राजकारण

सांगोल्यात स्वबळाची खुमखुमी

शेकाप, आबा-बापू गटाकडून स्पष्ट संकेत

Spread the love

सत्ताधारी शेकाप व विरोधकात “बिनविरोध”च्या चर्चेच गु-हाळ सुरू असताना शेकापकडून सोमवारी अचानक ‘तयारीला लागा’ असा स्टेटस ठेवून शेकाप कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी एकप्रकारे आदेशच दिला आहे. त्यामुळे बापू-आबा गटाकडून “निवडणूक तर निवडणूक” आम्हीबी तयारीला लागलो आहोत असे सांगून दंड थोपटले आहेत. त्यामुळे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटळ असल्याचे दिसून येत आहे.

बाजार समिती निवडणूक रणसंग्राम

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज माघारी घेण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मागील काही दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, राजकीय डावपेच वाढल्याने ही शक्यता धूसर झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्वबळाची खुमखुमी निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. (Sangola Agricultural Produce Market Committee Election)

सत्ताधारी शेकाप व विरोधकात “बिनविरोध”च्या चर्चेच गु-हाळ सुरू असताना शेकापकडून सोमवारी अचानक ‘तयारीला लागा’ असा स्टेटस ठेवून शेकाप कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी एकप्रकारे आदेशच दिला आहे. त्यामुळे बापू-आबा गटाकडून “निवडणूक तर निवडणूक” आम्हीबी तयारीला लागलो आहोत असे सांगून दंड थोपटले आहेत. त्यामुळे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटळ असल्याचे दिसून येत आहे.

दोन दिवसांत मुदत संपणार
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या १८ जागेसाठी सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे गट, काँग्रेस (आय), भाजप, आरपीआय,शेकापचे अँड सचिन देशमुखसह अपक्षांनी सुमारे १३६ अर्ज दाखल केले होते तर अर्ज छाननीत ८ अर्ज नामंजूर झाले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २० एप्रिल ०२३ पर्यंत आहे. (MLA Shahajibapu Patil Sangola)

दरम्यान सत्ताधारी शेकाप पक्षाकडून डॉ बाबासाहेब देशमुख, बाबासाहेब करांडे, बाळासाहेब काटकर ,संतोष देवकाते यांनी शेतकरी सह. सूतगिरणी व तालुका खरेदी विक्री संघाप्रमाणे बाजार समितीचीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्याकडे सहकार्य करण्याची विनंती केली होती. (Ex MLA Deepakaaba Salunkhe-Patil)

बिनविरोधसाठी झाले प्रयत्न
शेकाप नेतृत्वाकडून मागील १०-१२ दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आ.शहाजीबापू व दिपकआबांबरोबर चर्चा होत असल्याबाबत चर्चा ऐकावयास मिळत आहे. अशावेळी अर्ज माघारी घेण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असताना शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल “तयारीला लागा” असा स्टेटस ठेवल्याने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना एकप्रकारे आदेश दिला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या बिनविरोध निवडणुकीची केवळ चर्चा दिसून येत आहे. प्रत्यक्षात शेकापने “तयारी लागा” असा मेसेज देऊन विरोधकांवर दबाव टाकल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. (Shetkari Kamgar Paksh Sangola)

‘तयारीला लागा’ या भूमिकेबाबत शेकापचे नेते डॉ बाबासाहेब देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “आत्ताच काही बोलणार नाही. परंतु येत्या दोन दिवसात तुम्हाला बातमी दिली जाईल.”

माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील दैनिक लोकमतशी बोलताना म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षाकडून योग्य सन्मान राखला तर विचार केला जाईल. नसेल तर निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे तसे आमच्याही कार्यकर्त्यांचा निवडणुकीसाठी आग्रहच आहे.”

सर्वांनाच आजमावायची आहे ताकद
शेकापच्या उमेदवाराला पराभूत करून शहाजीबापू पाटील सांगोल्याचे आमदार बनले, तेव्हापासून शेकाप आणि शहाजीबापू यांच्या कार्यकर्त्यांत सातत्याने सोशल मीडियावर धुसपूस जाणवते. माजी आमदार दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना साथ देऊन त्यांची ताकद वाढवली आहे. त्यामुळे आबा – बापू गट आणि शेकाप दोन्ही बाजूने ताकदवान लढत इथून पुढच्या काळात पहावयास मिळण्याची शक्यता आहे. दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक होण्यासाठी आग्रही असल्याचे त्यांच्या व्यक्त होण्यातून दिसून येते. सांगोला बाजार समितीची निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक लागल्यास दोन्ही बाजूकडून चुरशीने राजकारण होण्याची शक्यता आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका