सांगोल्यातील दोघा सख्ख्या भावांचा एमबीबीएसला लागला नंबर

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
आपल्या समोरील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सांगोला तालुक्यातील संतोषकुमार निंबाळकर या प्राथमिक शिक्षकाची दोन्ही मुले नीट परीक्षेत सहाशेहून अधिक गुण मिळवत एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरली आहेत.एका प्राथमिक शिक्षकाच्या दोन्ही मुलांनी उच्च गुणवत्ता सिद्ध करत एमबीबीएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला गवसणी घातली आहे.
सांगोला येथील संतोषकुमार सुभाषराव निंबाळकर हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे वडील सुभाषराव शंकर निंबाळकर यांनीही सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली होती. सुभाषराव निंबाळकर यांना आपला मुलगा संतोष निंबाळकर हा प्रशासकीय अधिकारी व्हावे असे मनापासून वाटत होते. मात्र प्रापंचिक जबाबदारीमुळे संतोष निंबाळकर यांचे हे स्वप्न अपुरे राहिले. संतोष निंबाळकर हे कडलास(ता.सांगोला) अंतर्गत असलेल्या करलवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरती प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत. घरात संतोष निंबाळकर हे एकमेव कमावते असल्याने आर्थिक स्थिती समाधानकारकच आहे. त्यांना सौरभ व संकेत ही दोन मुले. या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
सौरभ आणि संकेत दोघेही अभ्यासात हुशार आहेत. या दोघांचेही प्राथमिक शिक्षण पुजारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशालेत झाले.त्यावेळी असलेल्या पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये हे दोघेही भाऊ चमकले. शिवाय दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये या दोघांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.यापैकी थोरला असलेल्या सौरभने सन २०२० मध्ये झालेल्या नीट परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात ६५५ गुण मिळवले आहेत. सौरभ हा सध्या मुंबई येथील नायर कॉलेजमध्ये एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षांमध्ये शिक्षण घेत आहे.
सौरभने धाकटा भाऊ संकेत याला परीक्षेची तयारी व परीक्षेला सामोरे जाण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. नुकत्याच आलेल्या नीट परीक्षेच्या निकालामध्ये संकेतने ६२२ गुण मिळवत एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेश निश्चित केला आहे. एका प्राथमिक शिक्षकाच्या दोन्ही मुलांनी गुणवत्तेच्या आधारावर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला ही बाब प्रेरणादायी आहे.या दोघांनाही वैद्यकीय क्षेत्राचे मोठे आकर्षण आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच प्रशासकीय सेवेच्या संधीही त्यांना खुणावत आहेत. दोघांनीही चिकाटी व सातत्य राखल्यामुळे त्यांना हे यश मिळाले, असे वडील संतोष निंबाळकर सांगतात.
कामासाठीचा उत्साह वाढतो आहे
स्वतःला प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. आपले स्वप्न आपण समोरील विद्यार्थ्यांमधून पूर्ण करत आहोत. त्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास घेण्यावर माझा भर असतो.आपल्या हातून घडलेले अनेक विद्यार्थी विविध पदावर काम करत आहेत, याचा आनंद आहे.त्यातच माझ्या दोन्ही मुलांची स्वप्न साकार होत आहेत.त्यामुळे काम करण्याचा उत्साह आणखी वाढतो आहे.- संतोषकुमार निंबाळकर (प्राथमिक शिक्षक,सांगोला)