सांगोला/ नाना हालंगडे
सांगोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी प्रमुख पक्ष असलेला शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेमंडळींनीच स्वपक्षाविरुद्ध दंड थोपटले. यांना आरपीआय, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व इतर पक्षाची साथ मिळाली. सत्ताधारी व प्रस्थापितांच्या युतीविरोधात परिवर्तन आघाडी निर्माण झाल्याने ही निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. स्वकीयांनी थोपटलेल्या शड्डूमुळे सत्ताधारी व प्रस्थापितांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. Sangola Agricultural Produce Market Committee Election
या निवडणुकीमध्ये सत्ताधारी शेकाप पक्षाच्या देशमुख घराण्यांसोबत शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी एकत्रित येत निवडणूक लढवली जात आहे.
तालुक्यातील राजकीय विरोधक असलेले सर्वच प्रमुख पक्ष एकत्रित आल्याने निवडणूक बिनविरोध होईल किंवा एकतर्फी होईल असेच चित्र निर्माण झाले होते. परंतु सत्ताधारी शेकाप पक्षातील माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी शेकाप पक्षामध्येच समांतर पॅनल उभे केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य असलेले जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनीही या प्रमुख पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकला.
या प्रमुख पक्षातीलच बंडखोरी झाल्याने या बंडखोरांसोबतच तालुक्यातील आरपीआय, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व इतर पक्षही या आघाडीत सामील झाले. या आघाडीने ‘स्व. गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी’ असे नाव देऊन अक्षय तृतीया व रमजान ईदच्या मुहूर्तावर आपला प्रचाराचा नारळही फोडला. या परिवर्तन आघाडीमुळे सत्ताधारी व प्रस्थापित पक्षांपुढे वेगळाच पेच निर्माण झाला आहे.
नव्या युती, आघाड्यांमुळे चर्चा
या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे प्रमुख विरोधक असलेले पक्षांनी केलेली युती, प्रस्थापित व सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील अनेकांनी थोपटलेले दंड, तालुक्यातील इतर पक्षांनी परिवर्तन आघाडीला दिलेला पाठिंबा यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सोशल मीडिया मधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
एकमेकांच्या विरोधात नेहमी बोलणारे आज एका स्टेजवर बसून विकासाच्या गप्पा आता कशा मारल्या जाणार याबाबत चर्चा सोशल मीडियावर केल्या जात आहेत. त्यामुळे निवडणूक जरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे असली तरी यापुढील राजकारणाची व तालुक्यातील परिवर्तनाची वेगळी दिशाच या निवडणुकीमुळे निर्माण झाल्याचे चित्र सध्या सांगोला तालुक्यात दिसून येत आहे.
राज्यातील ‘शिंदे पॅटर्न’ची चर्चा सांगोल्यात
सत्ताधारी व प्रस्थापितांच्या विरोधात बंडखोरी केली असल्याबाबत विचारल्यावर शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख म्हणाले की, आम्हाला बंडखोर म्हणू नका. मी शेकाप पक्षाचा पदाधिकारी आजही आहे. आमच्या पॅनलला ‘स्व. गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी’ असे नाव दिले आहे. मी शेकापचा कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहणार आहे. आबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निवडणूक लढवीत असून आम्हीच खरे शेकापचे कार्यकर्ते आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले.
तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनी मी राष्ट्रवादीचा प्रांतिक सदस्य असून मीही राष्ट्रवादीचाच आहे. त्यामुळे आम्ही बंडखोरी केली नाही. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी, गटासाठी एकत्रित आलो नसून शेतकरीहित लक्षात घेत परिवर्तनवादी चळवळ सुरू केली आहे. त्यामुळे ‘मी पक्षाचा, पक्ष आमचाच’ असे हे नेतेही मंडळी म्हणू लागल्यामुळे राज्यातील ‘शिंदे पॅटर्न’ची चर्चा सांगोल्यात पुन्हा सुरू झाली आहे.