ना. चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूरात शाईफेक
सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सोलापूर येथे शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. आज सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून उद्या (सोमवारी) ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. दरम्यान, विश्रामगृहात जाताना भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘खासगीकरण बंद करा’ अशा घोषणाही त्या तरुणाने दिल्या. पोलिसांनी त्याला पकडून बाजूला केले आणि पुन्हा पोलिस ठाण्यात नेले. अजय मैंदर्गीकर असे त्या तरूणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यातील शाईफेकीच्या प्रकारानंतर चंद्रकांत पाटील हे खूपच सावध राहतात. त्याच्या आजूबाजूला पोलिसांचाही मोठा गराडा असतो. पालकमंत्री म्हणून ते पहिल्यांदाच सोलापूर शहरात आले आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर ते शासकीय विश्रामगृहात आले. तत्पूर्वी, पोलिसांचा मोठा फौजफाटा त्याठिकाणी जमला होता.
पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक व हवालदार असा तगडा बंदोबस्त त्याठिकाणी होता. विश्रामृहात आल्यावर गाडीतून उतरल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर विश्रामगृहात जात असतानाच बाजूला थांबलेला तरूण घोषणाबाजी करीत त्यांच्या दिशेने धावला.
हातात काळा झेंडा व शाई घेऊन आलेला तो तरूण पोलिसांना काही समजायच्या आत पुढे झाला आणि त्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दिशेने शाई फेकली. काही सेकंदात सदर बझार पोलिसांनी त्याला पकडून बाजूला नेले आणि वाहनात बसवून ठाण्यात आणले.
शेखर बंगाळेला पोलिसांच्या ताब्यात
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी शेखर बंगाळे यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अंगावर भर भाषणात भंडारा उधळला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांना धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायला गेल्यावर बंगाळे यांनी विखे-पाटलांच्या अंगावर भंडारा टाकला. आता पुन्हा तसाच प्रकार होवू नये म्हणून पोलिसांनी सावधानता बाळगत पोलिसांनी त्यांना चंद्रकांत पाटील त्याठिकाणी येण्यापूर्वी पोलिस ठाण्याला नेले होते.