“सूर्य कोपणाऱ्या विस्तवाच्या प्रदेशात” काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील नामवंत कवी चंद्रकांत मागाडे लिखित आणि थिंक टँक पब्लिकेशन्स प्रकाशित “सूर्य कोपणाऱ्या विस्तवाच्या प्रदेशात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम बौद्धांचा दानमय बुद्धविहार, रमापती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोर येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. सारीपुत्र तुपेरे, कामगार नेते अशोक जानराव, डॉ. बाळासाहेब मागाडे उपस्थित राहणार आहेत.
कवी चंद्रकांत मागाडे यांनी या काव्यसंग्रहात सोलापूर महापालिकेत झाडूवालीचे काम करणाऱ्या आपल्या आईचा आणि सोबतच कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष मांडला आहे.
झाडूवालीचे काम करणाऱ्या महिलांचे आरोग्याचे प्रश्न, पालिका अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, अज्ञानिपणा, खासगी सावकारी पाश, अल्प पगारामुळे होणारी आर्थिक ओढाताण, हलाखीच्या परिस्थितीतही झाडूवालीच्या लेकरांची यशाला गवसणी आदी विषयाचा सखोल वेध घेणाऱ्या कविता या काव्यसंग्रहात आहेत. सोलापूर शहराचे १९८० च्या दशकातील चित्रण या काव्यसंग्रहात आविष्कृत झाले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.