थिंक टँक स्पेशल
Trending

सांगोल्याच्या निर्भिड पत्रकार वृंदा काळे

Spread the love

नाझरेसारख्या ग्रामीण भागात राहूनही वृंदा काळे यांची पत्रकारिता सजग अशीच आहे. ब्रेकिंग बातम्यामध्ये हातखंडा असलेल्या त्यांचा वाचकवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय यासह गोरगरिबांना न्याय देणारी त्यांची बातमीदारी उल्लेखनीय अशीच आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सोन्यासारख्या सांगोल्यात कशाचीच कमी नाही. आज तालुक्यातील नाझरेसारख्या ग्रामीण भागातील एक युवती पत्रकारिता क्षेत्रात आपले करियर करीत आहे. याच वृंदा काळे यांच्या परखड पत्रकारितेतील गुणामुळे भलेभले गार होत आहेत. आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.

भारतात न्यूज चॅनेल, वृत्तपत्र आणि मासिके बघितली तर तुम्ही अनेक महिलांना अँकर, संपादक आणि पत्रकाराच्या स्वरुपात पाहत असाल. ह्या गोष्टी पाहुन तुम्हाला असे वाटेल की, भारतात महिलांनी पत्रकार क्षेत्रात भरपूर नाव कमावले असेल. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, महिलांना अजून खूप मोठा प्रवास करणे बाकी आहे. याचा ध्यास मनी घेत वृंदा काळे यांची पत्रकारिता उत्तुंग भरारी घेत आहे. सतत न्यायी भूमिका, प्रशासनाला वठणीवर आणणारी ठरीत आहे.

1960 नंतर महिला पत्रकार क्षेत्रात येऊ लागल्या. ह्या क्षेत्रात पहिल्यांदा मध्यम व उच्च मध्यमवर्गीय महिलांनी सुरुवात केली. 1980 नंतर चित्र बदलू लागले. महिला मोठ्या प्रमाणात पत्रकारिता क्षेत्राकडे वळू लागल्या. आज संपादक, रिपोर्टर आणि टेलिव्हिजन अँकर या महत्त्वाच्या पदावर महिला काम करताना दिसून येत आहेत. हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्र क्षेत्रात महिला पत्रकारांची संख्या वाढलेली दिसून येते. परंतु, यामध्ये लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि बैंगलोरसारखी मोठी शहरे सोडली तर इतर लहान शहरांमध्ये महिलांची संख्या नगण्य अशी दिसून येते.

या अनुषंगाने पत्रकार वृंदा काळे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “महिला पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे की, यामध्ये तुम्ही रिपोर्टर म्हणून काम करत असाल तर, वेळ-काळ न बघता कुठेही येण्या-जाण्यासाठी तयार रहावे लागते. मोठ्या बातम्या कधीही आल्या तरी त्या कराव्या लागतात. अशावेळी घरातील जबाबदारी आणि पत्रकारितेतील जबाबदारी सांभाळणे कठीण होते. पत्रकारिता क्षेत्रातील महिलांच्या समस्येमध्ये हीच सर्वात मोठी समस्या आहे. पत्रकारिता क्षेत्रात महिला आता पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. परंतु, काहीवेळेस परिवारांकडून जे सहकार्य मिळायला हवे ते मिळत नाही.”

“अजूनही महिलांनी घरची जबाबदारी सांभाळावी हीच समाजाची मानसिकता आहे. महिलांना अशावेळी आपल्या नोकरीसोबत घरची जबाबदारी अशी दुहेरी आव्हानांना सांभाळावे लागते. ही जबाबदारी सांभाळता आली नाही तर नोकरी सोडावी लागते. आजही लग्नानंतर महिला पत्रकारांनी नोकरी सोडण्याचे प्रमाण 40 टक्के इतके आहे. परंतु, कोणत्याही आव्हानांना सडेतोड सामोरे जावून काही वेगळे करण्याची तयारी दाखवण्याऱ्या महिला मेहनत आणि जिद्दीवर आज समाजात छाप सोडत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातही हीच गोष्ट लागू होते. पत्रकारितेत महिलांना प्रामुख्याने 3 आव्हानांना सामोरे जावे लागते. यामध्ये एका व्यक्तीच्या रुपात, एका महिलेचे रुपात आणि पत्रकाराचे रुप. या तिन्ही भूमिकेतील समन्व्यावरच महिला सामाजिक भूमिका पार पाडू शकतात.”

“पत्रकारितेत सर्वच चांगले असे नाही, अजूनही खूप काम पार पाडणे बाकी आहे. मागील काळात महिला पत्रकारांची संख्या वाढली असली तरी महिला रिपोर्टरांची संख्या खूप कमी आहे. आकडेवारीनुसार 2 टक्केसुद्धा महिला पत्रकार रिपोर्टिंग करत नाहीत. अनेक गंभीर विषय आणि मुद्दे उपस्थित करण्याची संधी असतानाही महिलांना चांगल्या संधी मिळू दिल्या जात नाहीत. त्यांचा क्षमतेवर संशयाच्या नजरेने पाहिले जाते. याच कारणामुळे महिला निर्णय घेण्याऱ्या पदापर्यंत पोहचु शकत नाहीत.”

शैक्षणिक वाटचालीबाबत विचारले असता वृंदा काळे म्हणाल्या की, “मी सोलापूर विद्यापीठात 2017 साली एम. ए. मास कम्युनिकेशसाठी प्रवेश घेतला. या दोन वर्षात मी पत्रकारितेचे धडे घेतले. वृत्तपत्र, रेडिओ, न्यूज चॅनेल, टेलिव्हिजन, जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी इंटर्नशिप करून जास्तीत जास्त अनुभव मिळाला. यासोबतच मी विद्यापीठातील पथनाट्य, युवा स्पंदन, युथ फेस्टिवल आशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या काळात माझी विद्यापीठात युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटिव्ह म्हणून निवड झाली. विद्यापीठातील कार्यक्रमात सूत्रसंचालन केल्याने माझा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.”

“शिक्षण पूर्ण करत असताना माझी ई.टीव्ही भारत या हैदराबादमधील कंपनीत निवड झाली. पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे जाता आलं नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सांगोल्यातील माणदूत एक्सप्रेस, दैनिक सांगोला नगरी वृत्तपत्रांमध्ये काम केले. यानंतर मला दिल्लीतील इनशॉर्टस या मोठ्या प्लॅटफॉर्म अंतर्गत काम करणाऱ्या पब्लिक या वृत्तसंस्थेसाठी काम करण्याची संधी मिळाली. या वृत्तसंस्थेत काम करताना मी अनेक विषयांवर बातम्या केल्या. आज माझे 1 लाख 88 हजार फॉलोवर्स असून मी केलेल्या बातम्या सांगोल्या तालुक्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहचत आहेत.”

“मी बेंगलोर येथील लोकल या कंपनीसाठी सांगोला प्रतिनिधी म्हणून काम पाहते. सध्या पब्लिक बरोबरच डेलिहंट या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने सुरू केलेल्या पब्लिक वाईब या संस्थेतही न्यूज रिपोर्टिंग अँकरिंग व्हिडिओ एडिटिंगचे काम करत आहे. याद्वारे मी समाजातील अनेक मुद्यांवर बातम्या करते. आज लाखो लोक मी केलेल्या व्हिडिओ स्वरुपातील बातम्या पाहत आहेत. आपल्या कामामुळे समाजात जनजागृती होते, याचा मला आनंद आहे. यापुढेही चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न असेल व ग्रामीण भागातील तरुणींनी या क्षेत्राकडे वळावे, असे मी आवाहन करते.”

सजग बातमीदारी
नाझरेसारख्या ग्रामीण भागात राहूनही वृंदा काळे यांची पत्रकारिता सजग अशीच आहे. ब्रेकिंग बातम्यामध्ये हातखंडा असलेल्या त्यांचा वाचकवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय यासह गोरगरिबांना न्याय देणारी त्यांची बातमीदारी उल्लेखनीय अशीच आहे.


हेही वाचा

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका