आशादेवी लष्करे लिखित “झुंज वादळांशी” स्वकथनाचे प्रकाशन
धाराशिव : विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ लेखिका आशादेवी लष्करे लिखित आणि थिंक टँक पब्लिकेशन सोलापूर प्रकाशित “झुंज वादळांशी “या स्वकथनाचे प्रकाशन उत्साहात झाले.
दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी रायगड फंक्शन हॉल, तेरणा कॉलेज जवळ, धाराशिव येथे योगीराज वाघमारे प्रसिद्ध कथा व कादंबरीकार, सोलापूर यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक के .व्ही.सरवदे, कळंब हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर व दुसरे प्रमुख पाहुणे पंडित कांबळे प्रसिद्ध साहित्यिक, धाराशिव हे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक योगीराज वाघमारे या पुस्तकाचे प्रकाशन झाले असे जाहीर करून म्हणाले की, मुक्ता सर्वगोड यांचे स्वकथन ‘मिटलेली कवाडे’. प्रा.रा.रं. बोराडे यांची ‘पाचोळा’ कादंबरी आणि उद्धव शेळके यांची प्रसिद्ध कादंबरी ‘धग’ या कादंब-यांच्या तोडीचे लेखन झुंज वादळांशी या स्वकथनामधून आशा देवी लष्करे यांनी केलेले आहे. आयुष्यातील संघर्ष, गावच्या आठवणी, तेथील माणसे यावर भाष्य करून आशादेवी लष्करे यांच्या लेखनाचे योगीराज वाघमारे यांनी कौतुक केले.
डॉ.सारीपुत्र तुपेरे यांनी उर्मिला पवार, कुमुद पावडे, शांताबाई दाणी, बेबी कांबळे यांच्या स्वकथनाच्या परंपरेतील आशादेवी यांचे हे स्वकथन झालेले आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील महिलांचे पहिलेच स्वकथन आहे असे सांगून प्रा.सारीपुत्र तुपेरे यांनी त्या पुस्तकातील आशादेवीच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले.
या कार्यक्रमातील दुसरे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिक पंडित कांबळे यांनी धाराशिव जिल्ह्यातील स्वकथने, लेखक या बरोबर आशादेवी यांच्या स्वकथनातील बालपण, शिक्षण व लग्न, झुंज वादळांशी ,प्रमोशन, सेवानिवृत्तीनंतर हेच स्वकथनातील पाच टप्पे यावर भाष्य केले.
आशादेवी लष्करे यांनी प्रास्ताविकातून आपली जडणघडण सांगितली,आयुष्यात आलेले उत्कट अनुभव त्यांनी विषद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष के.व्ही. सरवदे यांनी या स्वकथनाचे साहित्यातील महत्त्व विशद करून अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमासाठी जयराज खुने, रमेश बोर्डेकर ,तु.दा. गंगावणे,प्रा.महादेव गायकवाड,प्रा.अंबादास कळासरे,मारोती पवार,अतुल लष्करे,विकास चंदनशिवे,रामजी कांबळे,प्रा. डॉ. दिनकर झेंडे ,आशादेवी लष्करे यांचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते हे सर्व उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे यांनी केले तर आभार प्रशांत माने यांनी मांडले.