शिंदेंच्या शिवसेनेत घुमणार सोलापूरी महिलेचा आवाज
डॉ. ज्योती वाघमारे बनल्या पक्ष प्रवक्त्या

सोलापूर : विशेष प्रतिनिधी
आपल्या वक्तृत्वाने महाराष्ट्रातील वैचारिक व्यासपीठे गाजवून सोडणाऱ्या सोलापूरच्या सुप्रसिध्द वक्त्या तथा समाज सेविका डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना पक्ष प्रवक्तेपदावर नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.
कोण आहेत डॉ. ज्योती वाघमारे
डॉ. ज्योती वाघमारे ह्या मूळच्या सोलापूरच्या. एक विद्रोही आणि प्रखर आंबेडकरी वक्त्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. सूत्रसंचालन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. समाजातील तळागाळातील प्रश्न त्यांना ठावूक आहेत. त्या समाजसेविका म्हणूनही परिचित आहेत. त्यांनी परिवर्तनवादी विषयांवर तडाखेबाज भाषणे दिली आहेत. त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांवर मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
काँग्रेसने केले खच्चीकरण
डॉ. ज्योती वाघमारे यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर पक्षात सामावून घेतले. मात्र, त्यांची वाढत असलेली लोकप्रियता पाहून त्यांचे खच्चिकरण केले. काँग्रेसमधील पक्षांतर्गत राजकारण ओळखून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. नंतर त्या वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर दिसल्या होत्या.
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मागील तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर विमानतळावर आले असता सोलापुरातील त्यांच्या समर्थकांनी डॉ. ज्योती वाघमारे यांची भेट घालून दिली. मुंबई येथे अंतिम चर्चा होऊन डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली.
अंधारे विरुद्ध वाघमारे
सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण खूपच तापले आहे. शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे यांची शिवसेना यांच्यात मोठे शीतयुद्ध सुरू आहे. ठाकरे गटाकडून प्रा. सुषमा अंधारे या खिंड लढवत आहेत. मात्र इकडे शिंदे गटाकडे आक्रमक चेहरा नव्हता. बहुतेक त्याच हेतूने डॉ. वाघमारे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच डॉ. ज्योती वाघमारे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की,
“सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या व प्रखर वक्ता म्हणून महाराष्ट्रास परिचित असलेल्या प्राध्यापक डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या वक्तृत्वाच्या बळावर अनेक व्यासपीठे गाजवलेली आहेत. शिवसेना पक्षाला एका नव्या उंचीवर नेता येणे शक्य व्हावे यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात येत असून तसे पत्र त्यांना आज सुपूर्द करण्यात आले.”
सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या व प्रखर वक्ता म्हणून महाराष्ट्रास परिचित असलेल्या प्राध्यापक डॉ.ज्योती वाघमारे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांनी आपल्या… pic.twitter.com/e8QkxMdh18
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 17, 2023