पहिल्या दिवशी बलात्कार, दुसऱ्या दिवशी खुनी हल्ला, तरीही पोलीस गाफील
बार्शीत एपीआयसह चौघे निलंबित
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
ट्युशन संपवून घरी जात असताना एका अल्पवयीन मुलीवर पहिल्या दिवशी बलात्कार करण्यात आला. त्या मुलीने पोलिसात तक्रार केली म्हणून दुसऱ्या दिवशी खुनी हल्ला, तरीही पोलीस गाफील राहिले. बार्शी शहर पोलिसांचा गाफीलपणा नडला आहे. एपीआयसह चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करण्यात आला. याची दखल घेत एका एपीआयसह दोन पीएसआय, एक हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी ही कारवाई केली.
एपीआय महारुद्र परजणे, बार्शी तालुक्यातील पीएसआय राजेंद्र मंगरुळे डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल, बार्शी शहरचे अरुण हेड कॉन्स्टेबल भगवान माळी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणै, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणे असा ठपका ठेवून ही कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी बलात्कार, दुसर्या दिवशी सत्तूरने वार
इयत्ता बारावीमध्ये शिकणारी 17 वर्षांची मुलगी. ट्युशन संपवून घरी जात असताना मोटारसायकलवरून पाठलाग करणार्या दोघांपैकी एकाने अडवून तिच्यावर बलात्कार केला. त्याची फिर्याद दाखल होऊन चोवीस तास उलटल्यानंतर पुन्हा त्याच दोन आरोपींनी पिडितेच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार करत तिच्यावर खुनी हल्ला केला. त्याची दुसरी फिर्यादही दाखल झाली.
पहिली फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे मोकाट फिरणार्या आरोपींनी दुसरा गुन्हा केला. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतरच तात्काळ पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर खुनी हल्ल्याची घटनाच घडली नसती, अशी भावना बार्शीकरांमधून व्यक्त होत असून शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना बार्शी येथील एका अल्पवयीन मुलीसोबत घडली आहे. सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या संबंधित मुलीवर दि. 5 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे दि.6 मार्च रोजी रात्री त्याच आरोपींनी पिडीत मुलीवर तिच्या घरात घुसून कोयता आणि सत्तूरने वार केले.
त्यानंतर तिसर्या दिवशी म्हणजे दि. 7 मार्च रोजी बार्शी शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती रात्री उशिरा दिली. अक्षय विनायक माने (वय 23) आणि नामदेव सिध्देश्वर दळवी (वय 24, दोघेही रा. बळेवाडी, ता. बार्शी) अशी आरोपींची नावे असल्याचे बार्शी शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा