सांगोल्यात खुनाचा थरार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा खून

सांगोला : नाना हालंगडे
एरव्ही शांत असलेल्या सांगोला तालुक्यात खुनाच्या घटना सतत घडू लागल्या आहेत. वासुद अकोला येथील पोलिसाच्या खुनाची घटना ताजी असतानाच सांगोला तालुक्यातील कोळा येथे एका तरुणाने तरुणीचा निर्घृण खून केला आहे. या घटनेने सांगोला तालुका हादरला आहे.
लग्न करण्यास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून संतप्त झालेल्या प्रियकराने अज्ञात हत्याराने तरुणीच्या गळ्यावर, डोक्यात, हातावर वार करुन तिचा खून केल्याची घटना ईराचीवाडी कोळा (ता. सांगोला) येथे शनिवार (ता. 16) रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
ऋतुजा दादासो मदने (रा. ईराचीवाडी, कोळा, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत मयत तरुणीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी पांडुरंग दाजीराम सरगर यांची बहिण सावित्रीबाई दादासो मदने ही तिच्या कुटुंबासह राहत असून तिचे पती दादासो शिवाजी मदने हे जन्मापासुन मुकबधीर व पायाने अपंग आहेत. तसेच सावित्रीबाई ही एका पायाने अपंग आहे.
फिर्यादीची भाची ऋतुजा दादासो मदने ( वय १८) हिचा विवाह कोळा येथील समाधान कोळेकर यांचेबरोबर अडीच वर्षापूर्वी झाला होता. त्यानंतर ऋतुजा व समाधान कोळेकर याचा कोर्टातून घस्टफोट झाला आहे. ऋतुजा ही आईवडीलांसोबत राहत असून महाविद्यालयीन शिक्षण घेत होती.
दरम्यान, ऋतुजा हीचे लग्न होण्यापूर्वी गौडवाडी येथील सचिन मारुती गडदे याने तीचे लग्न होवू न देण्याचा प्रयत्न केला होता. माझेबरोबर लग्न झाले पाहिजे असे म्हणाला होता. दरम्यान ऋतुजा हीचा घटस्फोट झाल्यानंतर सचिन हा तिच्या संपर्कात आला होता. ते दोघेजण एकमेकाना भेटत असताना लग्न करण्यासाठी सचिन दबाव टाकत होता.
सुरुवातीला ऋतुजा ही सचिनसोबत लग्नाला तयार होती परंतु घरच्यांनी लग्न थांबवले होते. एक महीन्यापूर्वी सचिन याने फिर्यादी पांडुरंग सरगर यांची भेट घेवून ऋतुजा हीचे एका मुलासोबत संबंध ते असून ते पळून जावून लग्न करणार असल्याचे सांगितले. त्याने त्या मुलाचे आणि ऋतुजा यांचे मोबाईलमधील फोटो आणि कॉल रेकॉर्डींग दाखवले होते. ती माझी झाली नाही तर मी तीला कोणाचीच होवू देणार नाही असे म्हणून ऋतुजा ही लग्नास तयार नसल्याने सचिन तिच्यावर चिडून होता.
दरम्यान, शनिवार १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ऋतुजाची आई सावित्रीबाई मदने या दूध घालण्यासाठी डेअरीवर गेल्यावर उशीराने परत येतात. तर वडील दादासो मदने हे मुकबधीर आहेत. त्यावेळी ऋतुजा ही घरी एकटीच असल्याची संधी साधून सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला)
याने कोणत्यातरी घातक हत्याराने ऋतुजा हिच्या गळ्यावर, डोक्यात, हातावर वार करुन तिला गंभीर जखमी करून तिचा खून केला अशी फिर्याद मयत ऋतुजा हीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे. या खुनाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात हे करीत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी
खुनाची घटना पोलिसांना समजताच सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाबाबत तपासाच्या सूचना दिल्या. आरोपी फरार झाला आहे. लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.