकीतीलच कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात दोनजण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जत तालुक्यातील कोसारी येथे ही थरारक घटना घडली. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे कोसारी व कुंभारी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
विलास नामदेव यमगर, वय 45 व प्रशांत दादासो यमगर, वय 23 या चुलत्या पुतण्याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर व एका महिलेचा समावेश आहे. या चौघांवर देखील जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्यासह मोठा पोलीसफाटा कोसारी येथे दाखल झाला आहे. या घटनेने गावात प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोसारी (ता. जत) पासून पाच किलोमीटर अंतरावर म्हारनूरवस्ती येथे यमगर कुटुंबीयांची मोठी शेती आहे. या शेतीतील चार गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून हा वाद झाल्याचे समजते.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास यमगर यांच्या भावकितीलच संशयित दहा ते बारा हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार, चाकू , कुऱ्हाड , दगड, दांडक्यांनी जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विलास नामदेव यमगर, वय 45 व प्रशांत दादासो यमगर, वय 23 या चुलत्या पुतण्याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, विजय विलास यमगर व एका महिलेचा समावेश आहे.
घटनेनंतर आरोपींनी पलायन केले आहे. पोलीस तपासाची चक्रे गतीने फिरवत आहेत.
पाण्यामुळे गाव बनले सधन
जत तालुक्यातील कोसारी हे सधन गाव आहे. शेतीसाठी म्हैसाळचे पाणी आल्याने चांगलीच सुबत्ता आलेली आहे. जमिनीचे दरही गगनाला भिडणारे असेच आहेत. खर तर वरील कोल्हापूर, सांगली भागात गेल्या सारखेच येथील वातावरण आहे. येथील शेती हा मुख्य व्यवसाय असून,आज जी खुनाची घटना घडली त्यालाही शेतीचा वादच कारणीभूत ठरला आहे.
चार पथके रवाना
कोसारी येथे खुनाची जबरी घटना घडली असून याच्या तपासासाठी जत व उमदी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. खून करणारे संशयित त्याचवेळी फरार झाले आहेत. गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आलेले आहे.
शिक्षण घेत असलेला तरुण ठार
या हल्ल्यात ठार झालेला प्रशांत यमगर हा बी.एससी. शिकत होता. आज शनिवार असल्याने कॉलेजला सुटी असल्याने तो घरीच होता. सकाळी दहाच्या सुमारास दहा ते पंधरा जणांचा जमाव हातात चाकू, कुऱ्हाड, दगड घेऊन चाल करून आला. या हल्ल्यात घाव वर्मी बसल्याने विलास यमगर आणि प्रशांत यमगर हे चुकते आणि पुतणे जागीच ठार झाले. शेतात ही घटना घडली आहे. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अत्यंत निर्दयीपणे हा हल्ला करण्यात आल्याचे दिसून येत होते.
ही घटना उघडकीस येताच परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोसारी हे गाव सांगोला (जि. सोलापूर) आणि जत (जि. सांगली) या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर आहे. सांगोला तालुक्यातील डिकसळ गावापासून हे गाव खूप जवळ आहे.