सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
विमानसेवेला अडथळा ठरणारी सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदा चिमणी न्यायालयाच्या निकालानंतर काढण्याची प्रक्रिया आज प्रशासनाने हाती घेतली आहे. या स्थितीत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कारखाना परिसर निर्मनुष्य करण्यात आला असून प्रत्यक्ष पाडकाम करणाऱ्या मजुरांशिवाय अन्य कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिलेला नाही. सुमारे दोन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारखान्याची चिमणी काही तासांतच पाडली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पत्रकार आणि अन्य कोणालाही फोटो, शूटिंग यासाठी सद्यस्थितीत तरी मज्जाव आहे. साखर कारखाना चोहबाजूनं पोलीस बंदोबस्त असून याला छावणीचे स्वरूप आलं आहे.
कारखान्याचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असून येथे उपस्थित कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन बंद करण्यात आले आहेत.
पाडकाम करण्यास विरोध दर्शवणाऱ्या काही पुढारी मंडळी आणि समर्थकांना पोलिसांनी काल रात्री तसेच आज सकाळी ताब्यात घेतल आहे.
आज प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली वेगात आहेत.
सोलापूरची विमान सेवा होटगी रोड विमानतळावरून सुरू होण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्यापैकी सिद्धेश्वर कारखान्यांना उभारलेली को जनरेशनची चिमणी ही एक प्रमुख अडचण आहे. याप्रकरणी सोलापुरातील व्यापारी मंडळींनी एकत्रित येऊन बेकायदा चिमणी संबंधात महापालिका ते सुप्रीमकोर्ट पर्यंत तक्रारी केल्या होत्या. कोर्टाचे वारंवार आदेश ,सरकारचा अधेमध्ये हस्तक्षेप असं होत गेली आठ वर्ष हे काम रखडलं आहे. पूर्वीही एक- दोन वेळा महापालिका प्रशासनानं पाडकामाची जय्यत तयारी केली होती. पण पाडकाम झालं नव्हतं. आज प्रत्यक्ष काही कृती होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
रात्रभर तणाव
साखर कारखाना परिसरात कालपासून जमावबंदीचा निर्णय जाहीर होताच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. कारखान्याची चिमणी पाडकामास सुरुवात झाल्याचे समजून अनेकजण जमा झाले. कामगार, कारखाना प्रतिनिधीसह माकपच्या कार्यकर्त्याची संख्या वाढू लागली. रात्री दीड- दोनपर्यत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी पहाटे कारखान्याचे मोठे लोखंडी गेट तोडून अनेकांची धरपकड केली. कारखाना प्रतिनिधीने पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.
चिमणी पाडकामासंदर्भात सोलापूर महापालिका प्रशासनाने २७ एप्रिल रोजी कारखान्याची चिमणी स्वतःहून पाडून घेण्यासाठी ४५ दिवसांची दिलेली मुदत ११ जून रोजी समाप्त झाली आहे. पण कारखान्याने स्वतःहून चिमणी पाडली नाही. या उलट कारखाना स्थळावर शेकडो सभासद शेतकरी जमवत प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता महापालिका आणि पोलीस प्रशासनानेही कडक भूमिका घेतली आहे.
महापालिकेने सिध्देश्वर कारखान्याच्या प्रशासकांना नोटीस बजावली आहे. पाडकामाची कार्यवाही बुधवारपासून सुरू करत असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. स्वतः कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी ही नोटीस प्राप्त झाल्याची माहिती दिली.
पोलीस प्रशासनाने सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणारे मार्ग हत्तुरे वस्तीपासून बंद केले आहेत. १३ जून ते १८ जून या सहा दिवस हत्तुरे वस्तीपासून पुढे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे कोणालाही जाता येणार नाही. मंगळवारी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. काही ठराविक वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कारखाना ते कुंभारी हाही मार्ग बंद राहणार आहे. आयुक्त राजेंद्र माने यांनी मंगळवारी हा आदेश काढला.
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची ही को जनरेशन प्लांटची चिमणी आहे. २०१४ साली कारखान्याने ही चिमणी उभारलेली असून साधारण ९० मीटर इतकी उंची आहे. चिमणीच्या या उंचीमुळे शेजारी असलेल्या सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करता येऊ शकत नाही असा अहवाल डीजीसीएने दिला होता.. सोलापूरला विमानसेवा गरजेची असल्याने ही चिमणी हटवण्याची मागणी सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंच या संघटनानी केली होती. त्यातच सोलापूर महानगरपालिकेने चिमणी अनधिकृत असल्याचे ठरविले. कारवाईच्या हालचाली सुरु केल्या.