राजकारण

शेकापचा उमेदवार कोण? पुन्हा सस्पेन्स

डॉ. अनिकेत देशमुख पुन्हा सक्रिय

Spread the love

डॉ. बाबासाहेब देशमुख यांची लोकप्रियता वाढत असतानाच आता डॉ. अनिकेत देशमुख यांनी पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकरणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी कामगार पक्षाचा २०२४ चा उमेदवार कोण? हा सस्पेन्स पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे
भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ते तालुक्यात फारसे सक्रिय नव्हते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ते नुकतेच सांगोला येथे आले आहेत. आता पुन्हा नव्याने शेकापच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले आहेत.

दोन वर्षे अलिप्त
डॉ. अनिकेत देशमुख हे भाई गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. डॉ. अनिकेत देशमुख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालिन शिवसेना उमेदवार ॲड. शहाजीबापू पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, अवघ्या काही मतांच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे मागील अनेक पंचवार्षिक निवडणुकांत सांगोला विधानसभा मतदारसंघात अधिराज्य गाजवणाऱ्या शेकापला भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीतच पराभवाची चव चाखावी लागली होती. या पराभवाचे शल्य अजूनही कार्यकर्त्यांच्या मनात दिसून येते.

या पराभवानंतर डॉ. अनिकेत देशमुख हे काही महिने मतदारांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाकडे लक्ष दिले. मागील दीड ते दोन वर्षे त्यांचा मतदारसंघाशी प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. तरीही फोनद्वारे, सोशल मीडियाद्वारे ते संपर्कात असत. त्यांचे अलिप्त राहणे मतदारांना खटकत होते. कारण, विरोधी पक्ष म्हणून त्यांनीच मतदारसंघातील प्रश्नांवर आवाज उठविणे आवश्यक होते. मात्र, आता तब्बल दोन वर्षानंतर का असेना डॉ. अनिकेत देशमुख हे पुन्हा एकदा पक्षाच्या कामात सक्रिय झाले आहे. त्यांच्या येण्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

डॉक्टर बंधूंची मुंबईकडे धाव
डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी कालच विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थिती, चारा छावणीची प्रलंबित बिले यावर दिलासा देण्याची विनंती केली. शिवाय भाई गणपतराव देशमुख (Ex MLA Ganpatrao Deshmukh Sangola) यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास येण्याचे आमंत्रण ना. फडणवीस यांना दिले. ना. फडणवीस हे लवकरच या कार्यक्रमासाठी येणार आहेत.

उमेदवार कोण? पुन्हा सस्पेन्स
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh Sangola) यांनी शेकापला बळकटी दिली आहे. तालुक्यात मोठा जनसंपर्क वाढविला आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्वतःचा चाहता वर्ग तयार केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाच उमेदवारी मिळेल या निश्चयाने त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. “उमेदवारीचा निर्णय पक्ष घेईल” असे डॉ. बाबासाहेब देशमुख सातत्याने सांगत असले तरीही आमदारकीची त्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यांची लोकप्रियता वाढत असतानाच आता डॉ. अनिकेत देशमुख (Dr. Aniket Deshmukh Sangola) यांनी पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकरणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी कामगार पक्षाचा २०२४ चा उमेदवार कोण? हा सस्पेन्स पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

शेकापपुढे आव्हानांचा डोंगर
भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी दोन्ही डॉक्टर बंधूंवर आहे. राज्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे बलाढ्य पक्ष एकत्र आल्याने त्याचे पडसाद तालुक्याच्या राजकारणावरही होताना दिसणार आहेत. सध्या आमदार शहाजीबापू पाटील (Shivsena MLA Shahajibapu Patil Sangola) आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे एकदिलाने काम करताना दिसत आहेत. सोबतीला भाजपचीही साथ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हेच चित्र कायम राहिल्यास शेकापपुढे मोठे आव्हान असेल. दुसरीकडे भाई गणपतराव देशमुख यांच्या हयातीत शेकापमध्ये कधीही बंड अथवा धुसपूस उघडपणे दिसून आली नव्हती. त्यांच्या पश्चात मात्र पक्षात खदखद वाढताना दिसत आहे.

शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा कारंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी उपसभापती संतोष देवकते आदींसह पहिल्या फळीतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी तालुक्यातील पक्ष नेतृत्वावर टीका करत आव्हान दिले आहे. अप्रत्यक्षरित्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांनाच या सर्वांनी आव्हान दिले आहे.

पक्षातील ही अंतर्गत खदखद शेकापला परवडणारी नाही. दोघा डॉक्टर बंधूंनी आपले कौशल्य पणाला लावून हा असंतोष थोपवला तरच आगामी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात सत्ता परिवर्तन होऊ शकते.

डॉ. अनिकेत देशमुखांच्या कार्यकर्त्यांत उत्साह
मागील विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांनी पक्षातील तरुण वर्गाला आकर्षित केले होते. त्यांना मानणारा मोठा वर्ग त्यांनी उभा केला होता. मागील दीड वर्षांपासून अनिकेत हे पक्षात फारसे सक्रिय नसल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. अनिकेत यांनी पुन्हा पुनरागमन केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. “२०२४ चा फिक्स उमेदवार, अनिकेत देशमुख होणार आमदार” अशा आशयाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ भूमिका रेटणे सुरू केले आहे.

तालुक्यातील एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करता दोघे डॉक्टर बंधू एक झाले तरच दोघांची एकी शेकापला विजय मिळवून देणारी ठरेल, असे दिसून येते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका