थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला एसटी आगार कायमच चर्चेत असते. मागील पाच दिवसापूर्वीच एका चालकाने 62 किमी बस चालवून नंगानाच केला होता. अशातच आज पुन्हा याच आगारात राजापूर आगारातील एका चालकाने तर्र होवून बस चालविण्याचा प्रकार केला होता. पण चौकशी कक्षातील वाहतूक नियंत्रकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही बस दुपारपासून आगारात थांबविण्यात आली. हा पेताडा चालक राजापूर डेपोचा आहे. आताही ही बस थांबूनच आहे. याबाबत आगाराकडे संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
महिन्यातील दुसरी घटना
सांगोला आगारातील संतोष वाघमारे या चालकाने स्वारगेट-सांगोला ही बस 62 कि.मी. तर्र होवून चालविली होती. पण तत्पर प्रवाशांनी त्याचा जागीच बंदोबस्त केला. त्याला निलंबितही करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच कोकणातील राजापूर एसटी डेपोच्या एका चालकाने सोलापूरहून राजापूरकडे जात असताना हाच प्रकार केला. पण सांगोला आगारातील वाहतूक नियंत्रकाच्या निदर्शनास ही बाब आली असता होणारा अनर्थ टळला.
दारुड्यांची संख्या वाढली
सध्या सर्वच बस चालकामधील दारू पिण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेकजण सर्रास माल लावून बस सुसाट चालवतात. यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मुक्कामाच्या ठिकाणीही हीच मंडळी तर्र असते.
आज खरे तर ज्यावेळी फलाटवर गाडी लावली जाते. त्यावेळी त्या गाडीची नोंदणी चालकाने करावयाची असते. पण सर्रास ठिकाणी वाहकच याची नोंदणी करतायेत. त्यामुळे चालकाचे फावत आहे. तर मार्गावर याच गाड्यांची नियमित तपासणी होत नसल्याने चालक,वाहक मनमानी प्रमाणे वागत आहेत. सांगोला आगारातील चालकाने केलेला प्रकार राज्यभर चर्चिला गेला. पण पुन्हा याच आगारात पेताडा ड्रायव्हर आढळला.
गाड्यांची संख्या अपुरी
सध्या परीक्षांचा कालावधी आहे. तालुक्यात ही सेवा अपुरी पडत आहे. कोणत्याही एसटी बसेसला वेळापत्रक नाही. चौकशी कक्षातील फोन सतत बंद असतो.
तर्र असलेल्या चालकाला गाडीसह थांबवून ठेवण्यात आलेले आहे. ही कामगिरी मात्र येथील अन्य अधिकाऱ्यांनी केली. रात्री उशिरापर्यंत ही बस सांगोला येथील वर्कशॉपमध्ये होती. पुढील प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे पाठविण्यात आले.
कसली सुरक्षित सेवा?
एसटीची सेवा सुरक्षित राहिली नाही. अशातच मार्गावरील गाड्यांची अवस्थाही खूपच डेंजर आहे. सांगोला आगाराला तर कोणीच वाली नाही. सांगोल्यातील चालकाचा प्रकार खूपच निंदनीय असाच होता. सध्या ही सेवा सुरक्षित राहिली नाही.
चांगल्या कर्मचाऱ्यांना मनस्ताप
एसटी मंडळात सर्वच बसचालक असा नालयकपणा करतात असे नाही. याला खूपजण अपवाद आहेत. ते इमाने इतबारे कर्तव्यदक्ष राहून चांगली सेवा देत आहेत. अनेक चालकांनी त्यांच्या नोकरीच्या कालावधीत एकही अपघात न करता निवृत्त होऊन सन्मान प्राप्त केला आहे. राज्य परिवहन महामंडळाला सेवेची मोठी परंपरा आहे. मात्र काही मोजक्या पेताड्या चालकामुळे चांगल्या कर्मचाऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे. बसचालकाची प्रत्येक आगाराच्या थांब्यावर तपासणी करून तो दारू पिला आहे का हे तपासण्याची गरज सजग नागरिक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा