स्पेशल रिपोर्ट/ डॉ.नाना हालंगडे
मृग नक्षत्र संपत आले तरी पवसाचा टिपूस नाही. भयाण अशी दुष्काळजन्य परिस्थिती अनुभवास येत आहे. यंदाचा पाऊस परिटाच्या घरी पिळून काढणारा गायब झाला आहे. मृग नक्षत्र 8 जून रोजी निघाले. पण त्यातीलही 4 दिवसच राहिले. पाऊस गायबच नुसताच सोसाट्याच्या वारा तर रात्रीची थंडी असेच काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे. याचे वाहन हत्ती होते. पण हा हत्ती काही केल्या जागेवरून उठलाच नाही. त्यामुळे मृगाने दिला थोका अन् आर्द्रा साधणार का मोका? असेच काहीसे चित्र पाहावयास मिळणार आहे.
सांगोला तालुक्यासह राज्यभर वरुणराजा कोपला आहे. दर तीन वर्षांने दुष्काळजन्य परिस्थिती असेच काहीसे चित्र. सध्या तालुक्यात पाऊसच नसल्याने दैना उडाली आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्यासह पिण्याच्या पाण्याचीही बिकट अशीच परिस्थिती आहे. तर शेतीला मिळालेल्या पाण्यातही म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी राजकारण केले आहे. त्यातून यांनी अमाप पैसा कमविला आहे. विस्तारित पाईप लाईनची कामेही त्यांच्या मनमानीने केली आहेत. त्यामुळे अनेकांना हेच पाणी पैसा भरूनही मिळाले नाही. हेच पोपटपंची अधिकारी माणसात येत नाहीत. कोणाचेही म्हणणे ऐकून घेत नाही. त्यामुळे हेच पाणीही सांगोला तालुक्यातील जनतेला मृगजळ ठरले आहे. याबाबत कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही.
सध्या तालुक्यातील गावागावात पाण्याची विदारक स्थिती आहे. तर निसर्गच कोपल्याने भयाण दुष्काळजन्य परिस्थिती पहावयास मिळत आहे. सांगोला अन् दुष्काळ हेच चित्र दर तीन वर्षांने अनुभवास मिळत आहे. याचमुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे. जनावरांना चाराही मिळेना झालाय. त्यामुळे ग्रामीण भाग चिडीचूप झाला असल्याचे पहावयास मिळत आहे.
गतवर्षी ओला दुष्काळ तर आता वाळला दुष्काळ असेच काहीसे चित्र पाहावयास मिळत आहे. आता पाऊसाला सुरू होवून महिना उलटत आला. तरीही पावसाचा थेंब नाही. पहिले नक्षत्र 8 जून रोजी निघाले, आता ते 21 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर 22 जून रोजी सायंकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी आर्द्रा नक्षत्र निघणार आहे. याचे वाहन मेंढा आहे. यात अतिवृष्टी अन् वादळ होणार असल्याचे सांगितले आहे. 23 जून ते 27 जून व 4 व 5 जुलै रोजी पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे.
पुनर्वसु नक्षत्र 6 जुलै रोजी निघणार आहे. तेही सायंकाळी 5 वाजून 26 मिनिटांनी. याचे वाहन गाढव आहे. यात मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस पडेल असे सांगितले आहे. यात सहा दिवस पाऊस पडणार आहे. पुष्य नक्षत्र 20 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजून 55 मिनिटांनी निघणार आहे. याचे वाहन मात्र बेडूक आहे. त्यामुळे महिन्याभरा नंतर मात्र बेडके ओरडतील असे सांगितले आहे.
त्यानंतर आश्लेषा नक्षत्र 3 ऑगस्ट रोजी निघणार असून याचे वाहन म्हैस आहे. या नक्षत्रातही पावसाची अपेक्षा आहे. मघा नक्षत्र 17 ऑगस्ट रोजी निघणार असून याचे वाहन घोडा आहे. यात अल्पवृष्टी होणार आहे. आता मात्र पूर्वाचा मोर थुई नाचून धरणी मातेला गारेगार करणार आहे. हेच नक्षत्र 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 31 मिनिटांने निघणार आहे. हेच पूर्वा नक्षत्र 13 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यानंतर उत्तरा, हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्रातही कमी जादा पाऊस पडेल असे अंदाज आहे.
सध्या मात्र विदारक अशीच स्थिती आहे. काही केल्या ऊन कमी होईना. त्यामुळे सांगोला तालुक्यातील बळीराजा चिंतेत आहे.
मागील दोन-तीन वर्षे कोरोनाच्या सावटात गेली. त्यानंतर आता पहिल्यांदाच बळीराजा मुक्तपणे शेतीच्या नव्या हंगामाच्या तयारीत व्यस्त झाला आहे. शेतकरी वर्गाने आपल्या शेतजमिनीची मशागत करून उत्तम पावसाची वाट पाहात चांगल्या हंगामाची अपेक्षा ठेवली आहे.
तालुक्यात दोन दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. परिणामी घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी बारानंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळत असल्याने महामार्ग, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवतो. तालुक्यात शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत, मात्र पावसाची संकेत अद्याप दिसत नसल्याने पेरणीस सुरुवात केली नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा