थिंक टँक स्पेशल
Trending

डॉ. निकिता बाबासाहेब देशमुख : सेवाव्रती नेत्याचा वारसा पुढे नेणाऱ्या नेत्या

Spread the love

चांगल्या गुणवत्तेने वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर ग्रामीण भागातील गोरगरीब आणि उपेक्षित, वंचित घटकांच्या आरोग्यसेवेचा ध्यास घेतानाच सामाजिक उपक्रमांतून महिला सबलीकरणासाठी पुढे सरसावलेल्या डॉ. सौ. निकिता बाबासाहेब देशमुख यांनी आपले पती डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या समवेत सांगोला तालुक्यात आपले आजेसासरे सहकारतपस्वी, माजी आ. स्व. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी नव्या उमेदीने कार्यारंभ केला आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे सहा दशकांहून अधिक काळ प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार स्व. गणपतराव देशमुख हे राजकारणी माणूस नव्हे तर दिनदुबळ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांचा सच्चा साथी , एक आदर्श सेवाव्रती नेता म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. याच सेवाव्रती नेत्याचा जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य त्यांच्या नातसून डॉ. निकिता बाबासाहेब देशमुख करीत आहेत. (Dr. Nikita Babasaheb Deshmukh)

आज जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्त डॉ. निकिता देशमुख यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा खास लेख “थिंक टँक”च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

शेतकरी कामगार पक्षाचे निशाण खांद्यावर घेऊन निघालेल्या या लोकनायकाला मिळणारा जनाधार हा त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तित्वाची साक्ष होता. राजकारणातील दीपस्तंभ साधा सरळ जीवनमार्ग अंगिकारलेल्या या व्रतस्थ नेत्याला कधी कुठलाच मोह, अहंकार, सत्तेची गुर्मी किंवा पाठीशी ठाम असलेल्या जनशक्तीचा गर्व झाला नाही. सतत सहा दशके लोकांशी थेट संपर्क साधत लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या या कर्मयोग्याला निवडणुकीच्या मैदानात विजयापासून कुठलीच विचारधारेची लाट अथवा राजकीय शक्ती रोखू शकली नाही. महाराष्ट्रात गेल्या दोन दशकांपासून सत्तेसाठी सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्या आणि पक्षाच्या विचारधारेला तिलांजली देण्याचे प्रकार घडत असताना स्व. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख हे राजकारणातील आदर्श ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून दीपस्तंभ ठरले होते. (Ex MLA, late, Bhai Ganpatrao Deshmukh Sangola)

कार्यकर्त्यांचा निर्णय शिरोधार्य
सहा दशकांहून अधिक काळ जनसेवा करणाऱ्या स्व. गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतील उमेदवारी देखील नेहमीच पक्षातील कार्यकर्त्यांच्या निर्णयावर स्वीकारली. हाच प्रघात त्यांनी कायम ठेवला. त्यामुळे त्यांच्या पश्चात राजकीय नेतृत्वाचा निर्णय देखील निष्ठावान कार्यकर्त्यांच्याच मतांवर अवलंबून असणार आहे. मात्र स्व. गणपतराव यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा वैचारिक वारसा जपण्याचा व तो पुढे नेण्याचा वसा त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी अंगिकारला आहे. वैद्यकीय उच्च शिक्षण पूर्ण करत असतानाच आबासाहेबांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांचा निर्णय शिरोधार्य मानत डॉ. बाबासाहेब यांनी आपले आजोबा स्व. गणपतराव देशमुख यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचा निर्णय घेत जनसेवेच्या कार्यात स्वतः ला झोकून दिले आहे. डॉ. बाबासाहेब हे एम. डी. (मेडीसिन) आणि डीएनबी (कार्डियालॉजी) आहेत.(Dr. Babasaheb Deshmukh Sangola)

ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा वैचारिक वारसा
ग्रामीणभागात वैद्यकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगले असताना परिस्थितीनुरूप पूर्णवेळ जनसेवेसाठी बांधील राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो केवळ स्व. गणपतराव देशमुख यांचा आदर्श असा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठीच.

पतीच्या बरोबरीने डॉ. निकिता सरसावल्या
स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. सौ. निकिता यांनी फिटल मेडिसिनमध्ये फेलोशिप संपादन केली आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी ही लहानपणापासूनची तळमळ होती. महाविद्यालयीन आयुष्यात सेवाभावी कार्य करणारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना प्रेरणास्थानी मानणाऱ्या डॉ. सौ. निकिता यांना विवाहानंतर ऋषितुल्य सेवाव्रती स्व. गणपतराव देशमुख यांच्या रूपाने आजेसासरे मिळाले. देशमुख घराण्याचा साधेपणा, जनसेवेचा वसा अंगिकारणारे स्व. गणपतराव यांचे सुपुत्र आणि सासरे अण्णासाहेब आणि सासू सौ. सरोजिनी अण्णासाहेब देशमुख यांचे खुल्या दिलाचे पाठबळ लाभल्याने सांगोला तालुक्याला आपली कर्मभूमी मानत प्राथमिक आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी रुग्णसेवा रुजू केली.

रुग्णसेवेसोबतच पती डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या बरोबरीने सामाजिक उपक्रमातून आपले आजेसासरे स्व. गणपतराव देशमुख यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी त्या सरसावल्या आहेत.

शिक्षणाची कास धरलेले कुटुंब
डॉ. निकिता यांचे माहेरचे नाव निकिता रामदास येडगे. मंगळवेढा तालुक्यातील नेपतगाव हे मूळ गाव. वडील रामदास उमाजी येडगे हे पेट्रोकेमिकल इंजिनिअर म्हणून सौदी अरेबियात नोकरीस होते. डॉ. निकिता यांची आई सौ. लता रामदास येडगे ह्या गृहिणी तर एक भाऊ निखिल हा जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. वडील पेट्रोकेमिकल इंजिनिअर असल्याने घरात शैक्षणिक वातावरण लाभलेल्या निकिता यांचे प्राथमिक चौथी पर्यंतचे शिक्षण नागोठाणे (जि. रायगड) येथे झाले. पुढे वडील सौदी अरेबियात नोकरीसाठी गेल्याने निकिता यांचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सौदी अरेबियातील जुबेल शहरात झाले. पुढे सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमधून झाले. २००८ मध्ये त्या दहावी उत्तीर्ण झाल्या. तर अकरावी – बारावी (सायन्स) बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमधून झाले.

२०१० मध्ये बारावीला एन टी कॅटेगिरीतून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविलेल्या निकिता यांना पहिल्याच प्रयत्नात पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. २०१६ मध्ये एमबीबीएस पूर्ण झाल्यावर निकिता यांनी नवले मेडिकल कॉलेजमधून एम एस (गायनोकोलोजी) २०२० मध्ये पूर्ण झाले. या दरम्यानच २०१८ मध्ये मावशीच्या मध्यस्थीने निकिता यांना बाबासाहेब देशमुख यांचे स्थळ आले होते. २४ एप्रिल २०१८ मध्ये त्यांचा बाबासाहेबांशी विवाह झाला आणि त्या देशमुख घराण्यात सून म्हणून आल्या.

डॉक्टर व्हायचं स्वप्न
डॉ. निकिता यांचे आजोबा (आईचे वडील) नारायण देवकाते (मेखली, ता. – बारामती) यांचे वेळेत उपचार न मिळाल्याने हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी मेखलीहून बारामती आणि बारामतीहून पुणे येथे हलविण्यात आले होते. त्यावेळी उपचार करणाऱ्या पुण्याच्या डॉक्टरांचे शेवटचे वाक्य होते की, तुम्ही इथे आणायला खूप उशीर केलात. पेशंटला वेळेत आणले असते तर जीव वाचला असता. ही घटना निकिता लहानपणापासून आईच्या तोंडून ऐकत आल्या आहेत. हे ऐकल्यावर त्यांना नेहमी वाटायचे की, ग्रामीण भागात चांगले डॉक्टर का असू नयेत? पुढील उपचारासाठी पुण्या- मुंबईलाच का जायचं? हे प्रश्न लहानपणापासून डोक्यात घोळत असल्याने आपण डॉक्टर व्हायचं आणि ग्रामीण भागात काम करायचं हे स्वप्न निकिता यांनी पाहिले.

विचार पटले अन् मने जुळली
डॉ. निकिता ह्या सर्वसामान्य नोकरदार कुटुंबातील तर डॉ. बाबासाहेब देशमुख हे सामाजिक आणि राजकीय वलय प्राप्त झालेल्या कुटुंबातील. डॉ. बाबासाहेब यांचे विचार, साधी राहणी, सर्वसामान्यांचा कैवार घेण्याची त्यांची नेहमीची भूमिका डॉ. निकिता यांना पटली. नेहमी डाऊन टू अर्थ असणारे डॉ. बाबासाहेब आणि डॉ. निकिता यांच्यामधील समान दुवा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर देखील शहरात मोठे हॉस्पिटल न उभारता ग्रामीण भागात गोरगरिबांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचे पाहिलेले स्वप्न.

स्व. गणपतराव यांचा लाभलेला सहवास
डॉ. निकिता यांना त्यांचे आजेसासरे स्व. गणपतराव देशमुख यांच्याबद्दल नितांत श्रध्दा भाव आहे. डॉ. निकिता ह्या नवले मेडिकल कॉलेजमध्ये एम एस करीत असतानाच २०१८ मध्ये त्यांचे लग्न जुळले. या नातेसंबंधांमुळेच त्यांना स्व. गणपतराव यांचे अल्पकाळ सानिध्य लाभले. एवढ्या मोठ्या आभाळा इतकी उंची लाभलेल्या व्यक्तीसमोर नुसतं उभे राहायचे म्हटले तरी डॉ. निकिता यांना दडपण यायचं. पण स्व. गणपतराव मात्र अतिशय आत्मीयतेने आणि साधेपणाने त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करायचे. जनसेवेच्या दैनंदिन व्यापातून देखील थोडीशी उसंत घेत स्व. गणपतराव एकदा डॉ. निकिता यांच्या कॉलेजात भेटायला गेले होते. साधारणतः लोकप्रतिनिधी म्हटले की मागे पुढे सुरक्षारक्षक आणि कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो. मात्र स्व. गणपतराव भेटले ते एकटेच. डॉ. निकिता यांना आजे सासरे स्व. गणपतराव यांच्याशी झालेली ही पहिली भेट कायमची स्मरणात राहिली. “चल आपण तुझ्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता करू” असं म्हणत स्व. गणपतराव यांनी डॉ. निकिता यांना आलेल्या दडपणातून मुक्त करण्याचा केलेला एक सहज प्रयत्न, प्रत्येक परीक्षेच्या आधी अगदी आठवणीने प्रोत्साहित करण्यासाठी येणारे स्व. गणपतराव यांचे फोन कॉल्स यासर्व आठवणी डॉ. निकिता यांनी आपल्या आठवणींच्या कुपीत सुरक्षित ठेवल्या आहेत.

रुग्णांची अस्तेवाईकपणे चौकशी
डॉ. निकिता ह्या अकोले प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्यानंतर केदारवाडी येथील एका महिला रुग्णाची त्यांनी आशा वर्करकडे चौकशी केली. नुकताच त्या रुग्ण महिलेच्या दोन मुलांना डेंग्यू झाला होता. उपचारानंतर मुले बरी झाली पण त्या महिलेमध्ये अजूनही लक्षणं दिसत होती. तिची चौकशी करण्यासाठी डॉ. निकिता यांनी आशा वर्करकडे विचारणा करून रुग्णाची अस्तेवाईकपणे चौकशी केली. आपणास योग्य पद्धतीने उपचार केले जातात का ? हे त्यांनी आवर्जून पाहिले. डॉ. निकिता म्हणतात रुग्णसेवा देताना आपण दूजाभाव करत नसतो. आपल्या सोबत कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्यांशीही डॉक्टर निकिता मिसळून जातात. ग्रामीण महिलांचे खूप प्रश्न आहेत. सांगोला तालुक्यातील अकोले प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत झाल्यानंतर डॉ. निकिता यांनी सार्वनिकरीत्या उपक्रमांच्या माध्यमातून खेड्यापाड्यातून कार्यक्रम आणि गाठीभेटी सुरू केल्या. यावेळी कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती नगण्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग नवरात्रीच्या काळात त्यांनी नऊ दिवस फक्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले.

भक्तिमय वातावरणात स्त्री शक्तीचा जागर करताना स्त्री आरोग्याचा विषय हाती घेत डॉ. निकिता यांनी सांगोला तालुक्यातील महिलांच्या प्रश्नांना ऐरणीवर घेतले. नेमके याच काळात नवनिर्वाचित आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या मोफत तपासणी शिबिरांच्या उपक्रमातून आरोग्यविषयक जनजागृती मोहीम राबविली. या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील महिला पहिल्यांदाच आपल्या आरोग्य विषयक प्रश्नांवर बोलू लागल्या. महिला सक्षमीकरण करताना पहिल्यांदा ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या ऐरणीवर आणण्याचे आवाहन प्रत्येक कार्यक्रमातून डॉ. निकिता बाबासाहेब देशमुख करीत असतात.

माजी आ. स्व. गणपतराव देशमुख यांच्या नातसून म्हणून डॉ. निकिता यांच्याबद्दल सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनात अप्रूप आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर देखील मातीत पाय गाडून कष्ट करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब आणि नातसून डॉ. सौ. निकिता हे दांपत्य करीत आहे.

अंधश्रद्धेतून स्त्रियांवर घातलेली बंधन
गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी भागात कॅम्पच्या निमित्ताने डॉ. निकिता ज्या घरात रहायला गेल्या त्या घरातील एका मुलीची मासिक पाळीमुळे घराच्या कंपाऊंडच्या बाहेरील बाजूस एका झोपडीत रवानगी करण्यात आली होती. मासिक पाळीच्या काळात मुलींना महिलांना घरात प्रवेश नाही ही परंपरा लक्षात आली. तेव्हापासून ग्रामीण भागात काम करायचं आहे, महिलांसाठी काम करायचं आहे ही इच्छा अधिक प्रबळ होत गेली. समाजात अजूनही अंधश्रध्दा इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत ज्यामुळे महिलांना अश्या अवमानकारक प्रसंगांना सामोरे जावे लागते. अश्या काळात जेव्हा सर्वात जास्त आरामाची आणि सहवासाची गरज असते तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष केले जाते.

सामाजिक कार्याची आवड
पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर निकिता ह्या ‘ प्रचिती ‘ ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुपच्या संपर्कात आल्या. त्या माध्यमातून बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांचा संपर्क झाला. एम बी बी एस च्या द्वितीय वर्षात असताना निकिता यांची मेळघाटच्या बालमृत्यू घटनांची ओळख झाली. मेळघाटात बऱ्याचदा पावसामुळे फैलावलेल्या निमोनिया आणि डायरीयामुळे बालमृत्यूचे प्रमाण खूप जादा आहे. मग प्रचिती ग्रुपच्या माध्यमातून धडक मोहीम ही पंधरा दिवसांची विशेष आखली जाते. तेव्हा पासून डॉ. निकिता यांची मेळघाटात जावून तिथे काम सुरू करायला सुरुवात झाली. ग्रुपला जेव्हा जास्त गरज असते. तेव्हा अभ्यास सांभाळून निकिता यांनी त्या मोहिमेत भाग घेतला. हे कार्य करत असतानाच निकिता यांना डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्या ‘निर्माण’ कॅम्प बद्दल माहिती मिळाली. मग त्या कॅम्पच्या निमित्ताने गडचिरोलीला पंधरा दिवसांसाठी जायची संधी मिळाली. नक्षलवादी भागात जावून राहण्याची कॅम्पची एक ॲक्टिव्हीटी होती. तिथे त्यांना महिलांसाठी काम करण्याची इच्छा प्रबळ झाली.

नवरात्रीत आदिशक्तीचा जागर
लोकसंख्येनुसार पन्नास टक्के महिला आहेत. मात्र कार्यक्रमांतून त्यामानाने महिलांची उपस्थिती नगण्य असते. त्या महिला घराबाहेर पडल्या पाहिजेत. डॉ. निकिता यांनी नवरात्र उत्सव लक्षात घेवून ९ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी फक्त महिलांसाठी आरोग्य शिबिरे घेतली. त्यावेळी त्यांना समजलं की महिलांच्या अडचणी खूप आहेत पदासाठी नाही तर विचारांसाठी वारसदार आपल्याकडे राजकीय वारसा हा घराणेशाहीतून कोणत्याही योग्यते शिवाय विनासायास मिळण्याची अनेक उदाहरणे समोर असताना योग्यतेवर कार्यकर्त्यांनी निवडलेला नेताच नेतृत्व करण्यास योग्य असतो या स्व. गणपतराव देशमुख यांनी घालून दिलेल्या आदर्श नियमाला अनुसरून सांगोला मतदार संघाच्या विकासासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी देशमुख समर्थक गटाने उच्च शिक्षित असलेले स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाच आपला नेता म्हणून स्वीकारले आहे. देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देत असतानाच स्व. गणपतराव देशमुख यांचा वैचारिक वारसा पुढे नेत सर्वसामान्यांच्या विकासाचे राजकारण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख हे सज्ज झाले आहेत.

तर त्यांच्या कार्याला बळकटी देत असतानाच महिला सबलीकरण आणि आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. सौ. निकिता बाबासाहेब देशमुख ह्या आपल्या पतीसमवेत आघाडीवर आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका