
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
जवळा गावात अविरतपणे 40 वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय सेवा देवून हजारो लोकांना जीवदान देणारे डॉ. संजीव कुलकर्णी यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने जवळा तसेच आजूबाजूच्या गावावर शोककळा पसरली आहे. माजी शिक्षणाधिकारी डी. वाय. कुलकर्णी यांचे ते सुपुत्र होते.
डॉ. संजीव कुलकर्णी यांचे शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास झोपेत असताना निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 62 होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.
जवळा परिसरात जणू देवदूत
डॉ. संजीव कुलकर्णी यांनी बीएएमएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर सुमारे चाळीस वर्षांपूर्वी जवळा गावात दत्त क्लिनिक या नावाने दवाखाना सुरू केला. त्या काळात जवळा गावात एकही दवाखाना नव्हता. जवळा गावाचा आता सारखा विकास झाला नव्हता. उपचारासाठी लांबच्या गावाला जावे जगात होते. अशा परिस्थितीत डॉ. संजीव कुलकर्णी यांनी धाडस करून जवळा गावासारख्या खेडेगावात वैद्यकीय सेवा सुरू केली.
जवळा गावासोबतच घेरडी, पारे, नराळे, हंगिरगे, डिकसळ तसेच गावाच्या आजूबाजूच्या वड्यावस्त्यांवर वैद्यकीय सेवा दिली. ते स्वतः या लांबवरच्या गावात जावून रुग्णांवर उपचार करत होते.
निस्वार्थी सेवा
डॉ. संजीव कुलकर्णी यांनी वैद्यकीय सेवा देताना कोणताही स्वार्थ न बाळगता निस्वार्थपणे सेवा दिली. जवळा तसेच आजूबाजूचा परिसर हा खेडेगाव म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल होता. अशावेळी खेड्यापाड्यातील रुग्णांकडे उपचारासाठी पैसे नसायचे त्यावेळेस डॉक्टर कुलकर्णी यांनी नि:स्वार्थीपणे वैद्यकीय सेवा दिली. पैशाच्या कारणावरून कोणत्याही रुग्णाची अडवणूक केली नाही.
गरीब रुग्णांकडे ते जेवढे देतील तेवढे अल्प पैशांमध्ये ते चांगली वैद्यकीय सेवा देत होते. एक माणुसकी असणारा डॉक्टर म्हणून त्यांची या भागांमध्ये ख्याती होती. सर्व मित्रांच्या मदतीला धावून जाणारा डॉक्टर मित्र म्हणूनही ते सांगोला तालुक्यात ओळखले जात होते. ते दररोज सकाळी किमान आठ किलोमीटर पायी चालत जात असत. शारीरिक तंदुरुस्तीकडे त्यांचे विशेष लक्ष होते.