सांगोला तालुक्यात अवकाळीचा कहर, एका तरुणासह वीज पडून म्हैस ठार
थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात अवकाळी पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. शनिवारी दुपारनंतर सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस बरसला. या पावसात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. शिवाय तालुक्यात विजेच्या धक्क्याने एक तरुण ठार झाला तर वीज पडल्याने एक म्हैस ठार झाली आहे. मोठ्या प्रमाणात सुटलेल्या वाऱ्यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. फळबागायती तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळीचा हा दणका सांगोला तालुक्यासाठी नुकसानकारक ठरत आहे.
सांगोला तालुक्यातील काळूबाळूवाडी येथे दुपारी 4.00 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी विजेची तार तुटल्याने शॉक लागून समाधान दामोदर शेळके हा 13 वर्षीय मुलगा मयत झाला. तलाठी यांनी पंचनामा केला आहे.
भोपसेवाडी येथे आज दुपारी 4.10 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी विज पडून म्हशीचा मृत्यू झाला आहे.
मेथवडे येथे दुपारी 4.15 वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळेस ज्ञानेश्वर आनंदा पवार यांचे घरावरील छप्पर उडाले.
मेथवडे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळेस ज्ञानेश्वर वामन कांबळे यांचे द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे.
वाढेगाव (रावजी मळा) येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यावेळेस मच्छिंद्र रामचंद्र दिघे यांचे घरावरील छप्पर पत्रे उडाले.
मौजे सावे येथील सुखदेव नामदेव वाघमोडे यांच्या राहत्या घराचे पत्रे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत.
या आपत्ती जनक घटनांची नोंद त्या त्या गावातील तलाठी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामे केले आहेत. अवकाळी पावसामुळे सांगोला तालुक्यात हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये विजेच्या तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणकडून तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा