ताजे अपडेट
जिवलग मित्राची माती सावडून आलेला मित्रही हार्ट अटॅकने गेला
डिकसळमधील माजी मुख्याध्यापक मधुकर बाबर यांचे धक्कादायक निधन
कालच प्रा. रानोबा करांडे यांचे निधन झाले होते, आपला मित्र गेला आहे ही बाब बाबर सर यांच्यासाठी धक्कादायक होती. प्रा. करांडे यांचे दर्शन घेण्यसाठी बाबर सर हे पत्रकार नानासाहेब हालंगडे व इतर सहकाऱ्यासमवेत सांगली येथे गेले होते. मित्राचे दर्शन घेऊन ते अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी डिकसळ येथे आले. आपल्या मित्राला अखेरचा रामराम करताना ते ओक्साबोक्सी रडत होते.
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
दुःख कधी कधी विशाल महासागराचे रूप घेऊन चाल करून येते. आणि या काळाच्या तडाख्यात उभे राहण्यासाठी अवसानही राहत नाही. काळ किती क्रूर असतो याचा अनुभव सांगोला तालुक्यातील डिकसळ गाव घेत आहे. आपला बालपणापासूनचा जिवलग मित्र गेला. त्याची माती सावडून आलेल्या मित्रालाही काळाने हिरावून नेले.
बातमीला शब्दही सूचत नाहीत….
डिकसळमधील माजी मुख्याध्यापक मधुकर विठोबा बाबर (वय ५९) यांचे आजच दुपारी धक्कादायक निधन झाले. मधुकर बाबर यांचे मूळ गाव डिकसळ. घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची. अपंग असलेल्या आईने काबाडकष्ट करून बाबर सर यांना शिकविले. बाबर सर यांचे प्राथमिक शिक्षण डिकसळ तसेच पारे येथे झाले. हे शिक्षण घेत असतानाच कालच ज्यांचे निधन झाले ते प्रा. रानोबा करांडे हे मित्र बनले. एकाच गावात लहानाचे मोठे झालेले हे दोघे मित्र पुढील शिक्षण घेण्यासाठी पंढरपूर, सांगली, जत येथे गेले. बाबर सर यांनी बीएससी पूर्ण केले.
त्या काळात बी.एड. करणे ही सोपी बाब नव्हती. मात्र बाबर सर यांना शिक्षक बनायचे होते. शिक्षक बनण्याचे स्वप्न असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. पुढे करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला. ही बाब डिकसळ ग्रामस्थांना कळली. त्यांनी गावातून सामुहिक वर्गणी काढून बाबर सर यांना बी. एड. शिक्षणासाठी पैसे जमा केले. गावकर्यांच्या पैशातून बाबर सर यांनी बी.एड. पूर्ण केले.
बी. एड. पूर्ण झाल्यानंतर बाबर सर हे कै. काकासाहेब साळुंखे – पाटील हायस्कूल हंगिरगे येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी तब्बल ३२ वर्षे सेवा केला. मागील दोन वर्षांपूर्वीच ते या हायस्कूलचे मुख्याध्यापक बनले होते. मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीत पूर्णवेळ लक्ष घातले.
गावाचा केला चौफेर विकास
डिकसळ हे गाव सांगोला तालुक्यातील शेवटचे गाव. या गावापासून जत अगदी जवळ. दुर्गम भाग असलेल्या या गावाचा विकास करण्याचे स्वप्न बाबर सर यांनी प्रत्यक्षात उतरवले. बाबर सर यांच्या पत्नी सौ. शशिकला बाबर यांनी सरपंच म्हणून पदभार घेतला. बाबर सर यांनी या पदाचा गावाला फायदा होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
पाणी फौंडेशनचा प्रथम पुरस्कार
पत्नी शशिकला बाबर यांच्या मदतीने बाबर सर यांनी गावात पाणी फौंडेशन ही योजना प्रभावीपणे राबविली. हे काम इतके प्रभावी झाले की, पाणी फौंडेशनच्या कामात डिकसळ गावाचा तालुक्यात पहिला क्रमांक आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अभिनेते अमीर खान यांच्या हस्ते पत्नी शशिकला बाबर यांच्यासमवेत मधुकर बाबर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. गावात बाबर सर यांनी अनेक विकास कामे केली. गावाचा चौफेर विकास केला.
सदैव मदतीचा हात
आपण स्वत: हलाखीच्या परिस्थितीत शिकलो आणि मोठे झालो ही जाणीव बाबर सर यांना होती. त्यामुळे त्यांनी गावातील शेकडो गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला. गावात त्यांनी इतरांच्या मदतीने आश्रमशाळा काढली. ते या आश्रमशाळेचे तज्ञ संचालक होते.
एकापाठोपाठ दोघे जिवलग मित्र गेले
कालच प्रा. रानोबा करांडे यांचे निधन झाले होते, आपला मित्र गेला आहे ही बाब बाबर सर यांच्यासाठी धक्कादायक होती. प्रा. करांडे यांचे दर्शन घेण्यसाठी बाबर सर हे पत्रकार नानासाहेब हालंगडे व इतर सहकाऱ्यासमवेत सांगली येथे गेले होते. मित्राचे दर्शन घेऊन ते अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी डिकसळ येथे आले. आपल्या मित्राला अखेरचा रामराम करताना ते ओक्साबोक्सी रडत होते.
दुपारी आला हृदयविकाराचा झटका
आज मंगळवारी बाबर सर हे आपल्या शेतातील विहिरीच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. विहिरीला चांगले पाणी लागले. ही बातमी त्यांनी अनेकांना फोन करून सांगितली. एवढ्यात दुपारी अडीचच्या सुमारास काळाने घट केला. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने सांगोला येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
डिकसळ गावावर शोककळा
प्रा. रानोबा करांडे यांची माती सावडून काही तास उलटत नाहीत तोच माजी मुख्याध्यापक मधुकर बाबर यांचे निधन झाल्याची बातमी गावात पसरली. ग्रामस्थांना याचा मोठा धक्का बसला आहे. निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी अश्रुना वाट मोकळी करून दिली.
मधुकर बाबर सरांच्या जाण्याने डिकसळ गावाचे कधीही न भरून येणारे सामाजिक, सांस्कृतिक, व राजकीय नुकसान झाले आहे. बाबर सर हे शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते. भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबत त्यांचे घनिष्ट संबंध होते. या भागात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला मोठे बळ दिले होते.
माजी मुख्याध्यापक मधुकर बाबर यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ-भावजयी, दोन मुले असा परिवार आहे. आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास डिकसळ येथे मधुकर बाबर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एक मनमिळावू शिक्षक, सर्वाना मदतीचा हात देणारा दानशूर ग्रामस्थ, गावाचा कायापालट करणारा किमयागार मधुकर बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.