दीपकआबांचा आग्रह, अजितदादांच्या एका फोनवर माण आणि कोरडा नदीत पाणी
सांगोला (नाना हालंगडे) : ऐन पावसाळ्यात सांगोला तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सांगोला तालुक्यातील माण कोरडा आणि सर्व नद्या ओढे तलाव कोरडे पडले होते. याची गंभीर दखल घेऊन माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना टेंभू योजनेचे पाणी माण नदीत सोडून या नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत. तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी कोरडा नदीत सोडून जवळा तलावासह कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावेत. अशी मागणी केली होती. यावर उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ याची दखल घेऊन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांना सांगोला तालुक्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
पावसाळ्यातील तीन महिने कोरडे गेल्याने सांगोला तालुक्यात ऐन पावसाळ्यात नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तालुक्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील झाले होते. त्यामुळे येथील नागरिक पाणी मिळावे म्हणून उपोषण करत आहेत आणि पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडीत होते. पाण्यासाठी येथील नागरिक नदीपात्रात अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत होते. नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने भयाण परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी सांगोला तालुक्यातील नागरिक गेली अनेक दिवस महुद येथील कॅनॉलवरच उपोषणाला बसले आहेत.
ऐन पावसाळ्यात सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्न पेटल्याने याची गंभीर दखल घेऊन माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी थेट राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवून नागरिकांना वेठिला धरू नये. असे सांगून अजितदादा पवार यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
टेंभूचे पाणी माण नदीत सोडून या नदीवरील सर्व बंधारे भरून दिल्यास खवासपुर, य.मंगेवाडी, अजनाळे, चिनके, बलवडी, नाझरे, अनकढाळ, वझरे, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, सांगोला, वाढेगाव, सावे, बामणी, देवळे व मेथवडे या गावातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर म्हैसाळचे पाणी जवळा तलाव आणि कोरडा नदीत सोडल्यास गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, जवळा, कडलास, वाकी घे. आलेगाव, मेडशिंगी वाढेगाव या गावातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे टेंभू आणि म्हैसाळचे पाणी सध्या तालुक्यातील नागरिक आणि जनावरांना मिळणे अनिवार्य बनले होते.
सांगोला तालुक्यातील जनतेची मूलभूत मागणी अजितदादांनी दिपकआबांच्या विनंतीला मान देऊन मान्य करत प्रशासनाला आदेश दिल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.
ऐन पावसाळ्यात येथील नागरिक आणि पशुधन पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहेत. अशावेळी प्राधान्याने हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टेंभू आणि म्हैसाळचे पाणी सांगोला तालुक्यातील माण आणि कोरडा नदीत सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत. यानुसार लवकरच हे पाणी नदीत दाखल होईलच याबाबत शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर मी स्वतः पाठपुरावा करतच राहीन, असे माजी आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले.