थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
यंदा जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने त्याचा थेट फटका सांगोला तालुक्याला बसणार आहे. सांगोला तालुक्यातील 82 गावांना जीवनदायीनी ठरलेली शिरभावी नळ पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तालुक्यातील 82 गावांवर जलसंकटाची छाया पसरली आहे.
शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून सांगोला तालुक्यातील २८ गावातील सुमारे १ लाख ७६ हजार लोकसंख्येला सुमारे ३५ लाख लिटर दैनंदिन पाणीपुरवठा करून गाव, वाड्यावरील नागरिकांची तहान भागवली जात आहे. नव्याने ११ गावांची पाणी मागणी वाढली आहे. दरम्यान पंढरपूर इसबावी बंधाऱ्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शिरभावी योजना पाण्याअभावी बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सांगोला तालुक्यातील गावांवर जलसंकट ओढवणार असल्याचे दिसून येत आहे.
चालू वर्षी सांगोला तालुक्यात सलग तीन महिने नद्या नाले ओढे खळखळून वाहणारा मुसळधार पाऊस न पडल्यामुळे गाव पातळीवरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना जवळपास बंद पडल्या आहेत. शेतातील विहिरी तसेच बोअरची पातळी खोलवर गेल्याने गावोगावी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
शिरभावी योजनेतून शेतकरी सूतगिरणी व महिला सूतगिरणी, औद्योगिक वसाहत व सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कमलापूर या चार सह. संस्थांनाही पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान पाणीटंचाई जाणवू लागल्याने नव्याने तालुक्यातील खिलारवाडी, इटकी, हलदहिवडी, कमलापूर, महिम , मेडशिंगी, पारे,राजुरी, यलमर मंगेवाडी, कोळे, गायगव्हाण या ११ गावांनी शिरभावी योजनेकडे पाणी मागणी केली आहे. सध्या कटफळ मुख्य संतुलन टाकी येथून लोटेवाडी व इटकी गावासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाचा असाच खंड राहिल्यास आणखी गावांची पाणी मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांचेच लक्ष मुसळधार पावसासाठी आकाशाकडे लागली आहे.
शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची ८२ ग्रामपंचायतीकडें सुमारे १ कोटी ६ लाख ४८ हजार ६५१ रुपये जुलै ०२३ अखेर थकबाकी येणे आहे. संबंधित ग्रामपंचायतीने टप्प्याटप्प्याने आपल्याकडील थकबाकी भरून योजनेस सहकार्य करावे सध्या पंढरपूर येथील इसबावी बंधाऱ्यात पुढील पाच ते सहा दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून वापरावे असे आवाहन या योजनेचे उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर माने यांनी केले आहे.