गुन्हेगारी

आधी बॉसवर फायरिंग, मग ३ प्रवाशांना संपवलं

जयपूर-मुंबई रेल्वेत नेमका गोळीबार कसा झाला? रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती

Spread the love

तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दलाचा कर्मचारी असलेल्या चेतन सिंहची नुकतीच बदली झाली होती. त्यामुळे तो संतापला होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. चेतन सिंह आधी गुजरातमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची बदली मुंबईला झाली होती. या बदलीमुळे त्याच्या कौटुंबिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे तो त्रासला होता.


मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात चारजण ठार झाले. ही घटना सोमवारी पहाटे मुंबई सेंट्रल एसएफ एक्स्प्रेसमध्ये दहिसर आणि मीरा रोड दरम्यान घडली. गाडीतील कोच B-5 मध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. आरपीफ जवानाच्या आपआपसातील वादामुळे ही घटना घडली आहे. दरम्यान, सततच्या बदलीमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून हे कृत्य झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (Jaypur – Mumbai Railway Firing)

या घटनेसंदर्भात डीआरएम नीरज वर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सकाळी 6 च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की, एस्कॉर्टिंग ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने गोळीबार केला. चार जणांचा गोळीबारात मृत्यु झाला आहे. आमचे रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. मृतकांच्या नातेवाईकांना मदत दिली जाईल. ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही साक्षीदारांचीही तपासणी करत आहोत. आम्ही सर्व बाजूंनी तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत.

त्यानं चौघांना संपवलं
चेतन सिंहनं त्याचे वरिष्ठ असलेल्या टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तो दुसऱ्या बोगीत गेला. तिथे त्यानं तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. चौघांना संपवल्यानंतर चेतननं दहिसर ते मीरारोड दरम्यान ट्रेन रोखली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी बोगीतील चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यासाठी जयपूर एक्स्प्रेस बोरिवलीत थांबवण्यात आली होती.

प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केला. त्याने आपल्या एका सहकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेत तीन प्रवासी जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ट्रेन बोरिवली स्थानकावर आल्यावर मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि आरपीएफ जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. दहिसरजवळ कॉन्स्टेबल चेतन कुमारने खाली उतरून अलार्मची चेन ओढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरपीएफने त्याला शस्त्रासह अटक केली, असे निवेदनात म्हटले आहे. त्याची मानसिक प्रकृती ठीक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर म्हणाले, आज मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक आरपीएफ कॉन्स्टेबल, चेतन कुमार याने त्याचा सहकारी एएसआय टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. या घटनेदरम्यान, इतर तीन प्रवाशांनाही गोळ्या लागल्या. प्राथमिक माहितीनुसार तपासात त्याने अधिकृत शस्त्र वापरून गोळीबार केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आम्ही तपास करत आहोत.

मृतदेह शताब्दी रुग्णालयात
जयपूरहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे साडे पाचच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. चौघांचे मृतदेह बोरिवली स्थानकात उतरवण्यात आले. त्यानंतर ते शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. बी-५ बोगीत गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ट्रेनमधून बाहेर उडी घेत पळ काढला
रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबल चेतन सिंहनं त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यामध्ये रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक टिकाराम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर चेतननं बोगीतील चेन खेचली. त्यानंतर ट्रेन थांबली. मग चेतन सिंहनं दहिसर स्थानकात ट्रेनमधून बाहेर उडी घेत पळ काढला. चेतन सिंहला थोड्याच वेळात रिव्हॉल्व्हर अटक करण्यात आली.

मानसिक स्थिती ठीक नव्हती
तपास पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा दलाचा कर्मचारी असलेल्या चेतन सिंहची नुकतीच बदली झाली होती. त्यामुळे तो संतापला होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. चेतन सिंह आधी गुजरातमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची बदली मुंबईला झाली होती. या बदलीमुळे त्याच्या कौटुंबिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे तो त्रासला होता. मानसिक त्रास आणि त्यामुळे निर्माण झालेला संताप यामुळे त्यानं चौघांवर जीवघेणा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका