सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १६ जागेसाठी रविवारी झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ( शिंदे गट), काँग्रेस ( आय) भाजप आनंद माने गट प्रणित सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व १६ जागा जिंकून अपेक्षेप्रमाणे एकतर्फी दणदणीत विजय मिळवला. (Sangola Agricultural Produce Market Committee Election Result)
या निवडणुकीत विरोधी शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , काँग्रेस पक्ष, आरपीआय व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडीसह अपक्षांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान निवडणुकीनंतर सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीच्या वतीने विजयी उमेदवारांची सवाद्य मिरवणूक काढून गुलालाची मुक्त उधळण करून फटाके फोडून जल्लोष केला.
सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ पैकी शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस (आय) भाजप ,आनंद माने गट प्रणित सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडीच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल मतदारसंघातून कारंडे व व हमाल तोलारमधून दगडू संभाजी गावडे या दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर १६ जागेसाठी एकूण ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सांगोला तालुका शेतकरी विकास आघाडी विरुद्ध स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडीसह अपक्षात ही निवडणूक झाली.
रविवारी सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सांगोला तालुक्यातील जवळा, नाझरे, महूद, सांगोला या ५ मतदान केंद्रावरील ९ बुथवर २०८९ मतदानापैकी २०१८ मतदारांनी मतदान केले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वा पंचायत समिती बचत भवन येथे ९ टेबलवर मतमोजणी शांततेत पार पडली . या मतमोजणीत १६ जागेसाठी सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून – आबासो आलदर -७५३, बाळासाहेब काटकर-७४१ , विनायक कुलकर्णी-७५४, अमोल खरात-७४३ ,धनाजी पवार -७५५, हेमंत कुमार शिंदे -७४८, विष्णू सरगर-७४८ ,
सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून संतोष देवकते -७९२ , सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून- दीपक गोडसे -७८९ ,सहकारी संस्था महिला मतदारसंघातून प्रमिला शिवाजी चौगुले-८०१ व शोभा विजय पवार -८१८ ,ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून – समाधान पाटील ३८९ ,किशोर शिंदे-४९२ , ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून – माणिकचंद वाघमारे-५०९ , व्यापारी मतदार संघातून- रामचंद्र बाबर १५८ – व अमजद बागवान-२०६ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विलास घोडके यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.