थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत तोडगा काढण्यात आला आहे. हा संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. 14 मार्चपासून आजपर्यंत (दि.20 मार्च) जवळपास सात दिवस हा संप सुरू होता.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती दिली. ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत एक समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात ही समिती अहवाल सादर करेल”, असं काटकर यांनी यावेळी सांगितलं. तसेच उद्यापासून (दि.21 मार्च) सरकारी कर्मचारी कामावर हजर होणार आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच या संपादरम्यान सरकारी कार्यालयातील कामकाजही ठप्प झालं होतं.