शेकापमध्ये ॲड. सचिन देशमुख करणार भूकंप?
विजयासाठी दीपकआबांकडे मागितली मदत

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेला सांगोला तालुका विविध राजकीय कारणांनी चर्चेत येत आहे. शेकापमध्ये वाढत असलेली पक्षांतर्गत खदखद नवे वळण घेताना दिसत आहे. असे नेमके का घडतेय? नवे नेतृत्व जुन्या कार्यकर्त्यांना मान्य नाही का? नवे नेतृत्व जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही का? नेमकं आत काय शिजतंय? या प्रश्नांनी कार्यकर्ते अस्वस्थ दिसत आहेत.
ॲड. सचिन देशमुखांचं नेमकं चाललंय काय?
ॲड. सचिन देशमुख हे शेकापचे कट्टर समर्थक. भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रत्येक निवडणुकीत अग्रभागी असणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. ते जिल्हा परिषदेच्या कोळा गटाचे सदस्यही राहिले आहेत. कोळा जिल्हा परिषद गटात त्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. आता हेच सचिन देशमुख पक्षात अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहेत.

काल कोळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचा सत्कार कार्यक्रम झाला. या सत्कार कार्यक्रमात ॲड. सचिन देशमुख अग्रभागी होते. याच कार्यक्रमात देशमुख यांनी केलेल्या भाषणाची तालुक्यात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.Think Tank Live
“आबा जिकडे गुलाल तिकडे, हे समीकरण दृढ झाले आहे. गेल्या वेळेला आबा आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला गुलाल उधळण्याची संधी मिळाली नाही. यापुढे आबांनी मला आशीर्वाद द्यावा”, असे म्हणत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी बॉम्ब टाकला. ॲड. देशमुख हे नेमके कोणत्या निवडणुकीच्या विजयासाठी मदत मागत आहेत? याचा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे. आमदारकीच्या निवडणुकीसाठीच ते आशीर्वाद मागत आहेत असा अर्थ लावला जात आहे. Think Tank Live
सर्वकाही मिळूनही अस्वस्थ
भाई गणपतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक ॲड. सचिन देशमुख यांना शेकापचे (PWP) जिल्हा परिषदेमधील अभ्यासू सदस्य म्हणून ओळखले जाते. ते माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते, पट्टशिष्य होते. (कै.) गणपतराव देशमुख यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेकदा पाण्यासंदर्भातील बैठकांसाठी, मंत्रालयातही ते दिसत होते. स्वतः ते वकील असल्याने त्यांचा कायदेशीर अभ्यास पक्का आहे. त्यामुळेच त्यांनी भाई गणपतराव देशमुख यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांची जिल्हा परिषदेतील भाषणेही अभ्यासू असत. पक्षाकडून सर्वकाही मिळूनही सध्या ते अस्वस्थ दिसत आहेत.
आमदारकीसाठी इच्छुक
ॲड. सचिन देशमुख हे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांच्या गेल्या काही महिन्यांतील हालचालीवरून दिसून येते. काही दिवसांपूर्वी तसे जाहीर सूतोवाच केले होते.
२०१९ सालीच होते इच्छुक
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीवेळीच ते आमदारकीसाठी इच्छुक होते. भाई गणपतराव देशनुख यांनी स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर विधानसभा लढविण्यासाठी सचिन देशमुख इच्छुक होते. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या कोळा जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाल्याने या परिसरातून त्यांना विधानसभेचे तिकीट द्यावे अशीही मागणी झाली होती.
त्या भागातील अनेक कार्यकर्त्यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्याकडे ॲड. सचिन देशमुख यांना विधानसभा निवडणुकीचे अधिकृत तिकीट देण्याची विनंती केली होती. मात्र पक्षातील दुसरा गट त्यांच्या उमेदवारीस सहमत नव्हता. कारण पक्षात ॲड. सचिन देशमुख यांच्या तोडीचे असंख्य कार्यकर्ते काम करत होते.
नव्या नेतृत्वासोबत सूत जुळेना!
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा त्यांचे दोन्ही नातू डॉ. अनिकेत आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे गेली. बदलत्या राजकीय वातावरणामध्ये ॲड. सचिन देशमुख यांना त्यांच्याशी जुळवून घेता आले नसल्याचे विविध घटना घडामोडीवरून दिसते. पक्षाच्या बैठका व सभांमधून ही बाब प्रकर्षाने जाणवली.
दीपकआबांना मागितला आशीर्वाद
अस्वस्थ असलेले ॲड. सचिन देशमुख हे समविचारी लोकांना एकत्र आणून नवीन फळी उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. कोळे येथे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभात “आबांनी आता मला आशीर्वाद द्यावा”, असे साकडे घातले. मुळात माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हेच यंदाची निवडणूक आर या पार या तत्त्वानुसार लढवणार असल्याची चिन्हे दिसत असताना ते सचिन देशमुख यांना कसा आशीर्वाद देणार? हा मोठा प्रश्न आहे.
पक्षांतर की नवी फळी?
ॲड. सचिन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी लावलेल्या बॅनरवर भाई गणपतराव देशमुख यांचाच फोटो दिसत होता. त्यांच्या दोन्ही नातुंचे फोटो गायब होते. यावरून त्यांची पुढील वाटचाल दिसून येते. सचिन देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे.त्याचा वापर करून ॲड. देशमुख पक्षांतर करणार की पक्षातच आपला गट निर्माण करणार याबाबत चर्चा होत आहे.
ॲड.सचिन देशमुख एवढे का नाराज?
देशमुखच देशमुखांवर नाराज आहेत, असे चित्र दिसून येत आहे. स्व.गणपतआबा यांच्यानंतर त्यांचे पुत्र व दोन्ही नातू डॉक्टर बंधू ॲड.सचिन देशमुख यांना पाण्यात बघत आहेत, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत ॲड. देशमुख यांना सामावून घेतले जात नाही. त्यामुळे सचिन देशमुख कमालीचे नाराज आहेत, असे बोलले जाते. पण पक्ष सोडणार नाही,पक्षात राहूनच समविचारी लोकांना एकत्र घेवून, हा लढा देणार असल्याचे ॲड. सचिन देशमुख बोलून दाखवत आहेत.
शेकापमध्ये वाढत असलेली पक्षांतर्गत खदखद नवे वळण घेताना दिसत आहे. असे नेमके का घडतेय? नवे नेतृत्व जुन्या कार्यकर्त्यांना मान्य नाही का? नवे नेतृत्व जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही का? नेमकं आत काय शिजतंय? याचा खुलासा पक्षाच्या नव्या नेतृत्त्वाला करावा लागणार आहे.