
सांगोला / नाना हालंगडे
आजचा दिवस डिकसळ ग्रामस्थांसाठी पुन्हा एकदा घातवार ठरला आहे. गावातील एका नामांकित डफ वादळाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मागील पाच दिवसांत हार्ट अटॅक एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. सलगपणे घडलेल्या या मृत्यूच्या घटनेने गाव हादरले आहे.
वसंत आप्पा गेजगे असे निधन झालेल्या डफ वादकाचे नाव आहे. वसंत आप्पा गेजगे हा माळकरी गडी. पण वडिलोपार्जित सनई, चौघडा, डफ वाजवून गावाची व देवाची सेवा करणाऱ्या वसंत यांचा मृत्यू गावकऱ्यांना चटका देणारा ठरित आहे.
खर तर रविवार 9 एप्रिल 2023 पासून प्रत्येक दिवस गावासाठी घातवार ठरीत आहेत. आजच माजी मुख्याध्यापक मधुकर बाबर सरांच्या तिसऱ्या दिवशीचा विधी झाला अन् उत्तम डफवादक वसंत गेजगे (वय 62) यांच्याही अचानक जाण्याने गावावर तिसऱ्यांदा शोककळा पसरली.
मधुकर बाबर सरांचे याच गेजगे कुटुंबियांवर खूप प्रेम होते. सर म्हणायचे “वसंता तू डफ लयच भारी वाजवितो रे…”
देवापुढं घाय खेळायला लागली की, वसंता डफ वाजवित असताना, वसंता कपाळाला पैसा चिटकावयाचा तर कर्नाटकी बेंदराच्या वेळी तर बैलांना आपल्या डफाच्या तालावर हाच वसंत नाचवित होता. दर शुक्रवारी पालखीच्या ठिकाणी, घटस्थापनेत आठ दिवस वसंताच्या डफाने गाव दणाणून जायचे. वसंत गेजगे हे बाबर सरांना देवमाणूस मानायचे. दोनच दिवसांपूर्वी बाबर सर गेले.. आणि आज वसंत गेजगे गेले. वसंताचे देवाघरी जाणे गावासाठी खूपच दुःखद आहे.
वसंत हे कै.अप्पा संभा गेजगे याचे सुपुत्र. याच अप्पानानाचा खूपच दरारा. त्यांच्या पोटी चार पुत्र, त्यातील तीन नंबरचे वसंत गेजगे हे होते. याच डफ वाजविण्याच्या व्यवसायाबरोबरच ते मिळेल ते काम करीत होते. त्यांचा आज अटॅकनेच अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, भावजय, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे.
वसंत गेजगे हे माळकरी होते. शांत स्वभावाचे व नेहमी सर्वानाच नम्र पणाने बोलायचे. बरेच दिवस त्यांनी कराड येथे चाकरी केली. आता काही दिवसापूर्वी हे कुटुंबीयांसह गावात राहत होते. त्यांच्या मुलांनी गायी पालन करीत, दूध व्यवसाय सुरू केला आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज रात्री 7 वाजनेच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गावावर तीव्र शोककळा
डिकसळमध्ये आणखी एकाचा अटॅकने मृत्यू झाल्याची घटना कळताच गाव हादरले आहे. प्रा. रानोबा करांडे यांच्या निधनानंतर माजी मुख्याध्यापक मधुकर बाबर सर गेले. बाबर सरांच्या माती सावडण्याच्या दिवशीच वसंत आप्पा गेजगे यांचे निधन झाले. सलगपणे होणाऱ्या या मृत्युसत्रामुळे गाव पुरते हादरून गेले आहे. घरातील कर्ती माणसे अगदी ठणठणीत तब्येत असतानाही अचानक मृत्यू पावतात. हे दुःख भीती निर्माण करणारे आहे.
हेही वाचा