थिंक टँक स्पेशल
Trending

शहाजीबापूंना मुख्यमंत्र्यांनी दिली “शंभरची नोट आणि आशीर्वाद”

Spread the love

१९७२ ला साऱ्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला. आधीच पाणी पाणी करणारा सांगोला आणखीनच त्रासला गेला. अशातच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Former Chief Minister Vasantrao Naik) यांचा या भागात दौरा लागला. पोरसवदा वयात असणाऱ्या शहाजीबापूंनी मुख्यमंत्र्यांना भेटायचं ठरवलं. दुष्काळामुळे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या शाळा शिकणाऱ्या पोराला काय अडचणी भोगाव्या लागत आहेत यावर सविस्तर निवेदन त्यांनी तयार केले.

सांगोला : विशेष प्रतिनिधी
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” फेम आमदार शहाजीबापू पाटील हे मागील दोन वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अलीकडे त्यांना “पाणीदार आमदार” अशी उपाधी मिळाली आहे. मात्र बापूंचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी राजकारण टिकवून ठेवले आहे. आज शहाजीबापूंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या जुन्या आठवणींना दिलेला उजाळा. (Sangola MLA Shahajibapu Patil Birthday)

शहाजीबापूंच्या समाजकारणाचा श्रीगणेशा खूप वर्षांपूर्वी झाला. साल १९६९. गांधीजींच्या जन्मशताब्दीचे वर्ष. त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. भागवत वाघमारे हे शहाजीबापूंचे शिक्षक. त्यांनी मुद्दामहूनच शहाजीबापूंचे नाव या स्पर्धेकरिता नोंदविले. आपल्या ओघवत्या शैलीत विषय मांडण्याची शैली असणाऱ्या बापूंनी ती स्पर्धा अक्षरश: गाजवली. आणि संपूर्ण सोलापुर जिल्ह्यात प्रथम आले. या क्रमांकाने त्यांना आत्मविश्वास दिला.

एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याची मांडणी कशी करायची याची रंगीत तालीमच यातून घडून आली. भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांची ही एकप्रकारे नांदीच होती.

पुढे १९७२ ला साऱ्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला. आधीच पाणी पाणी करणारा सांगोला आणखीनच त्रासला गेला. अशातच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Former Chief Minister Vasantrao Naik) यांचा या भागात दौरा लागला. पोरसवदा वयात असणाऱ्या शहाजीबापूंनी मुख्यमंत्र्यांना भेटायचं ठरवलं. दुष्काळामुळे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या शाळा शिकणाऱ्या पोराला काय अडचणी भोगाव्या लागत आहेत यावर सविस्तर निवेदन त्यांनी तयार केले.

निवेदन घेऊन स्टेजवर चढलेल्या शहाजीबापूंना औदुंबर अण्णांनी थांबवलं आणि म्हणाले, “हे असं निवेदन द्यायचं नाही, तो माईक इकडे घ्या आणि याला बोलू द्या.” बापूंनी माईक हातात घेतला आणि पाचच मिनिटे बोलले. पण ते बोलणं काळजापासून होतं.

वर्षानुवर्षे भोगलेल्या दुष्काळाचे चटकेच जणू बोलू होते. त्यामुळे एका काळजातून निघालेलं हे दुःख दुसऱ्या काळजाला, मुख्यमंत्र्यांना भिडले. खिशातून शंभर रुपयांची नोट काढून त्यांनी शहाजीबापूंच्या हातावर ठेवली. आणि “पोरा खूप मोठा हो”, म्हणून आशीर्वादही दिला. इतक्या लहान वयात मोठी समज दाखवत थेट मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या भागाचे गाऱ्हाणे मांडणारे बापू एकमेवच असतील. मोठे होईल तसतसे अनेक थोर व्यक्तींचा, लोकनेत्यांचा सहवास बापूंना लाभत गेला.

एक वैचारिक बैठक मनात तयार होऊ लागली. आपल्या भागाच्या विकासासाठी आपण काम करायचे. मग त्यासाठी लागतील तेवढे कष्ट घ्यायचे. या जिद्दीने ते समाजकारणात उतरले. एकेक गावाला भेटी सुरु झाल्या. सर्वसामान्यात मिसळायचे. शेतकरी, कामकरी, व्यापारी, माताभगिनी, युवा वर्ग यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायच्या. बोलण्यातील माणदेशी ठसका आणि स्थानिक प्रश्नांची पुरेपूर जाणीव असल्याने कार्यकर्त्यांचे मोहोळ त्यांच्याभोवती तयार होऊ लागले. अडचणींची निवेदने संबंधित प्रशासनाकडे जाऊ लागली.

एखादे काम जोवर होत नाही तोवर ते लावून धरण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने कामेही मार्गी लागू लागली. सामान्य सांगोलाकरांचा ढाण्या वाघ आता पाऊले टाकत आहे.

माणदेशाचा खणखणीत आवाज : शहाजीबापू पाटील

भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली पासून सुमारे १६०० किलोमीटर तर महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबई पासून ३५० किलोमीटरवर एक तालुका आहे. सांगोला असं नाव आहे या तालुक्याचे. सदैव पाचवीला पुजलेला दुष्काळ. पाणी नसल्याने शेती नाही, शेती नाही म्हणून पैसे नाही. भागात पैसे नाहीत म्हणून पोरांनी मुंबई-पुण्याची वाट धरली. राज्याच्या नकाशातही एका कोपऱ्यात स्थान. परिणामी प्रगतीची दारे बंदच राहिली. पण दीड वर्षांपूर्वी याच सांगोल्याच्या सुपुत्राने संपूर्ण देश गाजवला. डायलॉग तर आठवतच असेल. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल….. मा. शहाजीबापू राजाराम पाटील. २५३, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार.

पण केवळ हा डायलॉग म्हणजेच बापू काय ? अजिबात नाही. सांगोल्याच्या विकासाठी त्यांनी घेतलेल्या झुंजा आणि खाललेल्या टकरा यांची उजळणीच करायची म्हणली तर कितीतरी काळ जाईल. इयत्ता तिसरीच्या वर्गात सोनार गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार तानाजी मालुसरेंच्या महान बलिदानाची कथा सांगून स्वतःच्या अश्रूंना मोकळी वाट करून देत सगळ्या शाळेलाही हमसून रडवणारा सच्चा शिवप्रेमी म्हणजे शहाजीबापू. सिंहगडाची कथा ऐकून भावूक झालेले गुरुजी बापूंना बोलले, “अशीच तयारी ठेव उद्याच्या महाराष्ट्रात एक वक्ता म्हणून नाव कमवशील.” सोनार गुरुजींचे शब्द फुकट गेले नाहीत. एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या उठावाला साथ देणारा हा पहिला साथीदार माडगूळकर-खरातांच्या माणदेशी बोलीला पुन्हा एकदा तिचे मानाचे स्थान मिळवून देत चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या लाखोंच्या सभा गाजवीत आहे. एका कोपऱ्यात राहिलेल्या सांगोल्याला प्रसिद्धीच्या झोतात आणि विकासाच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी जीवाचे रान करत आहे..

शहाजीबापूंचा आज वाढदिवस आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा!

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका